ब्रम्हास्त्र भाग-- १
....साधारणतः ३५ वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे. माझा एक मित्र चतुर्वेदी हा अणुशक्ती केंद्रामध्ये शास्त्रज्ञ ह्या पदावर कार्यरत आहे. त्याची पोस्टिंग काही कारणासाठी बंगलोर इथे झाली होती. आता त्या एरिया चे नाव मला नीटस आठवत नाही परंतु त्याने मला तिकडे येण्यासाठी आमंत्रण दिल्यामुळे ७ ते ८ दिवसांसाठी मी तिकडे जाण्याचे ठरवले होते. मित्रासोबत काही काळ घालवता येईल आणि बंगलोर पण पाहता येईल ह्या हेतूने मी गेलो होतो. त्याला राहण्यासाठी अणुशक्ती केंद्रानेच कॉटर्स पूरवले होते. ते कॉटर्स म्हणजे स्वतंत्र रो-हौसेस होते. त्यांच्या आजूबाजूला बाग करण्यासाठी जागा आणि प्रत्येक कॉर्टेर ला स्वतंत्र आणि सर्वांमिळून एक तारेचे स्वतंत्र आणि सामायिक असे सिमेंटच कंपाउंड होते. ते कॉटर्स जिथे होते त्या भागातून पुढे एक रस्ता जंगलाच्या दिशेने जात होता. तो रस्ता साधारणतः १.५ किलोमीटर चालल्यानंतर झाडांची गर्दी वाढत होती आणि मुख्य जंगलाला सुरुवात होत होती. परंतु जंगलाला सुरुवात होण्यापूर्वी साधारणतः ५०० मीटर आधी एका ठिकाणी त्या रस्त्याला पुढे तीन फाटे फुटून ते तिन्ही रस्ते जंगलाच्याच दिशेने जात होते. रस्त्याला ते तीन फाटे फुटल्यामुळे मूळचा रस्ता पकडून तिथे चार रस्ते तयार झाले होते. त्याच जागेवर वर रस्त्याच्या डाव्याबाजूला एक खूप मोठं आणि खूप जून वडाच झाड होत आणि त्या वडाच्या झाडाखाली एक साधारणतः मोठा पण एखाद माणसाला खूपच कष्टाने हलवता येईल असा एक गोल आकाराचा दगड होता. त्या दगडाचा रंग साधारणतः लालसर होता. ते तिन्ही रस्ते पुढे जंगलात जाऊन गुडूप होत होते. जंगलाचा तो भाग खूप शांत असा होता. तिकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती. मधूनच पक्षांचे आणि मधेच दूरवरून प्राण्यांचे आवाज ऐकू यायचे. कोर्टर पासून पुढे निघणाऱ्या त्या रस्त्यावरून कोणीही वाहन वगैरे घेऊन जात नसल्यामुळे तिथले वातावरण खूप शांत, थंडगार आणि आल्हाददायक वाटायचे. तिथे संपूर्णपणे सावली असल्या कारणाने सकाळी सकाळी लोक जॉगिंग ला जात असतं, पण तरीही तूरळक आणि ठराविक माणसेच असायची, त्यांत माझा मित्र पण त्याच्या कुत्र्याला घेऊन वॉक ला जायचा. ते दिवाळीच्या आधीचे दिवस होते आणि काही दिवसांनी लक्ष्मीपूजनाची अमावस्या येणार होती. मी ज्यादिवशी त्याच्याकडे पोहोचलो त्या दिवशी रात्री मला जागा नवीन असल्यामुळे कि काय ते माहित नाही पण नीट झोप येत नव्हती आणि आली तरी ती वरवरचीच वाटत होती. माझी झोपायची खोली जंगलाच्या दिशेकडेच लागून होती. बाहेर सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरला होता आणि स्ट्रीटलाईट चाच काय तो जरासा पिवळसर प्रकाश पडत होता. साधारणतः १२ वाजले असतील, मी धड झोपेत ही नसेन आणि जागाही नसेन अशा अवस्थेत मला असे वाटत होते की लांब जंगलाच्या दिशेकडून कसलातरी ढोल ताशा वाजवल्यासारखा आवाज येउ लागला होता. मधेच आवाजात विचित्र असे काही दुसरे आवाज पण मिसळत असावेत असे वाटत होते. आवाज मधेच थांबत होता मधेच चालू होत होता त्यामुळे माझी सारखी झोपमोड होत होती. आवाज जरी खूप दूरवरून जंगलाच्या दिशेने येत होता तरी जरा विचित्र असल्यामुळे झोपेत बेचैनी जाणवत होती आणि वेगवेगळी स्वप्न पडून मानसिक अस्वस्थता जाणवत होती.
