मी पुन्हा येईन....
रात्री निवांत झोप घेतल्यावर बाला सकाळी लवकर उठत भाऊ टिला व वडिलांशी चर्चा करत लग्न जवळ आल्यानं मित्रांना भेटून पत्रिका देण्यासाठी कामाला लागला. त्यानं ओसरीवरील नाना काकांना नमस्कार करत मायडे बाबत चौकशी केली. ती रात्री उशीरा आल्यानं अजुन झोपलीय हे कळताच तो घरात परतला. त्यानं निलूला उठवत फ्रेश व्हायला लावलं. निलेश भुसावळ वरुन औरंगाबाद जायचा पण भुसावळला बालाच्या घरी येण्याचा त्याचा हा पहिलाच प्रसंग. पण रात्री जेवण,गप्पा वरुन बालाचं पुर्ण कुटूंब त्याला चांगलं व आपलंसं वाटलं.
नऊ पर्यंत तयार होत बालानं निलूसोबत गावात पत्रिका वाटण्यासाठी भावाची बुलेट घ्यायचं ठरवलं. पण पत्रिकाचा गठ्ठा छापखान्यातच होता.म्हणून बालानं निलूला घेत बुलेटला किक मारत घरामागच्या रस्त्यावर छापखान्यासमोर आणली. वरून मधल्या जिन्यानं नाना खाली उतरत कामावर आलेल्या माणसांना परवा रात्री नंदानं तयार केलेला पत्रिकेचा गठ्ठा काढावयास फर्मावलं. बाला व निलू छापखान्यात आत आले. माणसास गठ्ठा सापडेना. नानांनी स्वत: ही शोधला पण पत्रिका नंदानं कुठं ठेवल्यात सापडेतना. मग नाना जिन्यानं वर चढत झोपलेल्या नंदास उठवत त्यांनी खाली पाठवलं.
तो पावेतो माणूस फुलं, बेल घेत भैरवाच्या मंदीरात पुजेस गेला. बालास काॅल आल्यानं बोलता बोलता तो बाहेर रस्त्यावर आला. निलेश छापखाना, त्यातील लग्नपत्रिकाचे गठ्ठे, विविध कागदाचे नमुने, रजिस्टर्स, पुस्तकाचा ढिग बारकाईनं पाहू लागला. लहानपणी तो आईसोबत जळगावला आजोळी येई. आजोबांचा ही असाच छापखाना होता.पण आजोबा वारले व मामा नसल्यानं आजोळी येणंच बंद झालं. हा छापखाना पाहून त्याच्या त्या स्मृती जाग्या झाल्या.
इथल्या छापखान्यातील पसारा शिस्तीनं लावल्याचं चटकन त्याच्या लक्षात आलं. तोच त्याला चिर परिचीत दरवळणारा, हवाहवासा वाटणारा मोगऱ्याचा सुगंध येत असल्याचं जाणवलं. तो अधीरतेनं टकमक पाहत शोध घेऊ लागला. पण सुगंध कुठून परिमळतो ते समजेना. माणूस बेल व फुलं घेऊन गेला कदाचित त्याचा असावा. तोच वरच्या जिन्यावर आवाज निनादला.तो वळला व जिन्याकडं पाऊ लागला. पाऊले दादऱ्याची एकेक पायरी उतरत होती. सुगंध इकडून दरवळत होता तर निलूच्या लक्षात आलं. चेहरा दिसला नी निलू जागेवरच थरथरला .तो अविश्र्वासाने विस्फारल्या डोळ्यानं पाहू लागला. विस्कटलेल्या केसांनी ललाटीचा भालप्रदेश व्यापलेला.डोळ्यात अर्धवट झोपेची गुंगी. तोच सुगंध, नजरेला नजर भिडली व नजरेत त्याच मिठीची अगाधता, प्रगाढता स्थिरावली. नंदा शेवटच्या पायरीवरच रेलींगला धरुन स्थीतप्रज्ञ झाली. चहुदिशांनी आभाळ घनगोफ उठवणाऱ्या मेघांनी गचबूच भरून यावं व आता क्षणात घनघोर पावसास सुरुवात होईलच अगदी तीच गत. निलेश पुढे सरकणार तोच
"मायडे, उठली का? सापडला का गठ्ठा?" मागून बाला आत येत विचारता झाला.
