योगी महाराजांनी त्यांना माहित असणारा अकल्पिताचा पूर्ण इतिहास तेजा समोर जसाच्या तसा कथित केला. तो ऐकत असताना तेजा मात्र त्या विश्वात पूर्णपणे हरवून गेली होती. एव्हाना दुपार होत आली होती. कडक उन्हाचा चटका अजून सर्वाना जाणवत होता. योगी महाराज त्या शंभो महादेवाच्या मंदिरात शांत बसले होते. समोर तेजा हरवलेल्या अवस्थेत तिथेच बसून होती. अचानक त्या भर दुपारच्या रणरणत्या उन्हात बदल जाणवू लागला. बघता बघता मागापासून स्वच्छ प्रकाशाने तापलेल्या उन्हाची जागा काळ्या गडद ढगांनी घेतली. चोहो बाजूला अंधार दाटून येऊ लागला. वातावरणात अचानक होणार बदल पाहून तिथे असणारी आसपासची लोक अचंबित झाली. कारण आजवर कदाचित त्यांनी असा अचानक होणारा बदल कधी पहिलाच नसावा. अचानक दाटून येणाऱ्या अंधाराचा अंदाज योगी महाराजांना आला. त्यांनी समोर असलेल्या तेजाकडे पाहिले. त्यांना जाणीव झाली कि काहीतरी विचित्र आणि भयानक प्रकार इथे घडणार आहे. पण नेमके काय घडेल याचा अंदाज मात्र त्यांना बांधता येईना.
काळ्या कुट्ट ढगात आता हळू हळू वीज कडकडू लागल्या. अनामिक अशा विचित्र घडामोडींना त्यावेळी सुरवात झाली. वीजांचा जोर वाढू लागला. पाहता पाहता वीजा जोरजोरात कडाडू लागल्या. कानठळ्या बसतील असाच तो आवाज होता. लोक सैरभैर झाले. मिळेल तो आसरा शोधू लागले कारण कोणत्या क्षणी कडकडणारी वीज खाली कोसळेल याचा अंदाज कोणालाच बांधता येत न्हवता. जो तो ते भयानक वातावरण पाहून थरथरून गेला होता आणि त्या थरथरण्याचा लवलेश तिथे असणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. अगदी तिथे असणाऱ्या योगी महाराजांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक अनामिक भीती जाणवत होती. काय घडेल याचा विचार करत असतानाच वर असणाऱ्या काळ्या ढगातून एक विचित्र अशी सावली मंदिराच्या दिशेने सरसर झेपावत असलेली दिसू लागली. कोणाला काही कळायच्या आतच ती सावली मंदिराच्या आवारात पोहचली होती. जशी ती सावली त्या आवारात पोहचली तशी तिथे आसपास असणारे प्राणी पक्षी मोठमोठ्याने चित्कारु लागले. सैरभैर होऊन ते सर्व इकडे तिकडे पळू लागले. ती सावली आता हळू हळू स्थिर होऊ लागली. हळू हळू त्या सावलीने एक आकार घेतला. तो आकार एका मानवासारखा होता. योगी महाराज निरखून त्या सावलीला पाहू लागले. जसजशी ती सावली रूप घेऊ लागली योगी महाराजांना अंदाज येऊ लागला कि ती सावली नेमकी कोणाची आहे.. "वीरसेन" योगी महाराजांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. हा नक्कीच वीरसेन आहे. योगी महाराजांना आता खात्री झाली. ते त्या सावलीला पाहून थरथरले.
ती सावली आता पूर्णपणे स्थिर झाली. एका मानवी आकृतीत ती सावली स्थरावली होती. तो राजकुमार वीरसेनच होता. त्याची आत्मा आज पुन्हा एकदा अवतरली होती.
ती सावली आता पूर्णपणे स्थिर झाली. एका मानवी आकृतीत ती सावली स्थरावली होती. तो राजकुमार वीरसेनच होता. त्याची आत्मा आज पुन्हा एकदा अवतरली होती.
"वाह.. योगी महाराज.. वाह.. अगदी बबरोबर ओळखलंत तुम्ही... हाहाहाहा.. " एक गडगडाटी हास्य करत वीरसेन बोलला. तिथे असणारे आजूबाजूचे लोक हा प्रकार पाहत स्तब्ध उभे होते. इच्छा असतानाही ते कोणतीही हालचाल करू शकत न्हवते.
"तू... का आला आहेस तू इथे?" योगी महाराजांनी प्रश्न केला.
"अरे वाह योगी महाराज... मी इथे का आलोय? कारण तुम्हाला माहिती आहे.. ज्यासाठी तुम्ही इथे आलात त्याच साठी मी पण इथे आलोय.. तुम्हाला काय वाटले..? तुम्ही तिला परत शोधाल आणि मला ते माहिती होणार नाही.. अहो इतकी वर्षे तुमच्या मागे यासाठीच तर फिरतो आहे.. शेवटी सापडलीच ना ती तुम्हाला..." वीरसेन.
"सापडली... नाही वीरसेन... ती सापडली नाहीये.. तिने तिचा मार्ग मला दाखवला आणि मी इथे आलोय..: योगी महाराज
"काहीही असो.. पण तुमचे कार्य संपले आता माझे कार्य बाकी आहे... अकल्पिता...... कुठे आहेस...? समोर ये तू... इतकी वर्षे तुला संपवायच्या या एका उद्देशानेच मी अजून असा फिरतो आहे.. पण आज माझी इच्छा पूर्ण होईलच... हाहाहाहा" पुन्हा एकदा तेच गडगडाटी हास्य...