......अशीच मला परत कधी गाढ झोप लागली ते कळले नाही आणि माझ्या मित्राने मला हाक मारून उठवले. त्यावेळी सकाळचे ६ वाजून ३० मिनिटे झाली होती. तो म्हणाला की जा फ्रेश हो आपण वॉक ला जाऊया. सकाळी ७ वाजता मी, माझा मित्र आणि त्याचा कुत्रा जिमी असे तिघेजण वॉक ला जायला निघालो. चालत असताना मला रात्रीच्या अनुभवाची आठवण झाली म्हणून मी त्याला संगीतले कि इथे कुठे जवळपास काही लग्न इत्यादी कार्यक्रम होता का. त्याची प्रश्नार्थक मुद्रा पाहून मी त्याला कालच्या प्रकाराबद्दल संगीतले असता तो म्हणाला की तू म्हणतोस ते खर आहे! मलाही काही दिवसांपासून असेच आवाज येत आहेत. तो म्हणाला की, मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली परंतु ह्याबद्दल कोणाला काही माहित नाही आणि इतर कोणालाही तसला कुठलाच आवाज ऐकू येत नाही. तो पुढे म्हणाला की, पुढे चल मी तुला अजून काहीतरी दाखवतो. थोड्यावेळाने आम्ही जिकडे चार रस्ते एकत्र येतात त्या जागेवर पोहोचलो असता बरोबर रस्त्याच्या मध्यभागी एक मोठा गोल लालसर दगड पडला होता आणि त्याच्या खाली अनोळखी पक्षांची पीस, लिंबू, मिरच्या, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, फुलांचे हार, सुकामेवा, कोळसे, जळालेली लाकडे, नारळ असे सर्व पडलं होतं. ते सर्व बरोबर रस्त्याच्या मध्यभागी पडल्यामुळे जाण्यायेणाऱ्या लोकांना खूप त्रास होत होता आणि त्या दगडाला वळसा घालून जावं लागतं होत. ते बघून मी माझ्या मित्राला म्हटलं की हे काहीतरी भलतच दिसतेय चल जाऊया इथून. मी तिथून निघायची घाई करत होतो तरी तो तिथून हलायला तयार नव्हता आणि जरावेळाने हसला आणि म्हणाला "की काय तू ह्या असल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवतोय, आणि पुढे म्हणाला की चल जरा मला दगड हलवायला मदत कर. हे सर्व रोजचंच झाल आहे. रोजचा जाता येताना त्रास होतोय. सर्वाना दिसतंय पण कोणी त्याला हात लावत नाही म्हणून मग मीच तो कसातरी रोज तीकडून हलवून त्या झाडाखाली नेऊन ठेवतो. आज तू आल्यामुळे मला तुझीही मदत होईल." ते ऐकून मला त्या थंडीच्या दिवसातही घाम फुटला कारण कि मला लहानपणापासूनची शिकवण होती की लिंबू , हळद, कुंकू इत्यादी रस्त्यात दिसल तर त्याला हात लावणं तर सोडाच पण त्याच्यापासून चार हात लांबच राहायचं आणि इथेतर त्या ह्या सर्व वस्तूंनी माखलेल्या दगडाला मला हात लावायचा होता. मला असं विचारमग्न पाहून तो म्हणाला की अरे काय करतोयस चल लवकर, घाबरू नकोस मी आहे ना तुला काही होणार नाही. मग आम्ही दोघांनी मिळून तो दगड त्या झाडाखाली नेऊन ठेवला आणि लिंबु, मिरची इत्यादी सामान माझ्या मित्राने पायाने उडवून लावले. ते सर्व पाहून, करून मला कसंतरीच वाटत होतं, पण मी काही बोललो नाही. परंतु ते सर्व करत असताना मला एक जाणवलं की जिमी मात्र खूप अस्वस्थ वाटत होता आणि विव्हळल्यासारखं करत होता.
