लेखक - प्रा. दयानंद सोरटे
चेटूक - एक सत्यकथा - A True Horror Story |
दुपारी लंच झाल्यानंतर असेच आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आणि अचानक भुताच्या गोष्टींचा विषय निघाला. ऑफिसमधील एका मुलीने तिच्या आजी - आजोबांबरोबर घडलेला किस्सा सांगितला. तो मी या ठिकाणी कथन करत आहे.
तिचे आजी - आजोबा मुळचे कोकणातील.व्यवसायाने कुंभार असल्यामुळे त्यावेळी ते मातीपासून बनविलेल्या पणत्या , मडकी , देव - देवतांच्या मूर्ती हे बनवून गावोगावी फिरून विकत असत . कधी - कधीतरी दिवस मावळतीला आला तरी काहीही विकले जात नसे. म्हणून मग मिळेल तो भाव स्वीकारून घराची वाट धरावी लागत असे. असेच एकदा त्यांना दूरच्या गावावरून परतताना खूपच उशीर झाला. एकाला - दोघं असल्यामुळे तशी काही भीती वाटली नाही. पण बाई माणूस सोबत असल्यामुळे थोडी मनात रुखरुख होती. त्यावेळी सगळा प्रवास पायीच केला जायचा. डोक्यावर भली मोठी टोपली घेऊन त्यात मातीच्या वस्तू ठेवायच्या आणि गावोगावी आणि दारोदारी फिरून विकायच्या हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यामुळे त्यांनाही आता ते सरावाचे झाले होते. त्यादिवशी नेमकी अमावास्या होती त्यांना घरी येण्यास बरीच रात्र झाली. वाटेत एक गर्द झाडीचे जंगल लागायचे त्या जंगलातूनच वाट गेलेली होती. रस्ता तसा ओळखीचाच होता. पण डोळ्यासमोर दाट अंधार...,आजूबाजूला भयानक शांतता, समोरचं काही दिसायला मार्ग नाही , अंदाजाने पावले टाकत दोघंही एकमेकांचा हात धरून चाललेले. तितक्यात त्यांना त्या दाट अंधारात काहीतरी दिव्यासारखे चमकलेले दिसले. त्यांना वाटले कि काजवा वगैरे असावा. पण तो दिव्यासारखा प्रकाश त्यांना सतत दिसू लागला. त्या अंदाजावर ते त्या प्रकाशाच्या दिशेने चालू लागले. ते बराच उशीर चालून देखील त्यांना रस्ता काही सापडत नव्हता आणि जंगल काही संपत नव्हते. अनेक वेळा समोरचं काहीच न दिसल्याने दोघेही अनेकवेळा ठेच लागून खाली पडले. पण त्यांना काहीच सुधारत नव्हते. ते दोघेही त्या जंगलामध्ये रात्रभर फिरत होते. मग पहाटे पहाटे थोडं तांबडं फुटल्यावर थोडा अंधुकसा रस्ता दिसू लागला. तेव्हा कुठे ते त्या जंगलाबाहेर आले. त्यांनी उजेडात स्वतःला पाहिल्यानंतर आजोबांच्या गुढग्याला जखम होऊन त्या जखमेचे रक्त धोतराला लागले होते. आजीलाही हाताला अनेक ठिकाणी खरचटलं होतं . दुसऱ्या दिवशी त्यांना कुणीतरी सांगितलं कि ते चकव्याच्या तावडीत सापडले होते. पण त्यांनी एकमेकांचा हात न सोडल्यामुळे ते दोघेही सुरक्षित राहिले नाहीतर अनर्थ घडला असता.
सणासुदीच्या दिवशी किंवा लग्नसराईच्या काळात मातीच्या पणत्यांना जास्त मागणी असायची. त्यामुळे तेव्हा बऱ्यापैकी कमाई पण व्हायची आणि काही मोठ्या मनाची माणसं भरभरून तांदूळ किंवा इतर उपयोगी वस्तू देखील द्यायचे. अशाच एका वर्षी दसरा - दिवाळीच्या दरम्यान आजी - आजोबांना बरेचसे तांदूळ मिळाले होते. त्यामागे त्यांची मेहनत देखील होती. पण त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या एका बाईच्या डोळ्यात त्यांची हि प्रगती खुपत होती. ती बाई एकदा अशीच काहीतरी काम काढून घरी आली होती. तेव्हा तिने त्या तांदळाच्या भरलेल्या गोणी पाहील्या आणि तिची जळफड झाली. ती कसनुसे तोंड करून तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत तिथून निघून गेली.
