सर्पकुल -भाग १- Marathi bhaykatha,marathi bhutkatha,marathi bhitidayak katha,horror marathi
© सचिन पाटील ®२०१८
तो काळोख तिला सवयीचा झाला होता. उजेडाची तिरीप तिला हल्ली नकोशी वाटे. अंधार.... कसा मोठ्या दिलाचा ! सर्व काही सामावून घेणारा आणि कोणालाही काहीच न सांगणारा.... सारी गुपिते जिरवणाऱ्या अंधाराचे पोट किती मोठे असेल, त्यात काय काय भरले असावे, त्याचे ते विशालकाय उदर चुकून फुटले तर काय अनर्थ माजेल ?? भारीच मज्जा ! काळोखातल्या आवाजांची दुनियाच न्यारी... श्वास आणि फुत्कार यातला फरक अंधारात कोण सांगू शकेल..प्राणांतिक वेदना विसरायला लावणाऱ्या भयाचा जन्मदाता तो अंधार.... असा काहीबाही विचार करून ती अंधाराइतक्याच काळ्याकभिन्न शिसवी खांबाला टेकून बसत होती.
मरणकळा पसरलेल्या त्या गावात असा भव्य दिसणारा वाडा म्हणजे आश्चर्यच होते. कमान शाबूत असली तरी बुरुजांना जागोजागी बिळ पडली होती. निगा न राखल्याने राठ झालेल्या डोक्यावरच्या केसांप्रमाणे वाळकं आणि पावसाळ्यात तेव्हढं हिरवं दिसणार गवत बुरुजावर वाढलं होतं. वाऱ्याच्या झुळकेसरशी ते डोलत होत तेव्हढीच काय ती वाड्याच्या जिवंतपणाची खूण ! एरवी तिथे माणसांचा, गुरांचा वावर फारसा नव्हताच. दिवसभरात काहीतरी निमित्ताने एकदोनदा वाड्यातल्या स्त्रिया अंगणात दिसत तेव्हढ्याच ! दोन पुरुष उंचीच्या भिंती आणि वाड्याच्या प्रचंड लाकडी प्रवेशद्वारामुळे बाहेरच्या लोकांना आत डोकावण्याची संधी नसे. मग ती आतल्या वातावरणाच्या गप्पा सांगताना यथेच्छ कल्पनाशक्ती वापरत असत. त्यातून वाड्याभोवतीचे रहस्याचे जाळे आणखीच गूढ झाले होते.
दोन वर्षांपूर्वी देशमुखांच्या वाड्यात वृंदाने सून म्हणून पाऊल टाकले होते. लग्नात अंतरपाट दूर झाला आणि समोर उभ्या असलेल्या हिरव्याकंच डोळ्यांच्या नवऱ्याला, सुभाषला पाहून ती बावरलीच. कमालीचे संमोहन होते त्याच्या डोळ्यात ! त्या जाळ्यात गुंतत असतांना सासूबाईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. नि कानात फुसफुसली..
सांभाळ ग पोरी... या देशमुखांच्या डोळ्याला नजर भिडवायची नाही. मग आपली नजर जागेवर उरत नाही.
तिचं म्हणणं शंभर टक्के खर होतं. वृंदा त्याच्या पदोपदी प्रत्यवाय घेत होती. तिचे सासरे, जेठ, दीर सगळी मुले एकजात गर्द हिरव्या डोळ्यांची ! तोंडापेक्षा डोळ्यांनीच अधिक बोलणारी... बाहेरून आलेल्या सुनांच्या डोळ्यांचा रंग फक्त काळा होता. एकमेकांशी जेवढ्यास तेव्हढे संबंध राखून असलेली ही देशमुख मंडळी काहीशी अजबच होती. ओढ्यातल्या पाण्यासारखी खळखळणारी वृंदा.. पण त्या वाड्याच्या गांभीर्याने तिचा अवखळपणा खेचून नष्ट केला होता. तिला अकाली पोक्त केलं होतं. त्याच कोणालाही काही वाटत नव्हतं. पण सर्वकाही समजून घेत वृंदा तिथे रुळली होती. होय.. रुळली पण मिसळली नव्हती. जंगलातल्या रानटी झुडपांच्या ढिगात चुकून कुलीन जास्वदीं वाढावी तशी वृंदा त्या चौसोपी अजागळ वाड्यात नांदत होती.