नजर तशीच निश्चल ठेवत "शोधतेय! तू केव्हा आलास बाप्या?" कसेबसे शब्द फुटले. निलेशला तर आपल्या अस्तित्वाचाच विसर पडला.
त्याची नजर कळसुत्री बाहुलीगत गठ्ठा शोधणाऱ्या नंदावरच फिरत होती. ती शाश्वत नजर नंदाच्या गठ्ठा शोधण्यात अडथळा आणू लागली. तिला गठ्ठा नजरेस आला. नजर हटवत ती अदाजानं हातात गठ्ठा घेऊ लागली. पण बाला अचानक आत आला म्हणून आभाळातली सर बरसण्याची तशीच राहिली.
नंदानं कॅफेच्या कॅबीनमधून गठ्ठा उचलला व तो समोर धरला. निलेश पुढे सरकत गठ्ठा घेणार तोच "बाप्या.....क्को..कोण?"
" अगं मायडे ,हा निलेश आमोणकर, औरंगाबादचा. आम्ही सोबतच आहोत.लग्नासाठी याला खास आणलंय!" बाला निलूचा परिचय करुन देत होता. पण नंदाला फक्त 'निलेश' एवढंच लक्षात राहिलं कारण ती किल्ल्यावरच्या त्या गलक्यात हेच नाव उच्चारलं जात होतं पण आपणास आधी भितीनं व नंतर अगाधतेत ते लक्षात आलंच नव्हतं. गेल्या दोन वर्षात हेच नाव जाणण्यासाठी आपण किती तळमळत होतो या विचारातच ती गुरफटली. तिची नजर तर त्याच शाश्वत नजरेतल्या पसाऱ्यात अडकून चाचपडत होती.
" निलेश पत्रिका पाहुन घे व चल...!" गठ्ठा धरुन उभ्या निलेशला बाला बोलला व बाहेर निघू लागला. निलू बाहेर निघण्याऐवजी नंदाकडंच सरकू लागला.नंदा घाबरली. निलेश अलगद बोटं तिच्या गालावर ठेवणार तोच बालानं बुलेट स्टार्ट करत दरवाज्यासमोर उभी करताच नंदानं निलेशच्या पायावर जोरात पाय आपटत निघण्याची खट्याळ खूण केली. पायावर दणका बसताच निलेश महामुश्कीलीनं निघाला.
निलेश गठ्ठा घेत बुलेटवर बसला.
रस्त्यात बाला कुठं कुठं जायचं ते सांगत होता पण निलेश नुसता हूं हूं करत होता. त्याचं मन छापखान्यातच अडकत मागे राहिलं होतं.
बुलेट जाताच नंदाचा रोखून धरलेला संयम सुटला. तिनं खुशीनं खुर्चीतच उडी मारली. 'निलेश...! निलेश..!' कोलाहलात कितीदा हे नाव पुकारलं गेलं होतं पण आपणास हे नाव का लक्षात आलं नाही याचच तिला राहुन राहून आश्चर्य वाटू लागलं.
माकड आज आपणास पाहताच किती बावरलं! मग परवा मॅसेज केल्यावर का रागावलं होतं हे तिला कळेना. पण काही ही होवो. दोन वर्ष आपण जे शोधत आलोय तो अनमोल खजाना गवसल्याच्या आनंदातच ती अंघोळीला वर पळाली.
मित्राकडं बुलेट उभी करताच बालानं निलेश कडून गठ्ठा घेत पत्रिका काढली व तो पत्रिका पाहून बुचकळला. पत्रिका वेगळीच. नंदानं दुसराच गठ्ठा दिलेला पाहताच बालाचा संशय बळावला. नंदानं निलेशसारखाच ठेवलेला डिपी व आता छापखान्यात दोघांचं वागणं पाहून निलेशला किल्ल्यावर भेटलेली मुलगी नंदाच असावी ही त्याची खात्री झाली. पण तरी बालानं मौन पाळत मित्राकडं थांबत त्यानं आग्रहानं केलेला नाश्ता घेतला व पत्रिका न देताच परतला.
बुलेट पुन्हा घराकडे वळली तरी बाला निलेशला एक शब्दही बोलला नाही.
