अवदसा भाग 7
प्रकृती आणि विकृतीमधल्या संघर्षाला कित्येक युगांची पार्श्वभूमी आहे. एकमेकांवर मात करण्यासाठी दोघांना एकाच माध्यमाचा आधार घ्यावा लागतो.... मनुष्यजात !
स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी असलेली इतकी हिडीस जमात ना पिशाच्चात असते ना प्राण्यात ! पिशाच्च काय, जशी वापरावी तशी वापरली जातात...त्यांना ना विवेकबुद्धी असते ना कृत्याची जाणीव...प्राण्यांच तरी काय वेगळं असतं हो ! मनुष्याच्या प्रार्थना जश्या दैवतांना देवत्व बहाल करतात तशाच प्रार्थना अमानवी शक्तींना अद्याप शाबूत ठेवून आहेत. मग देव आणि या अघोरी शक्तींना जो तो ज्याच्या वकूबाप्रमाणे मानू लागतो. दोघांच्या उपासनेच्या मागे मूळ प्रेरणा एकच....लोभाची, आशेची, अपेक्षापूर्तीची !
याच मार्गाचा मी ही एक पथिक होतो. ते देव, त्यांच्या कृपाकटाक्षासाठी करावयाची व्रतवैकल्ये...आणि त्यासाठी पहावी लागणारी वाट. सर्व काही उबग आणणारे ! किड्यामुंगीसारखी या पृथ्वीवर पसरलेल्या क्षुद्र मानवी जीवांपैकी बहुतेकांची पसंती देव म्हणवणाऱ्या तथाकथित सुष्ट शक्तींनाच...या भाविकांच्या अपेक्षाही त्यांच्यासारख्याच क्षुद्र ! आजारपण घालव, संपत्ती दे, संतती दे, दुःख निवारण कर...
माझी महत्वाकांक्षा कोणत्याच दैवताकडून पूर्ण होऊ शकणारी नव्हती. मला अघोरी साधनेकडे वळण्यावाचून पर्याय नव्हता. मला अखंड स्वामित्व हवं होतं. या क्षुद्र जगातील दीडदमडीची लोक मला कायम भीतीच्या सावटाखाली दिसायला हवी होती. त्यासाठी मला स्वतःची फौज तयार करायची होती. म्हणून मला वखवखलेल्या अतृप्त आत्म्यांना पुन्हा जन्म घ्यायला लावणे आवश्यक होते. त्यासाठीची सिद्धीही मी मिळवली होती. पण हा प्रयोग दुसऱ्याच्या हातून करून घेतला तर अधिक फलदायी ठरतो. म्हणून मी एकेक पात्र निवडून फासे फेकण्यास सुरवात केली.
लग्नात लहानग्या मुग्धाला पाहिले आणि मी थक्क झालो. ती एक सशक्त माध्यम होती. तिचा जन्मच कुयोगावर झाला होता. एक सुप्त अनैसर्गिक शक्ती तिला जन्मतः लाभली होती. या शक्तीची तिला जाणीव होण्यासाठी ती घराबाहेर पडणे आवश्यक होते. तिची अवदसा म्हणून झालेली संभावना मला चांगलीच उपयोगात आली. सरलाबाईंच्या अघोरी विद्येचा स्पर्श तिला झाला. आता मला डाव टाकणे आवश्यक होते....
तिच्या मनात माझ्या घरी येण्याची इच्छा मी तंत्राद्वारे प्रबळ केली. आईविना वाढलेल्या मुग्धाला अनेकदा स्वप्नात आईची प्रतिमा दाखवून भावनिक केलं. माझी भोळी बायको....मुग्धाच्या आईला या जगात जन्म घेऊ देण्यासाठी जीवाचं मोल द्यायला तयार झाली. ती जगूनही उपयोग नव्हता. माझ्या प्रयोगाआड ती आली असती. त्यामुळे सातव्या महिन्यापासून मारण तंत्राचा वापर करून मी तिला तीळतीळ संपवू लागलो. अवंतीच्या जन्मासोबतच तिच काम संपलं.. तसा तिचा अडथळाही मी दूर केला. मुक्ती लाथाडून पुन्हा जन्म घेण्याची आस असलेल्या अमानवी जीवांना आकृष्ट करण्याची मुग्धाची हातोटी बिनतोड असल्याचं सिद्ध झालं आणि माझ्या कुटिल योजनेच पुढचं पाऊल मी टाकलं..
