चिलापी रेंज-Marathi Bhaykatha
ही भूतकथा कथा एका वाचकाने पाठवली आहे. हे वाचक फॉरेस्ट ऑफिसर म्हणून मध्यप्रदेशांत कार्यरत आहेत.
२००९ चा ऑगस्ट महिना होता आणि दिल्लीहून ऑर्डर आली के एका विदेशी महिला संशोधकाला घेऊन मी कान्हा व्याघ्र प्रकल्प आणि चिलापी रेंज मध्ये जावे. तिचा प्रकल्प फार मोठा होता आणि जागतिक बँक आणि WWF ने त्यांत कित्येक दशलक्ष डॉलर्स ची गुंतवणूक केली होती. जेस्सी मॅडम, दोन प्राणी संशोधक, त्यांची एक विद्यार्थिनी एक कॅमेरामन, मी आणि एक स्थानिक गाईड शी एकूण ७ लोकांची पार्टी होती आणि आणखी ६ हमाल आम्ही बरोबर घेतले होते. एक टेम्पो आणि एक जीप जंगलतील वाटांतून जाण्यासाठी वाहन म्हणून होते. अनेक प्रकाच्या झाडांची सॅम्पल्स, प्राण्यांचे फोटो, दगडांचे नमुने वगैरे गोळा करायचे होते.
अनेक लोकांना वाटते कि जंगल म्हणजे घनदाट पशु पक्ष्यांची भरलेले वातावरण पण तसे नसते. जंगल कितीही मोठे आणि घनदाट असले तरी बहुतेक ठिकाणी तुम्हाला पक्षी प्राणी दिसत नाहीत. तसेच प्रत्येक जंगलांत आंत आदिवासी हे असतातच. अगदी कान्हा व्याघ्र प्रकल्पांत सुद्धा कित्येक आदिवासी भाग आहेत.
मी फॉरेस्ट ऑफिसर असलो तरी शहरी माणूस. बंदूक वगैरे घेऊन जंगलात फिरायला आवडते पण तिथे राहायला आवडत नाही. चिलापी रेंज मध्ये माझी नेमणूक झाली तेंव्हा मी सर्वप्रथम राहायला कुठे मिळेल ह्याची चौकशी केली. ह्या भागांत एकही फॉरेस्ट ऑफिसर राहत नव्हता त्यामुळे तशी काहीच व्यवस्था नव्हती पण सरकारी कागदांत एका ब्रिटिश सैन्य अधिकाऱ्याने इथे फॉरेस्ट हाऊस बांधले आहे अशी माहिती मिळाली. डोंगरी ह्या भागांत एक आदिवासी कसबा आहे तेथील लोकांनी मला त्या फॉरेस्ट हाऊस चा पत्ता दिला. मी सरकारी पैशानी सर्वप्रथम तिथे जाण्यासाठी एक कच्चा रास्ता बांधून घेतला. फॉरेस्ट हाऊस अगदी पक्क्या चिऱ्यांचे बांधले होते. ग्लास खिडक्या तुटल्या होत्या पण आंतील लाकडी जिना अजून मजबूत होता.
माझे पहिले ६ महिने फक्त हे घर साफ करून राहण्यायोग्य करण्यात गेले. वीज अजून ह्या भागांत पोचली नव्हती म्हणून एक जनरेटर आणि एक भली मोठी तेलाची टाकी मागून घेतली. टाकी इतकी मोठी होती कि नंतर आजूबाजूच्या गावातले लोक पेट्रोल मागणीसाठी येऊन धडकू लागले .
मदतनीस म्हणून मी सूर्याला ठेवले हाच आमचा गाईड सुद्धा होता. तो शिकार करण्यात सुद्धा तरबेज असल्याने अधी मधी चांगली सागुती सुद्धा बनवायचा. कायद्याने मला फक्त छोटे पक्षी आणि कधी कधी हरणे मारण्याची परवानगी मिळत असे.