छापखान्यात आता नाना काका होते.
" नाना, मायडेनं घाईगर्दीत दुसराच गठ्ठा दिला वाटतं!" बाला बोलला.
" काय सांगतोय! नंदाकडनं अशी गफलत कधीच होणार नाही!" नाना विश्वासानं बोलले व परत वर चढत नंदाला बोलवू लागले.
नंदानं नुकतीच अंघोळ उरकली होती. फ्रेश होत ती खाली आली. बाला व निलेशला पाहताच चक्रावण्यासोबत सुखावली.
" काय झालं बाप्या?"
" काय झालं काय? नीट पाहत नाही का दुसराच गठ्ठा देतांना?"
आता मात्र नंदा व निलू दोघांनी जीभ चावली. नंदाला आपली चूक लक्षात आली. एकमेकाकडं पाहतांना आपण दुसराच गठ्ठा दिला हे तिच्या लक्षात आलं. निलेशलाही बाला मित्राला पत्रिका न देता माघारी का आला हे कळलं व तो छापखान्याबाहेर आला.
बाला कॅबीनमध्ये घुसला.
" मायडे, काॅलेजला असतांना तुमची सहल दौलताबादला गेली होती का गं?" गठ्ठा उचलणाऱ्या नंदास बालानं विचारलं.
" हो! पण का असं एकदम का विचारतोय?"
" काही नाही मायडे! तिथं तुझ्यावर माकडांनी हल्ला केला होता का?"
आता मात्र नंदास दरदरुन घाम फुटला.
" तुला कसं माहीत?" चाचरतच नंदा विचारती झाली.
" तुझ्या या डिपीवरून!" बालानं आपल्या मोबाईल मधुन तिचाच डिपी दाखवत तिला सांगितलं.
नंदानं थरथरत खाली मान घातली.
" डिपीतला मुलगा हा निलेशच ना?"
"................" नंदानं काही न बोलता हळूच मान वर केली.
बाला काय ते समजला.
" बाप्या......"
" मायडे घाबरू नकोस." बाला एवढं बोलला नी नंदानं आपल्या चुलत भावास रडतच कडकडून मिठी मारली.
" मायडे, तो माकड ही दोन वर्षापासुन तुलाच शोधतोय!"
नानाची चाहूल लागली व बाला गठ्ठा घेत निघाला. नंदास एकदम हलकं वाटू लागलं. एकवेळ तिला बालाची भितीच वाटली होती. पण उलट बालानं धीर देताच ती सुखावली.
बालानं एका वर्षापासून सोबत असलेल्या निलूची अवस्था पाहिली होती .पण निलूच्या त्या अवस्थेस आपली चुलत बहिणच कारणीभूत आहे हे बालासही माहीत नव्हतं. नी आता माहीत झाल्यावर नंदाचीही तीच अवस्था समजल्यावर क्षणात त्यानं आपल्या मित्रास नंदासाठी योग्य समजत स्विकारलं.
दिवसभर पत्रिका वाटल्यावर रात्रीचं जेवण दोघांनी मित्रासोबत बाहेरच घेतलं. जेवणं आटोपताच टल्ली झालेले मित्र एकेक निघाले. बाला मुद्दाम माघारी थांबला. निलेश व बाला कधीच घेत नसत हे दोघांना माहीत होतं व आजही मित्रांनी घेतली तरी दोघांचा घेण्याचा प्रश्नच नव्हता. सारे गेल्यावर निलेश उठण्याची तयारी करू लागला.
" निलेश बस थोडावेळ. एक विचारायचंय तुला?"
निलेश ला मनात सकाळपासून जी भिती होती ती वेळ अखेर आली हे निलेशनं ओळखलं.
" काय?"
" सकाळी छापखान्यात मायाला पाहताच तुझी भंबेरी का उडाली?" बालानं थेट विषयालाच हात घातलाय पाहताच निलेश गारच झाला.
क्षणभर तो थरथरला, घाबरला.
समोर शत्रुशी लढणं एकवेळ माणूस सहज लढू शकतो. पण असल्या नाजुक प्रसंगात आपल्या माणसाशीच कसं लढावं हे कठीणच. निलेशनं त्याही स्थितीत शांत होत विचार करत क्षणात सरळ जे आहे ते सांगण्याचं ठरवलं.