वृंदाला तिसरा महिना लागला होता. पण त्या वाड्याला त्याचा आनंद नव्हताच. तसेही आनंद, दुःख यांच्या पलीकडे सर्व देशमुख पोहचले होते. त्या निबर मनाच्या माणसांत राहून स्त्रियाही दगडी झाल्या होत्या. गर्भारपणाचे तेज अंगकांतीवर चढू लागलेल्या वृंदावर त्यापैकी एखादी उपकार केल्यासारखी नजर फेकायची. वृंदा कसनुसं हसण्याचा प्रयत्न करेपर्यंत ती पुढे निघून जाई. वृंदा पुन्हा खांबाला टेकून बसायची. त्या वाड्यात तिच्या जिवाभावाचा तेव्हढा एकच शिसवी खांब होता. बाकी लोकांची मने त्या खांबाहुन अधिक निसरडी होती.. थांग न लागू देणारी !
माहेरी जाऊन बाळंतपण करावं असं वृंदाला राहूनराहून वाटत होतं. इथे पहिलटकरणीच ना कौतुक होतं ना तिची विचारपूस ! तिचे डोहाळे पुरवणे तर दूरच राहिले. पण माहेर पडलं भुकेकंगाल.. त्यांना रोजच्या जेवणासाठी कितीतरी उस्तवार करावी लागायची. तिथे तरी आपलं कौतुक कुणाला असणार ? उगाच त्यांच्या छातीवर आपल नसत ओझं का टाकावं अशा विचाराने ती गप्प बसली. काय आणि किती विचार करायचा, कशासाठी करायचा... त्याने कोणाला काही फरक पंडणार आहे का असे प्रश्न स्वतःला विचारून ती उत्तरे शोधायची आणि त्या प्रयत्नात मनसोक्त दमछाक झाली की पोटाला कुरवाळत झोपी जायची. शेवटी पोटातला तो गोळाच तिचा भविष्यकाळ होता.
भर दुपारी त्या काळोखात वृंदा झोपली होती. वाड्यात निरव शांतता पसरली होती. वृंदाला पोटावर थंडगार स्पर्श जाणवला. वीतभर जाडी असलेला तो स्पर्श कसा सुखद भासत होता. तिच्या उदरातल्या गर्भाचा एकेक ठोका मोजावा तितक्या हळुवारपणे ते पुढे सरकत होते. गर्भाची चाहूल लागल्याप्रमाणे ते स्थिरावले. पोट घट्ट पकडून ते त्या गर्भाच्या अगदी जवळ जाऊ पाहत होते. त्याची पकड जाणवण्याइतपत घट्ट झाली तशी वृंदा भानावर येऊ लागली. तिने हातांची चपळाईने हालचाल करीत तो मुत्यूसारखा थंडगार स्पर्श झटकून फेकण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा विळखा... तो कमालीचा अनोखा होता. एकच वेळी नकोनकोसा आणि त्याच वेळी हवाहवासा ! त्याला हात लागताच वृंदा शहारली.. हा तर तोच स्पर्श.. यासाठीच तर आपण आसुसलोय ! घे.. घे.. मला घट्ट विळख्यात घे. या मर्त्य शरीराचा अणुरेणू पिळून टाक. त्याचसाठी आजवर हा देह जगवलाय.. नाहीतर इथे कोणाला किंमत आहे त्याची ?
वृंदाचे मन हेलपटू लागले. त्या विळख्याने पुरता ताबा घेतलाय आपला.. पण मग या पोटातल्या अंशाचे काय ? त्याचा काय दोष ! ते काही नाही.. हा विळखा सुटलाच पाहिजे.. तो गर्भ वाढलाच पाहिजे.. तिचे हात कठोरपणे त्या विळ्ख्याकडे गेले. तिने संपूर्ण ताकद एकवटून तो विळखा सोडवण्याचा प्रयत्न केला.
पण खरेतर त्याची गरजच उरली नव्हती. हवे ते कार्य सिद्ध झाल्यागत तो गार, लिबलिबीत विळखा सुटत गेला. स्वतःला त्याने वृंदाच्या ताब्यात दिल्याप्रमाणे मान टाकली. वृंदाने संपूर्ण अवसान एकवटून ते वेटोळे दूर फेकले. दाराच्या फटीतून आलेल्या उन्हाच्या चुकार कवडश्यांमध्ये तिने स्पष्ट पाहिले...
दहा हात लांबीचे ते अजस्त्र जनावर सरपटत फडा खाली घालून बाहेर पडत होते...
आतापर्यंत धीर दाखवणाऱ्या वृंदाने भयाने किंकाळी फोडली !
-क्रमश: