निर्वशी....*
लेखक:- अंकुश सू. नवघरे. (पालघर)
पुनः प्रकाशन:- दि. ०७.०१.२०१९
©Ankush S. Navghare ®२०१७
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
पुनः प्रकाशन:- दि. ०७.०१.२०१९
©Ankush S. Navghare ®२०१७
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रांनो....
आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती माझ्या स्वतःच्या अनुभवावर आधारलेली आहे. ही कथा मी आजवर लिहिलेल्या सर्व कथांमधली पहिली कथा आहे, त्यामुळे काही प्रमाणात शब्दरचना अयोग्य असू शकते. मी प्यारानॉर्मल ऍक्टिव्हिटीवर काम करत असल्याने कधी कधी काही लोक मला झपाटलेल्या जागेंवर बोलावून घेतात किंवा घेऊन जातात. कधी ती जागा तपासण्यासाठी किंवा मग तिकडची समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी.
साधारणतः ४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रत्नागिरी मध्ये एका गावातुन मला असेच बोलावणे आले होते. ते थंडीचे दिवस होते आणि दिवाळीची सुट्टी पण होती. कुठेही जाण्यापूर्वी मी आधी त्या जागेचा पूर्ण इतिहास माहिती करून घेत असतो. त्या जागेचा इतिहास असा होता की तिकडे पालांडे आणि सावंत असे दोन समाजाचे लोक राहतात. त्या पैकी सावंत आताच आले आहेत पण पालांडे ह्यांच्या चार पिढ्या तीकडाच्याच आहेत. त्यांचा भूतकाळ असा आहे की साधारणतः १५० वर्षांपूर्वी तिकडे पालांडे नावाचे सरदार किंवा सैन्यातील कोणी बडे अधिकारी रहात होते. त्यांना ती जमीन जागिर म्हणून देण्यात आली होती. तिथे त्यांच्याच समाजाचे लोक जास्त राहात होते त्यामुळे त्यांचेच राज्य असल्यामुळे त्यांच्या शत्रूंमध्ये पण वाढ झाली होती.
तिकडेच डोंगराच्या मध्यभागी त्यांचं महालासारखं टुमदार घर होत आणि त्यांच्या घरात साधारणतः ६० सदस्य रहात होते त्यापैकी १५ लोक हे जवान पुरुष आणि बाकीचे म्हातारे, बायका आणि लहान मुले होती. त्या ६० सदस्यांपैकी एक बाई दोन जीवांची होती. अस म्हणतात की त्यांचे शत्रू घातपात करण्यासाठी टपून बसलेले होते. एके दिवशी रात्री ज्यावेळी तरुण मंडळींपैकी अर्धेअधिक पुरुष हळदीनिमित्त दुसऱ्या गावात गेले असताना संधी साधून त्यांच्या शत्रूंनी हल्लाबोल केला आणि रक्ताचे पाट वाहिले. परंतु सुदैवाने ती दोन जीवांची असलेली बाई कशीबशी निसटून तिथून सुरक्षित ठिकाणी पोहोचली आणि तिने झाल्या प्रकारची वर्दी उरलेल्या लोकांना दिली. त्यानंतर त्यांनीही त्या शत्रूंवर हल्ला करून त्यांचा शिरच्छेद केला पण त्यातील कोणीही वाचले नाही. असे म्हणतात की जे रक्ताचे पाट वाहिले त्यात एक फणसाची बी वाहत जाऊन आपोआप रुजली आणि तिचे पुढे झाड झाले. ते झाड आजही तिकडे पाहायला मिळते परंतु कोणीही त्याचा फणस खात नाही. ती बाई नंतर बाळंतीण झाली तिला मुलगा झाला आणि तोच आताच्या त्या पालांडे समाजाचा मूळ पूर्वज ठरला. एका रात्रीतच संपूर्ण पालांडे कुटुंबाचा नामोनिशाण मिटून गेला होता. फक्त ती एक बाईचं तेवढी काही दिवस राहिली जीने अज्ञातवासात राहून मुलाला जन्म दिला आणि आपल्या कुळाचा उद्धार केला. परंतु मूल जन्मल्यानंतर काही दिवसातच ती ही मृत्यू पावली. त्यानंतर त्या मुलाचे रक्षण करण्यासाठी तिचा आत्मा येतो असे लोक म्हणायचे.