" बाला, दोन वर्षांपासून जे शोधत होतो ते गवसलं.पण त्या गवसण्यात तु कायमचा दुरावू नकोस...."
" माकडा, गाढवा! गेल्या वर्षभरापासून माझ्याच मायडे साठी मी तुला सपोर्ट करतोय हे मला का कळू दिलं नाही?" बालानं निल्याची काॅलरच पकडली.
" बाला, तुझी मायडेच नंदा आहे हे तु ही कधी बोलला नाही."
बालानं निल्याचा हात गच्च हातात धरला. हे पाहताच निलेशची धडधड कमी झाली व त्यानं बालास मिठी मारली.
" निल्या माकडा एक वर्ष सोबत राहून सहज शक्य असणारी भेट माहीत नसल्यानं मलाही घडवता आली नाही. पण आता तुझा शोध संपला. मला आमच्या मायडे साठी तुझ्यासारखा साथीदार हवाच आहे मात्र आमचे नाना काका हा एक मोठा अडथळा ठरू शकतात.
बाला चिंतेनं बोलला.
" बाला मला तुझीच भिती होती. पण आता तुझ्या मायडेस व नाना काकास मी एका बारात पटवतो बघ तू!"
घरी परतत बाला व निलेश झोपू लागले. निलेशनं झोपता झोपता मोबाईल वर एक नजर मारली.
" *माकड* !"
नंदाचा मॅसेज पाहिला.
"" निलेशनं थरथरत रिप्लाय केला. क्षणात हिरव्या रंगात टाईपिंगचं नोटिफिकेशन दिसलं नी चॅटींगच्या विविधरंगी रंगात मृग बरसायला सुरुवात करणारीआख्खी रात्र भिजत राहिली.
ऐन लग्नाच्या धामधुमीत मृग वेळेवर बरसला म्हणून बजा अप्पाच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा पसरली. पण त्यातल्या त्यात लग्न वाडीत असल्यानं घाबरण्याचं कारण नव्हतं. लगीनघाईत मृग आणि निलू ,नंदाची बरसात सोबतच सुरू होती.
निलेशची आयपीएसची पूर्व परीक्षा झाली होती व साईडवर लेखी परीक्षेचं नोटीफिकेशन पडून बरेच दिवस झाले होते. ड्युटीवरुन परततांना व प्रवासात त्याचं फाॅर्म भरणं बाकीच होतं. इथं येताच दोन दिवस तो बाला सोबत पत्रिका वाटतच फिरत होता.
सकाळीच त्यानं बालाला सांगत खाली सायबर कॅफेत आला. तसा मॅसेज रात्रीच त्यानं केला असल्यानं नंदा हजर होतीच.
छापखान्यात दोन तीन माणसं येऊन सकाळची कामं उरकत होती. त्यानं माणसाकडं व खुर्चीत भिंगाचा चष्मा चढवून काही तरी लिहीत बसलेल्या नानाकडं पाहून मुद्दाम मोठ्या आवाजात " फाॅर्म भरायचाय ..."
" या..या.. नाव नोंदवा रजिस्टर ला व एक नंबर डेस्कला बसा!" नंदा मुद्दाम एकदम कोरड्या स्वरात बोलली.
" बालाचा मित्र ना तू? काय तुझं नाव?" नाना चष्म्यातून वर बघत विचारते झाले.
" होय नाना, मी नीलेश आमोणकर. बालासोबतच द्रास सेक्टरला आहे."
" तेच. मग बस ना त्यात काय विचारायचं. दोन दिवसांपासून तू बालासोबत राबतोय पाहुणा असून पाहतोय मी! नंदा त्याला मदत कर गं!" सांगत नाना कामानिमीत्त बाहेर पडले.
डेस्कवर बसत निलूनं साईडवर लाॅग इन केलं. नंदाच्या खुर्चीसमोरच लागुन डेस्क. माणसं छापखान्यात कामात व नाना ही गेले ही संधी साधत नंदा निलूकडे पाहू लागली.