.....त्यानंतर एखादं तासाने आम्ही घरी आलो, फ्रेश झालो. काहीवेळाने माझा मित्र कामावर जायला निघाला आणि मला म्हणाला की तू पण चल माझ्याबरोबर! आज मला हाल्फ डे आहे तर तुला कुठेतरी रमणीय ठिकाणी ड्रॉप करतो आणि येताना पिकअप करिन. तुझा पण वेळ जाईल आणि घरात बसून तसहि तू कंटाळशील. खरंतर मला त्याच्या बरोबर जायची अजिबात इच्छाच नव्हती, आणि का कोण जाणे पण मला खुप अस्वस्थ वाटत होते आणि सारखा त्या दगडाचाच विचार राहून राहून माझ्या मनात येत होता. तरीही मी त्याच्याबरोबर निघालो आणि दुपारी ४ च्या दरम्यान परत आलो. ह्यावेळी बाहेर पडल्यावर मात्र मला खूपच प्रसन्न वाटत होते आणि अस वाटत होते की परत घरी जाऊच नये पण जस मी घरी परत आलो तस वाटू लागलं की आता परत बाहेर कुठेच जाऊ नये आणि गेलोच तर परत वॉक ला जावं. अशा वेगळ्याच कुठल्यातरी मनस्थितीत मी अडकलो होतो. मला असे वाटत होते की माझा माझ्या मनावरचा ताबाच गेला आहे. सतत मला कसलीतरी ओढ लागली होती पण ती कसली होती हे मात्र कळत नव्हते. पाहता पाहता गप्पागोष्टी, जेवणखाण इत्यादी मध्ये वेळ कसा निघून गेला काही कळले नाही आणि रात्रीचे नऊ वाजून गेले होते. साधारणतः १० वाजता मी सर्वांचा निरोप घेऊन झोपायला गेलो. आधी आधी मला नीट झोप येत नव्हती पण नंतर कधी झोप लागली ते कळलेच नाही. रात्री किती वाजले असतील ते माहित नाही पण मला एक स्वप्न पडले (ते मला नंतर सकाळी आठवले). स्वप्नात मला असे दिसले की मी एकटाच परत जंगलाच्या दिशेने वॉक ला जात होतो. त्यानंतर चालताना मला चार रस्त्यांवरची ती जागा लांबून दिसत होती आणि तिथे कसलीतरी हालचाल जाणवत होती म्हणून मी क्षणभर थांबलो आणि एका झाडाच्या आडून तिकडे नक्की काय चाललेय ते पाहण्याचा प्रयत्न करू लागलो, तेव्हा मला दिसले की आम्ही सकाळी बाजूला केलेला तो दगड परत कोणीतरी रस्त्याच्या मध्यभागी ठेवला होता आणि त्याच्या भोवती काही लोक, कोण माहित नाही काहितरी करत होते. ते लोक इतर माणसासारखे नव्हते. त्यांची उंची सामान्य माणसांपेक्षा खूप जास्त असेल आणि त्यांनी पूर्ण काळे कपडे घातले असावेत. क्षणभर मला असे वाटले की त्यातल्या काही लोकांना मी दिसलो आणि त्यांच्यात एकच कुजबुज होऊन ते मला पकडायला येतात कि काय म्हणून मी घाबरून पळू लागलो असता मला ठेच लागली आणि मी तिथेच मातीती पडलो आणि माझ्या खिशाला लावलेलं पेन तिकडे पडलं ते तिथेच सोडून परत उठून पळायला लागलो. थंडीमुळे दव पडल्याने माती जराशी ओली झाली असल्याने माझ्या हाताला आणि पायाला लागली परंतु त्याची पर्वा न करता मी पळतच होतो आणि अस करता करता मला अचानक जाग आली आणि मला कळलं की ते स्वप्न होते आणि मग मला खुप बर वाटल.
......मला जाग आली तेव्हा मी सहज घड्याळा कडे पाहिले तर रात्रीचे ३ वाजून गेले होते आणि माझ्या घशाला कोरड पडली होती म्हणून मी पाणी पिण्यासाठी उठलो तर काय आश्चर्य की माझ्या हाताला काहीतरी लागले होते आणि नीट निरखून पाहिले असता मला कळले की ती लाल रंगाची माती होती. मला खूप आश्चर्य आणि भीती वाटली म्हणून मी पायाच्या अंगठ्याकडे पाहिले असता तो सुजून लाल झाला होता. झाल्या प्रकाराचा विचार करत करत मी परत बिछान्यावर अंग टाकले आणि झोप येण्याची वाट पाहू लागलो. बऱ्याच वेळाने मला झोप लागली नाही लागली तोच मित्र मॉर्निंग वॉक साठी उठवायला आला होता. ६ वाजुन ३० मिनिटे झाली होती. तो म्हणाला की फ्रेश हो आपण वॉक ला जाऊया आणि कालच्याच प्रमाणे ७ वाजता आम्ही तिघे वॉक ला निघालो. त्यादिवशी मला वॉक ला अजिबातच रस वाटत नव्हता कारण रात्रीच जागरण आणि ते स्वप्न असावं