अवंती...एक अनैसर्गिक प्रक्रियेतून जन्माला आलेलं बाळ ! तिची संहारक्षमता प्रचंड होती. त्याची चाचणी घ्यावी म्हणून मी सिद्ध केलेलं पिशाच्च तिच्यात प्रवेशल.. नसता चोंबडेपणा करणाऱ्या लिमयेना पहिलं लक्ष्य केलं. त्या रात्री अवंतीतल्या त्या पिशाच्चाने अमानवी ताकद लावून लिमयेची मान पिरगळली तेव्हा मी दारात उभा राहून तो तमाशा बघत होती. मला पाहून थक्क झालेल्या लिमयेबाई धक्क्यानेच गेल्या.. वाह ! काय सुंदर दृश्य होतं ते. माझ्या इशाऱ्यावर ते पिशाच्च त्या खोलीत धुमाकूळ घालत होतं. असली कितीतरी पिशाच्च मी मंत्राच्या सामर्थ्यावर खेळवणार होतो.
पण तो अंदाज चुकलाच म्हणायचा ! त्यादिवशी ते नवविवाहित दांपत्य माझे लक्ष्य कधीच नव्हते. अवंतीच्या शरीरातले ते पिशाच्च माझ्या नियंत्रणाबाहेर गेलं. ते दाखवून मला खिजवण्यासाठीच लिमये त्या रात्री घराबाहेर उभे होते. खरंच.. तो माझा सपशेल पराभव होता. कुठल्याही आदेशाशिवाय अवंतीने त्या पतीपत्नीला संपवलं.. मी मुळापासून हादरलो. तिच्यावरच माझं नियंत्रण घालवल कोणी ? उद्या अवंतीच माझ्या जीवावर उठली तर काय ?....मुग्धा.. होय मुग्धाच.. तिच्याशिवाय कोणी हे करणे शक्य नव्हते. म्हणजेच तिला माझा संशय आला नव्हता. पण त्याची खातरजमा करणे तिच्या आवाक्याबाहेरचे होते.
मूर्ख पोरगी ! तिचा संशय खरा ठरवण्यासाठी मला सरलाबाईंकडे पाठवून मोकळी झाली. कोणाच्याही मेंदूतल्या विचारांवर हुकमत गाजवण्याची क्षमता असलेला मी ! तिच्या पाकिटबंद पत्रातला मजकूर वाचू शकणार नाही असं वाटलंच कसं तिला ? अवंतीमधल्या त्या पिशाच्चाचे उच्चाटन करणं मुग्धाच्या आवाक्याबाहेरचे होते. म्हणून ते पिशाच्च घालवावे आणि या सर्व प्रकारामागे मी असल्याची खात्री झाल्यास माझाही नायनाट करावा असा सांकेतिक संदेश तिने पत्रातून दिला होता.. तसा कोणी सामान्य माणूस असता तर मुग्धा निश्चितच चलाख ठरली असती...
पण इथे गाठ माझ्याशी होती...
मला पाहिल्याबरोबर सरलाबाईंनी ओळखलं होतं. अघोरी विद्येत तिचा तेवढा अधिकार होताच. पण विवक्षित स्थळी नेल्याशिवाय मला संपवण तिला शक्य होणार नव्हतं...आणि सर्वात महत्वाचं म्हणजे...आपला सामना कोणाशी आहे याची तिला पुरेशी कल्पना आली नाही. ते पिशाच्च पुन्हा गर्भाशयात पाठवण्यापूर्वी तिने माझ्यावर ते सोडले. पण माझ्या सामर्थ्याच्या प्रभावाने ते परत फिरले. त्याला इप्सित स्थळी पाठवल्यानंतर सरलाबाईंना जिवंत ठेवण्याचे प्रयोजन उरले नव्हते.. माझा खरा चेहरा ओळखणारा अखेरचा चेहरा संपला होता. मी सहीसलामत परतलो हे पाहून मुग्धाच्या नजरेत माझं निरपराधित्व आपसूक सिद्ध होणार होते. मग तिला कह्यात घेऊन हवी ती कृत्ये करवून घेणं फार अवघड नव्हतं..
सरलाबाईंच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून मी परत निघालो. सर्व गोष्टी जुळून आल्या होत्या. हा फार उत्तम संकेत होता. माझी सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होणार होती. प्रवास करतांना सर्व घटनाक्रम आठवत असतानाच बस स्टँडवर पोहचली. खुशीत शीळ घालतच मी घरी आलो.