" फाॅर्म भरायला साईड नको तितका वेळ खाऊ लागली. साईड चालत नाही सबबीखाली नंदा मदतीसाठी जवळ बसली व माहिती भरु लागली. सारी माहिती काढली गेली. चॅटींग तर सुरू होतीच. पण पुन्हा प्रत्यक्ष दबक्या आवाजात नावासोबत गाव, घरी कोण कोण, काय करता, पुढे काय करणार, अपेक्षा, सारी सारी माहिती काढली जाऊ लागली. जिचा फाॅर्मशी काहीही संबंध नव्हता. एका तासानंतर नाना परत आल्यावरच आधीच भरलेला फाॅर्म कसाबसा सबमीट झाला व निलू हसतच उठला.
निलू बालाच्या लग्नात घरच्या माणसासारखा राबू लागला. टिला दादासोबत बाजार आण, गावात जा, फुलहारवाल्यास सांग, फोटोवाल्यास भेट, काही लागलं की बुलेट काढत एखाद्याला घेत वस्तू आण, असल्या कामात राबू लागला.
बालाला हळद लावण्याच्या वेळेपर्यंत निलू बजा काका, टिलू दादा, सरू वहिणी, साऱ्यांचाच ओळखीचा व आवडता झालाच सोबत शिस्तप्रिय व कुणाशीच लगट न करणाऱ्या गजा नानाच्याही नजरेत भरला.
बालाला हळद लावतांना कामाच्या गडबडीत धावणाऱ्या निलूकडे पाहत गजा नानानं आपल्या बजा अप्पाकडं
" पोरगं खूपच गुणी दिसतंय" असा शेरा मारलाच.
बालाला सरु वहिणीनं हळद चोपडली तशी नंदाची दोन बोट गडबडीत निलूच्या गालावर कधी रेखाटती झाली हे निलूशिवाय कुणालाच कळलं नाही.मग निलू तरी कसा मागे राहिल. गडबडीत त्याचीही हळद माखली बोटं गालावर फिरलीच.मोगऱ्याच्या वासात हळदीचा वास नाही पण रंग भरला गेला. तो वास व रंग श्वासात भरत दोघे हळदीच्या रात्री बालासोबत बेधुंद होत नाचली.
सकाळी वऱ्हाडी हवेलीतून वाडीकडे निघू लागले. टिला व निलेशच्या तर वाडी व हवेली फेऱ्या चालूच होत्या. नंदा सवरली व वाडीकडं निघण्यासाठी उभी राहिली. जाणाऱ्यांची गाडी भरली तिला जागा मिळालीच नाही.
" आता मी कशी जाऊ?" ती मुद्दाम लटक्या स्वरात विचारु लागली. तोच टिलाचं लक्ष बुलेटवर निघणाऱ्या निलूकडे गेलं. त्यानं खूण करत थांबवलं. नंदा हळूच बुलेटवर बसली. हेच तर चॅटद्वारे ठरलं होतं. इरकली साडी नेसलेली, मोगऱ्याचा गजरा माळलेली नंदा आज वेगळीच भासत होती. वाडीचा रस्ता सकाळपासून फेऱ्या मारून पाठ झाला असुनही त्यानं रस्ता चुकवला.
गाडी गल्ली बोळातून फिरत राहिली. मागे बसलेल्या नंदास हा प्रवास असाच अनंत काळापर्यंत साथीनं चालत रहावा असंच वाटत होतं.
" निलू.....!"
" ......." निलुच्या कानात सुरमई सरगम बरसू लागल्या.
" निल्या...!"
"............" पुन्हा सरगम छेडली गेली तरी तो शांत हळुवार पणे गाडी चालवत होता.
" निल्या माकडा बोल ना!"
" तु माझं नाव घेतांना सरगम छेडल्याचाच भास होतो. म्हणून ऐकत रहावं असंच वाटतंय गं."
" माकडा, बालाचं लग्न होताच घरात माझ्या लग्नाची गडबड सुरू होणार. आज जळगावचा कुणीतरी डाॅक्टर आहे त्याचे आई वडील येत आहेत. त्यांनी पसंत करताच मुलगा येईल पहायला व सनई वाजवत नेईल, तु बस सरगम ऐकत मग!"
निलेशनं बुलेटचा वेग कमी करत थांबवली. वस्ती संपत पुढे वाडी दिसत होती.