असं मला वाटत होतं. स्वप्नाची आठवण येताच ते मित्राला सांगाव अस मला वाटलं आणि मी सांगणार तेवढ्यातच तो म्हणाला अरे हे बघ परत हा दगड कोणीतरी रस्त्याच्या मध्यभागी आणून ठेवला आहे. चल मदत कर आपण तो बाजूला करून ठेऊया. मी त्याला नकार न देता पण नाईलाजानेच त्याची मदत करून तो दगड बाजूला करून ठेवला आणि आजूबाजूला पडलेली पक्षांची पिसे जाडीबुटी इत्यादी पायाने उडवून लावली. हे सर्व करत असताना मला कालचे माझे स्वप्न आठवत होते. तीकडूनच सर्व क्रियाकर्म आटोपून आम्ही परत निघालो असता नकळत पणे एके ठिकाणी माझ्या पायाला परत त्याच ठिकाणी ठेच लागली आणि मी विव्हळून खाली पाहिले असता त्या दगडाच्या बाजूलाच माझ्याच पेन सारखा दिसणारा एक पेन पडला होता. मी तो पेन नकळतपणे उचलला आणि माझ्या खिशाला लावला. मला ते सर्व प्रकार खूपच विस्मयकारक वाटत होते. त्यादिवाशीचा दिवस पण आदल्या दिवशी सारखाच गेला आणि रात्र झाली तसा मी सर्वांचा निरोप घेऊन झोपायला गेलो. रात्री परत मला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले त्या मुळे मला नीट झोप येत नव्हती. मी खूपच अस्वस्थ झालो होतो परंतु आजचे आवाज हे खूप मोठ्या प्रमाणावर येत होते आणि असे वाटत होते की आजूबाजूला खूपच थोड्या अंतरावर काहीतरी असावे जिकडून ते आवाज येत आहेत. साधारणतः रात्रीचे २ वाजले असतील, आवाज खूपच असह्य झाल्याने शेवटी मी बिछान्यातून बाहेर पडलो आणि घराच्या बाल्कनीत आलो. कॉटेज च्या आजूबाजूचा परिसर सोडला असता बाहेर सर्वत्र सामसूम झाली होती आणि सर्व परिसर गुडूप अंधारात बुडाला होता. सर्व काही निशब्द, शांत आणि काही प्रमाणात भेसुर वाटत होते. बाहेर गेट वर रखवालदार पण पेंगत होता. मला सारखा हाच प्रश्न पडत होता की इतका मोठा आवाज कोणालाच कसा ऐकू येत नाहीय. मी निश्चयाने मनाशी काहीतरी ठरवून सोबत ब्याटरी आणि माझ्याजवळ असणारी माझ्या गुरूदेवांनी दिलेली मंतरलेली विभूती घेऊन गॅलरी च्या बाहेरच्या बाजून असलेल्या जिन्याने खाली उतरलो आणि आवाजाच्या दिशेने चालू लागलो.
......गेट वर येऊन पाहतो तर काय रखवालदार गाढ झोपेत होता. गेट च्या बाहेर भयाण अंधार पसरला होता. दूरवरून कुठूनतरी एखाद्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज कानी पडत होता. मी गुपचूप गेट चा आवाज न करता जंगलाच्या दिशेने चालू लागलो. जसजशी मी पाऊले पुढे पुढे टाकत होतो तो आवाज कमी कमी होत होता. मी ज्यावेळी त्या चार रस्त्याच्या जागेपासून २०० पाऊले लांब होतो तेव्हा तो आवाज पूर्णपणे बंद झाला होता. मी एक झाडाच्या मागे जाऊन उभा राहिलो. मला दिसले की त्या जागेवर काहीतरी हालचाल जाणवत होती, ती माणसे कोण होती, काय करत होती काहीच कळत नव्हते. मी एक झाडाच्या मागे उभा राहून चोरून सर्व पाहत होतो. इतक्यात परत मोठमोठ्याने नगाऱ्यासारखे आवाज ऐकू येऊ लागले. वाजवणारे कोणीच दिसत नव्हते परंतु कानठळ्या बसवणारे आवाज येत होते आणि ते माणसासारखे दिसणारे लोक आता त्या दगडाच्या बाजूला केलेल्या एका मोठ्या रिंगणाच्या बाजूला फेर धरून नाचत होते. ह्यावेळी त्यांनी मला कदाचित पाहिले नसावे असे मला वाटत होते. तितक्यात अंधारातून एक अघोरी साधुसरखा दिसणारा एक माणूस बाहेर आला आणि हातवारे करत तोंडाने काहीतरी बोलू लागला. त्यानंतर तो हातवारे करत करत आमच्या कोर्टर च्या दिशेनेच काहीतरी दाखवत पुटपुटत होता. मला ते सर्व अनभिज्ञ होते परंतु मनातून सारखे वाटत होते की आपल्याला किंवा आपल्या मित्राला काहीतरी धोका निर्माण होणार आहे. त्यानंतर त्या लोकांनी तिकडे एक बोकड आणला आणि त्याला कापून