मुग्धा अवंतीला खेळवत होती. मला पाहून ती चकितच झाली. काही वेळाने तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले. मी अवंतीला उचलून जवळ घेतले.. तिचे निरागस डोळे, गोंडस चेहरा पुन्हा पुन्हा न्याहाळला. त्या पिशाच्चाच्या गवसणीचा मागमूसही उरला नव्हता. समाधानाची लहर अंगावरून फिरून गेली. तो संपूर्ण दिवस आम्ही खूप आनंदात घालवला.
पुढच्या योजनेची खूणगाठ मनाशी बांधत मी पहुडलो होतो. मध्यरात्र झाली होती. हॉलमध्ये पावले वाजली. मी डोळे मोठे करून पाहिले. मुग्धा येत होती. एवढ्या रात्री हीच काय काम असावं ? असा विचार करत असतांनाच ती शेजारी येऊन बसली. थरथरत्या स्वरात म्हणाली,
काका, मला माफ करा..मी तुमच्यावर संशय घेतला !
अग, काय झालं.. कसला संशय ? मी बेमालूम अभिनय केला असावा कारण आता तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते.
जाऊ द्या, मी सांगणार नाही आणि तुम्ही विचारणार नाही...वचन द्या पाहू ! तिने हात पुढे केला.
वेडाबाई, तू म्हणतेस तसं..काहीच विचारणार नाही. दिलं वचन ! तिच्या हातावर एक हात ठेवत मी दुसऱ्या हाताने तिचे अश्रू पुसले. ती हलकेच माझ्या कुशीत शिरली..
ती रात्र मला कमालीची सुखावून गेली. शरीराचा कण न कण रिता झाल्यासारखं वाटत होतं. मी जणू ढगांवर तरंगत होतो.
पहाटे जाग आली. शेजारी मुग्धा नव्हती. मग मी काही वेळ उगाचच पडून राहिलो... रात्रीचे ते धुंद क्षण आठवत !
काही वेळाने पुन्हा डोळे उघडले. उठू लागलो..
पाय हलायला तयार नव्हते. जणू मणामणाचे ओझे त्यांना बांधले होते. त्यांना काय झालय ते पाहण्यासाठी अंगावरील चादर बाजूला करू लागलो...हातात जीवच उरला नव्हता. एखाद्या प्रेतासारखा मी पडून होतो. आता मुग्धाला बोलावणं गरजेचं होतं.
मुग्धा...मी ओरडण्याचा प्रयत्न केला. पण घशात नुसतीच क्षीण खरखर झाली. मान आणि जीभ एका बाजूला कलली. असहायपणाच्या जाणिवेने डोळ्यातून अश्रू पाझरू लागले. काही मिनिटे गेली असावीत. मी डोळे शक्य तेव्हढे वर करून बघितले.
मुग्धा उभी होती. अवंतीला कडेवर घेऊन ! दोघींच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य रेंगाळत होते.
अरेरे...जाग आली का बाळाला ? मुग्धा खवचट सुरात म्हणाली. क्रोधाने माझ्या नाकपुड्या फुलल्या..
अरे बापरे..चिडले ग काका ! जिवात्मे जन्माला आणण्याचा भारी शौक ना तुम्हाला.. आता बसा कुक्कुल बाळ बनून ...ती खिजावत होती. पण शब्दात संताप भरला होता. डोळ्यात अंगार पेटला होता.
अघोरी विद्या शिकलात पण काही नियम विसरलात तुम्ही... गुरू-शिष्यात अदृश्य संकेतांचे नाते तयार होते. सरलाबाईंचा बळी घेतला तुम्ही त्यापूर्वीच त्यांनी तुमचे खरे स्वरूप मला कळेल अशी व्यवस्था केली होती. तुम्हाला काय वाटलं, मी शारीरिक ओढीने रात्री तुमच्याजवळ आली ? तुमची प्राणशक्ती आणि विद्या मला शोषून घ्यायची होती. आता तुम्ही म्हणजे केवळ एक जिवंत प्रेत आहात..हीच शिक्षा आहे तुमच्या अघोरी कृत्याला !
मी ऐकण्याखेरीज काहीच करू शकत नव्हतो, शकणार नव्हतो.
दहा वर्षे उलटलीत आता...अवंती मोठी झाली आहे.. किती मोठी ? मुग्धाकडून ती विद्या शिकण्याइतकी !! मुग्धा अनेक दिवस बाहेर असते.. त्या अरिष्ट निवारणात त्या अवदसेने बरंच नाव कमावलंय. ती आली की घरात त्या मायलेकींचा धुडगूस सुरू असतो नुसता..
मी मात्र त्यांच्या दयेवर जगतोय.. कदाचित हीच त्या अवदसानी दिलेली देणगी असावी !
समाप्त