" अरे व्वा. मग तर लवकरच आणखी एक लग्न खायला मिळणार. हळदीला नाचायला मिळणार" निलेश थट्टेनं म्हणाला पण त्याच्या अंतरात कुणीतरी ओरखडा ओढतंय असा भास त्याला झालाच.
" निलेश आज जर त्यांना मी पसंत पडली तर ते मुलास लगेच आठ दिवसात पाठवणार आहेत" आता नंदाच्या सुरात काळजी डोकावत होती.
" तुला करायचंय ना लग्न?"
" करायचंय पण माकडा तुझ्याशी!" नंदा ठासून बोलली.
" बस मग त्या मुला आधी मी माझ्या आई वडीलांना घेऊन येईनच!" निलेशच्या डोळ्यात वेगळीच रग उतरली.
" निलू, मी वाट पाहीन....! येशील ना?" आर्ततेने नंदा विचारू लागली.
" मी पुन्हा येईनच...!"
गाडी वाडीत आली तोवर स्टेजवर तेरावं मंगलाष्टक सुरू झालं होतं. निलू व नंदानं गडबडीत अक्षता घेत स्टेज गाठलं. पंधरा ....सतरा....... होत लग्न लागलं तशा वाद्याच्या गजरात बाला शुभ्रावर अक्षता पडल्या. तशाच अक्षता नंदानं निलूवर व निलूनं नंदावर फेकल्या. गर्दीतल्या गजा नानांना भिंगाच्या चष्म्यातून ते दिसलं. पण त्यांनी त्याकडं दुर्लक्ष करत दुरचे नातेवाईक असलेले दौलतराव कुसुरकर व त्यांच्या पत्नी यांना उठवत स्टेजवरील नंदाकडं नेलं. नंदाला पाहताच त्यांना मुलगी पसंत न पडण्याचं कारणच नव्हतं. सुस्वरुप व बी. ए. एम. एस असलेली नंदा त्यांनी एम. एस. असलेल्या नंदन साठी पसंत असल्याच गजा नानास सांगत लवकरच नंदनला पहायला पाठवण्याचं कळवलं.
लग्न झाल्यावर निलू परतण्या आधी बालानं काकाकडं नाही पण काकीकडं विषय काढला. काकीनं नंदनला तर पाहीलंच नव्हतं पण निलूला आठ दहा दिवसांपासून पाहत आलेली. तिला निलू आवडला होता. शिवाय आपली नंदा निलू व बालासोबत असल्यानं बालाच्याच निगराणीत राहिल म्हणून काकीनं बालास "मी तुझ्या काकांना विचारते" सांगितलं.
संध्याकाळी गजा नानानं निलूस जवळ बसवत सहज गप्पाच्या ओघात त्याचं कुळ, मामाचं कुळ, मामाचं गाव ही चौकशी केली. निलूनं मामा नाहीत पण आजोळ जळगावचं व आजोबाचं कुळ गिमोणकर सांगितलं. आजोबांचाही तुमच्यासारखाच छापखाना होता हे सांगितलं. हे ऐकताच गजा नानाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी आजोबाचं नाव विचारलं.
" शुभंकर गिमोणकर!" निलूनं आजोबाचं नाव सांगितलं नी गजा नानाची तळपायाची आग मस्तकात गेली. नस तडतड तडकली. ते अचानक उठले व घरात चालते झाले.
निलूला नानास अचानक काय झालं कळेना.
शुभंकर गिमोणकर ....
छापखाना..जळगाव....सारं तेच.
तरी त्यांना मनात एक आशा होती की हे गिमोणकर ते नसावेत. पण तरी घरात त्यांनी नंदाच्या आईस साफ न सांगता नंदासाठी जळगावच्या डाॅक्टरचच स्थळ योग्य असल्याचं मोघम सांगितलं.
काकीनं मात्र दोघांना पाहू देत पसंत करू देत नंदास जो मुलगा योग्य वाटेल त्याला होकार देऊ, असा मनोमन विचार करत बालास निलूच्या आई वडिलांना येऊ देण्यास रूकार भरला.
.
.
बाला दक्षिण भारतात हनीमूनला निघाला. तसा निलूही खुशीनं औरंगाबाद ला परतला.
पण गजा नानाची शुभंकर गिमोणकर नाव ऐकल्यापासून झोप उडाली.
.
.
क्रमश...
. वा.....पा....