त्याच्या रक्ताची धार त्या दगडावर आणि त्या रिंगणात सोडली आणि त्या अघोरी सारख्या दिसणाऱ्या माणसाने त्या बोकडाचे कापलेले मुंडके तोंडाला लावून तो रक्त पिऊ लागला. हे सर्व पाहून मला कसेतरीच होऊ लागले आणि मला असे वाटले की सर्व काही माझ्याभोवतो गोलगोल फिरत आहे. म्हणून मी तिथून कसातरी लडखडत पडत ठेचकाळत घराकडे निघालो. घरी आल्यानंतर मला खूपच अस्वस्थ वाटत होते. अंगातील सर्व त्राण नीघून गेलेत असे वाटत होते. साधारणतः रात्रीचे ३ वाजून गेले होते आणि रखवालदार झोपलेलाच होता. मी घरात येऊन गादीवर अंग टाकले आणि झोपी गेलो. सकाळी मला जेव्हा जाग आली तेव्हा सूर्य खूपच वर आला होता, मी घड्याळाकडे पाहिले तर ८ वाजून गेले होते. मला खूप आश्चर्य वाटले की आज माझ्या मित्राने मला वॉक साठी कसे उठवले नाही तितक्यातच वहिनी तिकडे आल्या आणि म्हणाल्या की भाईसाहब इनको जरा डॉक्टर के पास लेके जाओ कल रात से इतकी तबीयत बहोत खराब है। मी त्यांच्या खोलीत आलो आणि मित्राला पाहिले तर त्याचा चेहरा खूप पांढरा पडला होता, डोळ्याभोवती काळी वर्तुळ आली होती आणि पायांना सूज आली होती. एक रात्रीत हे इतक सर्व कसं काय झाले ह्याचा मी विचार करत असताना वहिनी रडू लागल्या. मि त्यांना धीर देत म्हणालो भाभीजी आप क्यो रो रही हो सब ठीक हो जायेग तेव्हा त्यांनी दरवाजाकडे बोट दाखवले असता मी पाहिले की अंगणात त्यांच्या कुत्र्याला कोणीतरी तोंड फोडून मारून टाकले होते. खूपच भीषण दृश्य होते ते. सगळीकडे साधारण सुकलेल्या रक्ताचे थारोळे जमले होते आणि बघ्यांची गर्दी जमली होती. कोणितरी पोलिसांना पण वर्दी दिली होती. सर्वाना हाच प्रश्न पडला होता की कसेकाय आतमध्ये येऊन कोणीतरी कुत्र्याचा जीव घेतला होता.
.......तेवढ्यात वहिनी म्हणाल्या की "तभि मे इनको हमेशा बोलती थी के ऊस पत्थर को हात मत लगाओ.. पर मेरी ये कभी सूनेंगे तोही ना"। मी काहीच बोललो नाही परंतु आता मलाही खुप भीती वाटत होती. मी माझ्याकडची थोडीशी विभूती त्याच्या कपाळाला लावली आणि जराशी त्याला खायला दिली तशी त्याला तरतरी वाटायला लागली. तो माझ्याकडे पाहत होता पण त्याची नजर एकदमच थंड वाटत होती. त्यानंतर आम्ही डॉक्टर कडे गेलो. डॉक्टर बोलले की फक्त अशक्तपणा मुळे हे झाले आहे थोडा आराम केला की दोन तीन दिवसांत बरे वाटेल. पण मला डॉक्टरांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास वाटला नाही म्हणून मी बाहेर पडून माझ्या गुरुजींचे स्मरण केले आणि मनोमनच त्यांना झालेली सर्व हकीकत कथन केली आणि माझ्या मित्राची मदत करायची प्रार्थना करू लागलो. अचानक गुरुजींचा मानसिक संदेश आला, ते म्हणाले की गेले दोन ते तीन दिवसांपासून मी तुला मानसिक संदेश पाठवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु तू त्या वाईट जागेपासून जवळच असल्याने तुझ्यापर्यंत पोहोचतच नव्हता. तुझ्या आणि तुझ्या मित्राच्या जीवाला धोका आहे आणि आज शेवटच्या दिवसातले फक्त काही तास तुमच्या दोघांकडे बाकी आहेत. म्हणून आज तू तुझ्या मित्राला कसेही करून हॉस्पीटल मध्ये ऍडमिट करून घे किंवा आजची रात्र तुम्ही दोघे कुठें दुसरीकडे राहा आणि तू मी सांगतो तसे कर. मी इकडून पाहतो की काय करता येऊ शकते. असे म्हणून त्यांनी मला काय काय करायचे ते सांगितले. त्या दिवशी मी डॉक्टरांना सांगून माझ्या मित्राला ऍडमिट करून घेतले आणि वहिनींना तिकडेच बोलावून घेतले. मी वहिनींना सांगितले की आज रात्रि घरी थांबून मी त्यांच्या मुलांची काळजी घेईन आणि तुम्ही इथे हॉस्पिटल ला थांबा. काहीं emergency असेल तर त्वरित