योगी महाराज पुढे सरसावले.. त्यांनी वीरसेनला विरोध करण्यासाठी आपल्या शक्तीचा वापर करण्याचा निर्णय घेतला पण त्यांचा तो प्रयत्न वीरसेनने लगेच ओळखला आणि योगी महाराज काही करणार त्या अगोदरच त्यांच्यावर हल्ला केला. तो हल्ला इतका जबरदस्त होता कि योगी महाराजांना काही समजायच्या आतच ते हवेत उंच फेकले गेले आणि दूरवर जाऊन पडले. तो प्रहार पाहून त्यांना जाणीव झाली कि वीरसेन अचाट शक्तीने भरलेला आहे. ते काहीच करू शकत नाहीत. ते स्वतःला सावरू लागले. तोच अचानक तेजा भानावर आली. तिला समोर दूरवर पडलेले योगी महाराज दिसले. ती इकडे तिकडे पाहू लागली. भोवतालचे बदललेलं वातावरण पाहून ती थोडी गोंधळली होती. काय झाले आहे आणि काय चालले आहे हे तिला समजेनासे झाले. ती धावतच योगी महाराजांच्याकडे गेली. त्यांना सावरू लागली. योगी महाराज तिला अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते. कारण जोपर्यंत ती मंदिराच्या उंबऱ्याच्या आत होती वीरसेनला तिची भनक लागलेली न्हवती. पण जशी तेजा योगी महाराजांना सावरण्यासाठी बाहेर पडली तशी तिची चाहूल वीरसेनला लागली. तेजा योगी महाराजांना उठवत असतानाच योगी महाराज बोलले...
"मुली... तू बाहेर पडायला नको होतस.. तिथेच आत तू थांबायला हवं होत.."
"काय बोलत आहेत तुम्ही.. हे काय झालं आहे तुम्हाला.. काय चाललं आहे?" तेजा प्रश्नार्थक नजरेने बोलत असतानाच वीरसेन तिच्या पाठीमागे पोहचला..
"हाहाहाहा.. हीच का ती...? अकल्पिता..." एकदम भयंकर असा तो आवाज ऐकून तेजाला जाणीव झाली कि काहीतरी भयानक प्रकार इथे चालू आहे आणि अकल्पिताचे नाव ऐकून तिला समजले कि हा नक्कीच वीरसेन असावा.. ती काही बोलणार इतक्यात वीरसेनने तिच्यावर हल्ला केला.. तेजाला एक जोरदार धक्का बसला आणि ती दूरवर फेकली गेली. काही समजायच्या आतच तिच्यावर झालेला हा हल्ला अनपेक्षित असाच होता.
"तुला माहित नसेल कदाचित पण तूच अकल्पिताचा अवतार आहेस हे मला नक्कीच माहिती आहे.. आणि म्हणूनच मी इथे आलोय.. युझ अंत झाला तर अकल्पिता पुन्हा येऊच शकत नाही... आणि मग मला माझ्या कार्यात कोणतीच अडचण बाकी राहणार नाही..." इतके बोलून वीरसेन जोरजोराने हसू लागला.
स्वतःला कसबस सावरत तेजा उठू लागली. वीरसेनच बोलणं ऐकून ती थोडीशी घाबरली होती. ती काही बोलणार तोच वीरसेनने आपल्या अघोरी शक्तीचा वापर करून एक जोरदार प्रहार पुन्हा एकदा तिच्यावरती केला. यावेळी तेजा हा प्रहार सहन करू शकली नाही. ती तिथेच खाली कोसळली. वीरसेन तिच्या जवळ आला आणि तिला पाहून गडगडाटी हसू लागला.. थोडा वेळ तो तिला पाहत उभा राहिला.. आणि अचानक वरती ढगात झेपावला.. तो गेला आणि ते काळे कुट्ट ढग धूसर होऊ लागले. वातावरण पूर्ववत होऊ लागले. सर्व काही शांत झाले. पुन्हा उन्ह पडले. पण... पण तेजा मात्र निस्तेज त्या आवारात पडली होती.. योगी महाराज स्वतःला सावरत पुढे झाले आणि निस्तेज पडलेल्या तेजाला पाहून रडू लागले.. त्यांना काहीच समजत न्हवते काय करावे... त्याचवेळी गर्दीतून तेजाचे आई वडील पुढे सरसावले.. इतका वेळ झाला तेजा आली नाही म्हणून ते मंदिरात आले होते.. पण समोर घडत असलेला प्रकार पाहून त्यांना काहीच समजेनासे झाले होते.
शंभो महादेवाच्या त्या मंदिरच्या आवारात चंदननगरचा उरलेला शेवटचा आशेचा किरण मावळत असलेला दिसू लागला.. योगी महाराज हतबल होऊन गुडघ्यावर बसले आणि रडू लागले... काय झाले हे? हे त्यांनाच समजत न्हवते. निस्तेज पडलेली तेजा पाहून तिचे आईवडील तिथेच बेशुद्ध पडले.. गर्दीतील कोणाला काहीच काळत न्हवते. जो तो एकमेकांकडे पाहून काय करावे याच विचारात पडला होता...
क्रमशः