त्यानंतर काही दिवसांनी आजोबा खूप आजारी पडले. त्यांना कुठेही बाहेर जाण्याची ईच्छा होत नव्हती. सतत अंथरुणावर पडून राहावसं वाटू लागलं. आजीलाही या गोष्टीची चिंता वाटू लागली. हे असंच चालू राहिलं तर घर चालवायचं कसं ? म्हणून ती देखील काळजीत राहू लागली. जोपर्यंत घरात तांदूळ होते तोपर्यंत ठीक होते पण तांदूळ संपल्यावर काय करायचे हा प्रश्न होता. म्हणून आजी स्वतः जवळपासच्या गावात जाऊन छोट्या - मोठ्या वस्तू विकू लागली. गावच्या बाजाराच्या दिवशी थोडीफार विक्री होत असे. आजोबांची अवस्था तर अतिशय बिकट झाली. त्यांना साधा भाताचा वास जरी आला तरी त्यांना मळमळ व्हायला सुरुवात व्हायची. आणि त्यामुळे त्यांना ओकारी येत असे. त्यांना होणारा त्रास पाहून घरामध्ये भातच शिजवायचा नाही असा आजीने निर्णय घेतला. भाताबद्दल आणि त्याच्या वासाबद्दल आजोबांना चीड निर्माण झाली होती. सहा महिने त्यांनी घरामध्ये भात शिजवला नाही. तरीदेखील आजूबाजूला कुठे भात शिजताना जर आजोबांना त्याचा वास आला तर आजोबांना ओकारी येऊन त्या ओकारीतून तांदूळ किंवा भात बाहेर पडत असे. हे म्हणजे एक नवलच होते. कारण, ज्या माणसाने मागील सहा महिन्यांपासून जर भात खाल्ला नसेल तर त्याच्या पोटातून भात किंवा तांदूळ बाहेर पडणे कसे शक्य आहे. ? घरातील सगळे विचारात पडले.
त्यांच्या वाड्यातील एक म्हातारी आजी एकदा त्याच्या घरी येऊन बसली होती आणि तिच्यासमोर आजोबांना एकदा तशाप्रकाराचा त्रास झाला. त्या म्हाताऱ्या आजीने लगेच ओळखले कि , हा काही वेगळाच प्रकार आहे. ती म्हातारी आजी म्हणाली कि, हे चेटूक केलेले आहे. आणि तिने तिच्यासोबत घडलेला एक किस्सा देखील सांगितला. त्या म्हाताऱ्या आजीच्या घरी देखील ती चेटूक करणारी बाई एकदा अशीच येऊन गेली. आणि ती नेमकी ती बाई म्हातारी आजी जेवण बनवायच्या आधी येऊन जायची . त्या म्हाताऱ्या आजीने तांदूळ शिजायला घातले कि, ती बाई तिथून लगेच आपल्या घरी जाऊन मूठभर तांदूळ शिजत घालायची. आणि प्रकार असा व्हायचा कि, त्या म्हाताऱ्या आजीने पातेलेभर तांदूळ शिजत घालूनही तिच्या पातेल्यात मूठभरच तांदूळ शिल्लक राहायचे. आणि त्या बाईचे पातेले भरून जायचे. हा प्रकार जेव्हा त्या म्हाताऱ्या आजीच्या लक्षात आला तेव्हा तिने एका दिवशी आपल्या पातेल्यात थोडे तांदूळ शिजत घातले आणि त्यात थोडी मानवी विष्ठा आणि गाईचे शेण घातले. दुसऱ्या दिवसापासून त्या चेटूक वाल्या बाईने तो प्रकार करणे बंद केला. आणि घरी येणेदेखील बंद केले. नक्की काय झाले असेल हे तुमच्या लक्षात आलेच असेल.
तेव्हा त्या आज्जीच्या सल्यानुसार आजोबांना जवळच्याच एका गावामध्ये जाणकाराला दाखविले. तेव्हा आजोबा बरे झाले. पण या त्रासाला कंटाळून आजोबांनी गाव सोडून मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. समाप्त.