कोणाकरवी तरी मला निरोप पाठवा असे म्हणून मी गुरुजींनी दिलेल्या विभूतीची एक छोटी पुडी करून मित्राच्या खिशात ठेवली व म्हंटले की फक्त मला विश्वास आहे म्हणून तू हे जवळ बाळग. त्यादिवशी रात्री माझ्या मित्राची तब्बेत खुपच बिघडली होती. डॉक्टरांना पण आश्चर्य वाटत होते की हे असे कसे काय होत आहे. मी घरी आलो होतो, इतक्यात परत मला गुरुजींचा मानसिक संदेश आला असता ते मला म्हणाले की खरंतर ते जे काय आहे त्यांना हरवणे तुझ्या अवाक्या बाहेरचे आहे म्हणून इथे खरेतर माझी गरज आहे पण आता ती वेळ निघून गेलीय म्हणून मी तुला एक मंत्र सांगतो. हा मंत्र खूप मोठा आहे म्हणून लगेच तुला पाठ करता येणे किंवा त्याची शक्ती आपल्यात सामावून घेणे ही शक्य नाही कारण त्यासाठी तुला कित्येक महिन्यांची साधना आवश्यक आहे परंतु आता वेळ नसल्याकारणाने मी माझ्या गुरुदेवांशी चर्चा करून तो मंत्र इथूनच शक्तीपात करून तुला देण्याचे ठरविले आहे. परंतु हा मंत्र घेणे तुला महागही पडू शकते. कारण जर का तू तुझ्या आयुष्यात एखादा जरी अश्लाघ्य अपराध केला असेल तर तात्काळ तुझ्या शरीराला विकलांगता येऊ शकते म्हणून विचार कर वेळ फार कमी आहे. मि त्यांना तात्काळ होकार दिला तसे त्यांनी मला मांडी घालून डोळे बंद करून मुर्ध्वज्योतिकडे ध्यान केंद्रित करायला सांगितले व काहीही झाले तरीही मी सांगे पर्यंत डोळे उघडु नकोस अशी आज्ञा दिली.
......काहीतरी अलौकिक क्रिया चालू झाली होती. ती घडत असताना मला काही अगम्य अशा मंत्रांचे ध्वनी ऐकू येऊ लागू लागले होते आणि असे वाटत होते कीं काहीतरी उष्ण अशी शलाका माझ्या माकड हाडाकडून शिरून वरती माझ्या डोक्याकडे जिकडे मी ध्यान केंद्रित केले होते तिकडे हळूहळू सरकत येत होती. मधेच पूर्ण शरीराला झिंनझिण्या येत होत्या तर मधेच हवेत उडल्यासारखं वाटत होते तर मधेच जमिनीवर सारपटल्यासारखं. मधेच डोक्याला ठणके मारत होते तर कधी अंग खूपच गरम झाल्यासारखं वाटत होतं तर कधी चक्कर येऊन उलटी येईल असे वाटून उठवेसे वाटत होते परंतु गुरुदेवांची आज्ञा असल्या कारणाने मी तसाच बसून होते. काहीवेळाने ते सर्व थांबल आणि अस वाटलं की काहितरी अज्ञात शब्द, उच्चार, वर्ण माझ्यामध्ये प्रवेश करत आहेत, माझ्या मनात डोक्यात फिरत आहेत, काहीतरी अज्ञात गूढ आणि अनंत काळापासून चालत आलेली आणि कित्येक जन्माची वारसा लाभलेली एक गूढ अशी प्रज्ञा माझ्यामध्ये प्रवेश करत होती असा अनुभव येत असताना अचानक मला एक जोराचा झटका जसा लागला आणि मी बेशुध्द झालो. कितीवेळ झाला असेल माहिती नाही आणि मला अचानक कोणाच्या तरी आवाजाने जाग आली, मी चमकून आजूबाजूला पाहिले तर कोणीच दिसले नाही पण मला असे जाणवले की तो कोणाचा आवाज नसून माझे गुरुजी मानसिक संदेश पाठवत होते त्याचा आवाज मनात घुमत होता. गुरुजी म्हणत होते की तिकडे जा आणि ती विभूती त्या दगडावर आणि रिंगणात टाक. अजून त्यांची विधी चालू व्हायला ३ तास उशीर आह तो पर्यंत तुझे काम आटोपून बाजूच्याच झाडामागे लपून रहा आणि तुझ्याभोवती विभूतीच वर्तुळ काढ त्यातून बाहेर पडू नकोस. मी फटाफट आवरले आणि सोफ्यावर बसून कामाची उजळणी करू लागलो, पण का कोण जाणे अचानक मला चक्कर सारखी येऊन गाढ झोप लागली. झोपेत मला एक स्वप्न पडले आणि त्यात दिसले की मी सर्व आवरून घराबाहेर पडलो आणि २० मिनिटाच्या आताच त्या जागेवर जाऊन पोहचलो. आता तिकडे कोणीच नव्हते परंतु तो दगड परत रस्त्याच्या मध्यभागी येऊन पडला होता आणि त्याच्या बाजूला कधीही न पाहिलेलं पूजा साहित्य पडलं होतं. आता हळू हळू नागऱ्यासारखा आवाज पुन्हा येऊ लागला होता.
.......मी त्या दगडाशेजारील वर्तुळाजवळ पोहोचलो आणि विभूती काढून डोळे मिटले आणि गुरुदेवांचे नाव घेतले तसे काहितरी अज्ञात मंत्र माझ्या ओठावर स्फुरु लागले. त्या मंत्रांमुळे माझे पूर्ण शरीर गरम झाले होते आणि डोळे जळजळायला लागले होते. मी कुठल्यातरी अज्ञात मितीत प्रवेश करत होतो असे मला वाटत होते. मी गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे ती विभूती त्या वर्तुळात आणि त्याच्या भोवती टाकली आणि काही त्या दगडावर टाकली आणि तिकडून लांब जाऊन ठरलेल्या झाडामागे लपून माझ्याभोवती विभूतीचे वर्तुळ काढून कोणालाही न दिसणार असं बसून राहिलो. काही वेळाने त्या ठिकाणी तेच माणसासारखे दिसणारे लोक जमा व्हायला लागले. मी निरखून पाहिले असता मला दिसले की त्यांची तोंडे काळ्या कापडाने झाकली होती आणि डोळ्यांच्या ठिकाणी कदाचित अंधारामुळे असेल पण काहीच दिसत नव्हते. ते अगम्य भाषेत काही तरी बडबडत होते आणि त्या वर्तुळात आणि दगडावर फुले पाने आणि इतर पूजेचे साहित्य आणि आणलेल्या कोंबड्या काही प्राणी इत्यादी मारून टाकत होते. हे सर्व बघून मला भीती वाटत होती, मधेच वाईट वाटत होते परंतु ते जसजसे मंत्रांचा घोष वाढवत होते तसतसे वातावरणात विचित्र बदल घडत चालले होते, वातावरण कुंद होत होते, एक वेगळाच कुबट वास सर्वत्र पसरत चालला होता. हे सर्व होत असतानाच माझ्याही शरीरात एक वेगळीच उष्णतेची लाट पसरत चालली होती, एक वेगळीच चेतना पसरत चालली होती त्यामुळे माझ्यात एक वेगळाच संचार होऊन मला खूप सामर्थ्यवान झाल्यासारखं वाटत होतं. मला असे वाटत होते की कोणीतरी माझ्याकडून काहीतरी वदवून घेत आहे. अचानक परत ते मंत्र माझ्या ओठावर स्फुरु लागले होते त्यामुळे माझ्या आजूबाजूचे वातावरण शुद्ध होऊ लागले होते. आता त्यांची क्रिया अत्यंत पराकोटीला पोहोचली असतानाच अचानक अंधारातून तो मागे दिसलेला तोच साधु बाहेर आला आणि तोही काहीतरी अगम्य भाषेत बडबडु लागला. इतक्यात मला झोपेतून जाग आली आणि दिसले की मी घरीच असून आजूबाजूला कोणीच नव्हते आणि कोणीतरी माणूस मला जोरजोरात हाका मारून उठवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला वहिनींनी पाठवले होते आणि तो म्हणाला की माझ्या मित्राला आता अतिदक्षता विभागात ठेवले आहे तर तुम्हाला आणि मुलांना तंबोडतोब हॉस्पिटल ला बोलावले आहे. मी फक्त हो करून त्याला खुणेनेच पुढे जायला सांगितले आणि दुखाने डोळे मिटून घेतले असता माझ्या डोळ्यातून दोन असावे खाली घरंगळत गेली. मी परत डोळे उघडले आणि पहातो तर काय मी जंगलात त्या झाडाच्या मागे त्याच जागेवर बसलो होतो आणि तो साधू त्या दगडाच्या जवळ उभा राहून काहीतरी मंत्र पुटपुटत होता. मला नक्की काय होतंय हेच कळत नव्हते. नक्की स्वप्न काय आणि खरे काय समजत नव्हते. पण ते समजण्याची ही वेळ नव्हती. परत मला माझ्या मित्राची आठवण आली आणि अतीव दुःखाने मी माझा हात बाजूला असलेल्या एक दगडावर आपटला असता एक मोठा आवाज होऊन त्या दगडाला मोठी भेग पडली आणि माझ्या हाताचा ठसा त्यावर उमटला. मी दगडाकडे निरखून पाहात असताना अचानक त्या ठिकाणाहुन एक वेगळाच अमानवी पण घारीसारखा आवाज असणारा एखादा पक्षी ओरडावा तसा आवाज आसमंतात घुमला आणि माझी नजर तिकडे वळली असता मला असे दिसून आले की ते सर्व लोक माझ्याकडेच पहात होते. माझे अस्तित्व त्यांना कळून आले होते आणि मी तिकडे पहात असतानाच माझी आणि त्यांची नजरानजर झाली असता त्या साधूनेही माझ्याकडे क्रोधीत नजरेने कटाक्ष टाकून मला पकडण्यासाठी इशारा केला. त्याच्या इशाऱ्यामुळे त्यांच्यापैकी दोघेजण माझ्यावर चाल करून मला पकडण्यासाठी आले परंतु त्यांचा हात माझ्या पासून १ फुटांवर असतानाच ते मला हात लावणार इतक्यात फट असा आवाज होऊन ते मागच्या बाजूला फेकले गेले आणि गतप्राण झाले.