ती घराची जागा आताच्या गावकऱ्यांनी अजूनही जपून ठेवली आहे. तिथे कंपाउंड केले आहे आणि मेलेल्यांची समाधी बांधली आहे. मला तिकडे बोलावण्याचे कारण हे की त्या जागेच्या आसपास ची जागा अजूनही त्या काळरात्रीतुन सुटलेली नाही. आजही तिकडे किंचाळण्याचे, तलवारिंचे आवाज येतात कित्येक भूत दिसतात. त्यामुळे त्या जागेच्या आसपास ची जागा विकली जात नाही आणि त्यांना भुतांचा त्रास होत असतो. अर्थात त्या लोकांना आता हे खूपच सवयीचे झाले आहे. भूत म्हणजे त्यांच्यासाठी किरकोळ विषय आहे. मला हे आवर्जून सांगावेसे वाटते की खूप वर्षांपासून तिथे आत्मे अडकून राहिल्यामुळे त्यांची तिकडून सुटका होणे खूप कठीण काम आहे. मला तिथे जाऊन फक्त हेच पहायचे होते की आजूबाजूच्या लोकांना होणारा त्याचा उपद्रव कसा कमी करता येऊ शकतो.
मला तिकडून आमंत्रण आल्यानंतर मी घरातल्या माणसांना असे संगीतले की आपल्याला वीकएन्ड साठी रत्नागिरीला जायचे आहे. खरे कारण मी लपवले होते कारण त्यांनी मला जाऊच दिले नसते. मी त्या गावातल्या माणसाला संगीतले की हे काम मी एका दिवसात नाही करू शकणार त्यासाठी मला कमीत कमी ५ दिवस राहण्याची सोय करावी आणि राहण्याकरिता एका घराची सोय करावी. त्याप्रमाणे सर्व लागणारे आणि जेवणाचे साहित्य घेऊन मी त्यांनी दिलेल्या घरात आपला मुक्काम ठोकला. मला दिलेले घर त्याच डोंगराच्या पायथ्याशी आहे ज्या डोंगरावर ती झपाटलेली जागा आहे. मी रहात असलेल्या घराला ३ रुम आहेत पण कॉमन ओटा आहे. त्यातील उजव्या बाजूने पहिली रूम मी घेतली होती आणि उरलेले २ रूम बंद होते. घराच्या उंतराला लागूनच ओटा आहे आणि घरासमोर जराशी ४ फुटी जागेचा पट्टा मोकळा आहे जो गावातली इतर लोक पायवाट म्हणून वापरतात आणि तेच घराचे अंगण म्हणूनही वापरले जाते. त्या अंगांना पुढे एक कंपाऊंड सारखी जाडी भिंत आहे. त्या भिंतीपासूनच पुढे डोंगर सुरु होतो. दाराच्या समोरच बाहेरच्या बाजूला पण जरा लांब टॉयलेट आहे. तिकडे वाघ इत्यादी जनावरांचा वावर असल्याने रात्री जर टॉयलेट ला जायचे असेल तर सोबत कोणाला तरी घेऊन जायचे हा नियमच आहे.
त्या कंपाऊंड वॉल सारख्या दिसणाऱ्या भिंतीवर (प्रत्यक्षात ती भिंत नाहीय तो डोंगराचा उंचावटाच आहे किंवा घराचा पाया असेल.) पूर्वी एक कुटुंब राहायचे पण त्यांना मूल बाळ न झाल्याने त्यांना उपहासाने लोक निर्वशी असे म्हणायचे. पुढे ते कुटुंब मेल्यानंतर त्या भिंतीसमोरच्या भागाला लोक निर्वशीचा ओटा असे म्हणू लागले. त्या ओट्याची महती अशी आहे की त्या भिंतीचा किंवा ओट्याचा एखादा लहानसा दगड जरी कोणी घरी घेऊन गेले तरी त्याच्या घरात वाईट गोष्टी चालू होतात म्हणून त्या पडक्या घरातील वस्तू ला कोणीही गाववाला स्पर्श करत नाही. मी ज्या घरात वास्तव्य केले होते त्या घराच्या डाव्या बाजूला ओट्यावर एक लोखंडी पलंग बसण्यासाठी मागवून घेतला होता. रात्री त्याच्यावर बसून मी आणि माझे कुटुंबीय टाइम पास करायचे. पहिल्या दिवशी आम्ही ७ लोक तिकडे गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी माझी अजून एक बहीण आणि तिचा नवरा पण येणार होते. मी माझ्या कामाला पाहिल्या दिवासपासूनच सुरुवात केली होती. मला आलेला अनुभव असा होता.
त्यादिवशी रात्री साधारण ८ वाजता मी जेवण लवकर आटोपल्याने त्या लोखंडी पलंगावर एकटाच बसलो होतो. ओट्यावर एक पिवळ्या रंगाचा ब्लब जळत होता. वातावरण कुंद वाटत होते. घरची इतर लोक थंडी असल्याने दरवाजा लावून बसली होती. मी श्री गुरुदेव दत्त हा जप हेडफोने वर ऐकत होतो. घराचा ओटा सोडला तर सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. मी रात नावाच्या मूवीत एक डायलॉग ऐकलं होता की... चिराग सिर्फ एक दायरे तक ही अंधेरा मीटा सकता है जबतक वो रोशनी देता है पर रोशनी के ऊस पार अंधेर मे क्या छुपा हो सकता है ये कोई नही जनता है.. असाच काहीसा तो डायलॉग होता.. जास्त रात्र झाली नसल्याने गावात दूरवर एक दोन ठिकाणी दिवे जळताना दिसत होते. बाकी सर्व निरव शांतताच होती. गाव अगदीच डोंगरात म्हणजेच जंगलात असल्याने रानटी झाडे, पिवळा चाफा आणि फणस आंबा आणि काजूच्या झाडांचा भारमार होता.
असंच पलंगावर बसलेलो असताना मी ठरवले की आता आपल्या अभ्यासाची वेळ आली आहे आणि घरातले पण इतक्यातच बाहेर येणार नव्हते. म्हणून मी हेडफोन वरचा मंत्र बंद करून पद्मासन घातले आणि ध्यान लावले. माझा देवगण असल्यामुळे भुतांचे दर्शन मला क्वचितच होते. त्यामुळे मी ध्यानाच्या माध्यमातून त्यांना समजून घेतो. परंतु ह्या ठिकाणच्या भुतांचा मला तसा अनुभव नसल्या कारणाने मी भस्म जवळ बाळगले होते न जाणो आपल्यावर नाही पण आपल्या कुटुंबावर काही संकट यायला नको होते कारण ते ह्या सर्व प्रकारापासून अगदीच अनभिज्ञ होते.
मी ध्यान लावले आणि माझ्या पद्धतीने अंतर्मनाला आदेश दिला की आजूबाजूच्या अर्धा किलोमीटर च्या परिसरात आता जितकी पण भूत आहेत ती मला दिसायला हवीत. जसा आदेश गेला तस मला त्या निर्वशीच्या ओट्यावर पण जरा पुढे म्हणजे ओट्याचा मागच्या बाजूला एक पांढरी आकृती दिसू लागली तिची काहीशी ठेवणं बाईसारखी होती. अस वाटत होत की ती माझ्याकडेच पाहत आहे. मित्रांनो हे करत असताना कधी कधी आपल्याला भास पण होऊ शकतात किंवा आत्मे आपल्याशी खेळ पण करतात.
म्हणून मी डोळे उघडले आणि ती आकृती दिसण्याच्या जागेवर उघड्या डोळ्यांनी पहिले असता मला काहीच दिसले नाही. म्हणून मी परत डोळे मिटले आणि पाहतो तर काय ती आकृती आता दोन हात पुढे म्हणजे माझ्याकडे सरकली होती. मी परत डोळे उघडले तर परत काहीच नाही. परत डोळे मिटले तर परत ती जवळ आली होती. असे करता करता ती आता माझ्यापासून अवघ्या दोन वित अंतरावर होती म्हणून मी परत डोळे उघडले आणि तीतक्यात लाईट गेली आणि आता तर ती आकृती मला स्पष्ट आणि उघड्या डोळ्यांनी दिसत होती आणि आता ती फक्त वितभर अंतरावर उभी होती. आत तिचे डोळे ज्यात फक्त पांढरी बुबुळ होती आणि दात पण मला दिसत होते. तिच्या गुरगुरण्याचा आवाज पण मला येत होता. तो प्रसंग आठवला की आजही मला शहारल्यासारखे होते. लाईट गेल्यामुळे क्षणभर मी पण बावरून किंवा घाबरून म्हणा, गेलो की आता काय करायचं तेवढ्यात मला एक कल्पना सुचली आणि मी फोन चा हेडफोन काढून श्री गुरुदेव दत्त हा मंत्र मोठ्याने लावला आणि डोळे मिटून त्यांचं ध्यान करू लागलो तसं मला दिसलं की ती आकृती आता परत लांब लांब जाऊन तिच्या जागेवर स्तिर झाली. त्यानंतर अचानक लाईट आली आणि घरातले पण बाहेर आल्याने त्यादिवाशीचा कार्यक्रम मी तिथेच आटोपता घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी माझी बहिण आणि तिचे मिस्टर तिथे दाखल झाले. त्या दिवशी रात्री मी एकटा तिकडे न बसता कोणाला संशय येऊ नये म्हणून तो लोखंडाचा पलंग दरवाज्याच्या शेजारी ठेवला आणि आम्ही सर्वजण रात्री १० च्या सुमारास तिकडे गप्पा मारत बसलो होतो. मी माझ्या बाजूला माझी बहिण बसलो असताना मला असं दिसलं की माझी बहिण अंधारात काहीतरी विस्मयाने पहात होती. मी सहज तिला विचारलं की काय ग काय एवढं अंधारात पहात आहेस? काय भूत बीत दिसलं कि काय? त्यावर ती म्हणाली की नाही रे असंच काही नाही. त्यानंतर परत तो विषय निघालाच नाही. त्यानंतर मी माझे सर्व कार्यक्रम आटोपून माझ्या गावी परत आलो. आता तीथे मी काय काय इतर कामे केली हे सांगता येणार नाही कारण की सर्वच अनुभव एकाच वेळी शेयर केले तर स्टोरीत मजा राहणार नाही.