......त्यांना गतप्राण झालेले पाहून तो साधू भयंकर क्रोधीत होऊन जास्तच आरडाओरड करू लागला आणि स्वतःच माझ्यावर चाल करून येत असतानाच अचानक त्यांच्या माणसांमध्ये एकाच कोलाहल होऊन ते आपापसात काहीतरी कुजबुज लागले आणि त्या रिंगणाकडे पाहू लागले तसे त्या साधूचे डोळे अजूनच चमकले आणि मला तिथेच सोडून तो परत रिंगणकडे जायला वळला. अचानक खूप जोराचा वारा वाहायला लागून पालापाचोळा उडू लागला होता. हवेचा जोर इतका वाढला होता की मी त्या रिंगणाच्या बाहेर खेचला जाऊ लागलो. मी झाडाला घट्ट पकण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काही उपयोग न होता अखेर मी माझ्या रिंगणाच्या बाहेर पडून त्या शैतानी रिंगणाकडे खेचला गेलो असता तीच वेळ साधून त्यांनी मला पकडुन त्या गोल दगडाला बांधून टाकले. आता मात्र मला माझे मरणच समोर दिसु लागले होते म्हणून मी मनातल्या मनात गुरुदेवांचा अजूनच धावा करू लागलो होतो. मी त्या रिंगणकडे पाहिले असता मला असे दिसले की त्या रिंगणाच्या वर आकाशातून काहितरी वस्तू खाली खाली येत होती. ती वस्तू म्हणजे एक खूप मोठा म्हणजे साधारणतः हत्तीसारख्या आकाराचा पक्षी होता. ज्याला एकच मोठा बदकासारखा पाय असून त्याला टोकदार नखे असलेली तीन बोटे होती. त्याला दोन डोके होती पण दोन्हीमिळून मध्यावर एकच लालभडक डोळा होता आणि तो डोळा १८०° च्या अंशात फिरत होता. आता तो पक्षी माणसासारखं बोलत होता आणि माझ्याकडे पहात होता. परंतु तो एकदम खाली न येता त्या रिंगणावरच अधांतरी तरंगत होता आणि सभोवार पाहत होता. त्या पक्षाने वर तरंगत असतानाच परत एकदा त्याच्या पंखांची हालचाल केली असता परत खूप वादळ आल्यासारखे होऊन आजूबाजूची झाडे हलु लागली होती आणि एकप्रकारचे वादळ तिकडे निर्माण होऊ लागले. तिथे जमलेले ते सर्व लोक आणि तो साधू त्या पक्षाकडे बघून त्याला अभिवादन करण्यासाठी गुडघ्यावर बसले होते. तो साधू काही अगम्य आशा भाषेत त्या पक्षाकडे बघून काहीतरी सांगू लागला. कदाचित तो त्या पक्षाला त्या रिंगणात बसण्यासाठी सांगत असावा. परंतु त्या पक्षाला काहिकेल्या त्या रिंगणात बसता येत नव्हते. काहीतरी शक्ती त्याला तसे करण्यापासून परावृत्त करत होती. त्या साधूलाही हे का घडतेय ते कळत नव्हते. शेवटी त्या साधूने त्याच्या एका सेवकाला त्या रिंगणात जाण्यासाठी सांगितले. त्वरित त्या माणसाने त्या रिंगणात प्रवेश केला असता कररर असा आवाज होऊन खूप मोठा स्फोट झाला आणी तो माणूस रिंगणापासून दूर फेकला जाऊन तडफडत त्याने प्राण सोडला.
क्रमशः.....
कथा मोठी असल्याने एकाच भागात राहिली नाही म्हणून दोन भाग करावे लागले. दुसऱ्या भागासाठी खालील लिंक पाहणे