आम्ही घरी परत आल्यानंतर एकेदिवशी माझी बहिण माझ्याघरी आली होती. बोलता बोलता विषय निघाला आणि ती म्हणाली की दादा मला तिकडे काहीतरी दिसले होते. पण मी कुणाला काही सांगितले नाही. त्यानंतर मी तिला माझ्याकडचे वर्णन सांगितल्यावर ती म्हणाली हो सेम तसेच वर्णन होते त्या आकृतीचे. मग मी तिला म्हटले की तू तेव्हाच का नाही संगीतले त्यावर ती मला म्हणाली के.. त्यादिवशी जेव्हा आम्ही तिकडे आलो त्याच रात्री मी अंधारात काहीतरी पाहात होते आणि तू विचारलेस कि काय पाहत आहेस तेव्हा मला त्या निर्वशिच्या चौथऱ्यामागे एक आकृती दिसली आणि ती बाईच्या आकृतीसारखी होती. काळोखात इतकच पांढर दिसत असल्याने मला वाटले कि ते काही पोस्टर किंवा प्लास्टिक इत्यादी बांधले असेल म्हणून मी नंतर लक्ष नाही दिले. दुसऱ्या दिवशी मला आठवण झाल्यावर मी तिथे पाहिलं पण तिथे काहीच प्लास्टिक इत्यादी बांधलेलं नव्हत. अस मला ते सलग ३ रात्री दिसलं. दुसऱ्या दिवाशी एकदा दोनदा तर ते जवळ पण येत होत. अगदी आपल्या ओट्यापर्यंत आलं होतं. पण तू मधेच तिकडे पाहून बॉलिंग टाकतोस तशी ऍक्शन केलीस आणि ते दूर निघून गेलं. मला वाटलेलं कि तो माझा भास असेल. पण आता तू जे वर्णन सांगितलं त्या वरून वाटते की ते खरं असावं. सर्व घाबरतील आणि आपल्या सुट्टीचा विचका होईल. म्हणून मी कोणाला काहीच नाही सांगितले.
त्यानंतर मी तिला असे म्हटले की अग तो आपल्याला झालेला भासच असेल. अस भूतबीत काही नसते. मित्रांनो मलाही त्यादिवशी हे खरं वाटलं नव्हतं कि आपण एक भुत पाहिलं आहे आणि ते आपल्या इतक्या जवळ आले होते. पण तीसऱ्यादिवशी जेव्हा मी माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर भीती पहिली आणि तेव्हाच माझे अंग पण शहारले होते आणि एक वेगळीच थंडीची लहेर अंगावरून गेली होती त्याच वेळी मला धोका वाटलं म्हणून मी माझाकडचे भस्म हातात घेऊन बॉलिंग सारखी अकॅशन करत बहीण पाहत असलेल्या दीशेने भिरकावले होते तेही कोणाला काही कळू न देता. पण नंतर घरी आल्यावर जेव्हा मी माझ्या बहिणीचा अनुभव ऐकला त्यानंतर आज पर्यंत मी एकाच विचार करतोय कि त्या दिवशी जर मी ध्यानात पाहिल नसत तर मला येणाऱ्या संकटाची चाहुलच लागली नसती आणि जर त्यानंतर मी तो श्री गुरुदेवांचां मंत्र मोठ्याने लावला नसता तर काय झाले असते...
माझ्यामते हा अनुभव १००% खरा आहे, इतरांची मते वेगळीही असू शकतील, इतरांच्या मते ते मला झालेले भास ही असू शकतील. मला कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरावयाची नाही. फक्त तुमच्या मनोरंजनासाठी अनुभव शेयर करत आहे.
धन्यवाद... भूतरात्री...
अंकुश सू. नवघरे