जेस्सी मॅडम आल्या तेंव्हा मी त्यांना ह्याच घरांत ठेवले तर त्यांच्या इतर सहकार्यांनी बाहेर तंबू ठोकला. हुनुमान टीला म्हणून जंगलात आंत खोलवर एक छोटा पहाड होता तिथपर्यंत जीप किंवा टेम्पो जात होता. त्यामुळे आधीचे तीन दिवस प्रवास फक्त हनुमान टीळा पर्यंत प्रवास करायचे ठरवले होते. प्रत्येक दिवशी आम्ही काही ४ मैल जायचो तंबू ठोकायचो आणि नंतर संशोधक मंडळाची गाईड वगैरे सॅम्पल्स गोळा करायला जंगलांत जायचे. मी आणि जेस्सी ह्या सगळ्यावर नजर ठेवायचो. जेस्सीला भारतीय जंगले, झाडे, त्यांची हिंदी नावे, आयुर्वेदिक वापर ह्यांची फार खोलवर माहिती होती
सर्व काही सुरळीत चालले होते. हनुमान टीळा पर्यंत तरी आम्हा सर्वांचे काम अगदी मनाप्रमाणे झाले होते. आता पुढे पायी प्रवास करायचा होता. त्यामुळे जेस्सी आणि त्यांची विद्यार्थी सामंथा ह्यांनी ४ हमालांना सॅम्पल्स घेऊन परत बेसकैम्प वर पाठविले. ३ हमाल आमच्याबरोबर पायी आले. मला इतिहासाची प्रचंड आवड त्यामुळे मी सरकारदरबारी असलेले सर्व कागद वाहकाला होते. मी ज्या घरांत राहत होतो त्याचे मूळ मालक कॅप्टन हॅरिसन जोन्स हे ईस्ट इंडियाकंपनीत कामाला होते आणि नंतर त्यांनी ते काम सोडून आपले आयुष्य भारतीय जंगलांत घालवले. जंगलांत आंत वर जाऊन विस्मृतीत गेलेली मंदिरे, महाल वगैरे ते शोधून काढत असत. १९०१ मध्ये कॅप्टन जोन्स चिलापी रेंज च्या जंगलांत गायब झाले. त्याच्या सोबत आणखीन किमान ९ लोक गायब झाले होते. ब्रिटिश सरकारने शेकडो सैनिक त्यांना शोधण्यासाठी पाठविले होते. पण कुणालाही ते सापडले नाहीत. त्यांचे नक्की काय झाले हे एक न उलगडलेले गूढ आहे जे आजही आदिवासी भागांत कुजबुजले जाते.
जेस्सी आणि सामंथाला ह्या गुढाची माहिती मी दिली आणि दोघीनाही ह्याचे विलक्षण आश्चर्य वाटले. पण माझ्याकडे कॅप्टन जोन्स ची डायरी होती. त्यांत त्यांनी जंगलात आतवर असलेल्या एक सरोवराबद्दल लिहिले होते. ह्या सरोवराला नाव नव्हते पण आम्हा सर्वानाच तिथे जायची अतिशय मनापासून इच्छा होती. पुढील ४ दिवस सलग मेहनत केल्यानंतर आम्ही बाकीच्या पोर्टर लोकांना सुद्धा माघारी पाठविले. इतर संशोधक मंडळी सुद्धा मागे गेली. मी सूर्या, ख्रिस, सामंथा आणि जेस्सी इतकीच मंडळी आता बाकी होतो.
सरोवरावर पोचलो तेंव्हा रात्रीचे ९ वाजले होते. थकून आम्ही कसे बसे तंबू लावले. इतक्यांत आभाळ भरून आले आणि कधी नाही तो पाऊस पडायला लागला. ऑगस्ट मध्ये इथे पाऊस पडणे अगदी अशक्य होते. त्यांत आम्ही तंबू पाण्याच्या जवळ लावला होता त्यामुळे पाणी आंत येईल अशी भीती वाटत होती. मी तसाच खुर्चीवर झोपी गेलो. रात्री मला जाग आली ती सूर्याच्या ओरडण्याने. आम्ही पळत बाहेर गेलो तर काय आश्चर्य. पावसाने सरोवराचा स्तर खरे तर वाढायला पाहिजे होता पण ते सरोवर चक्क आटले होते. पाऊस अजून पडत असला तरी आम्ही पळत सरोवरात शिरलो. आधी किमान २०० मीटर लांब असलेले सरोवर आता फक्त २५ मीटर उरले होते. आणि जसे जसे आम्ही आंत चालत गेलो आम्हाला लक्षांत आले कि सरोवराच्या खाली एक प्रशस्त काळ्या पाषाणाचे मंदिर वजा स्ट्रक्चर होते, मंदिराचं म्हटले असते पण त्याला कळस नव्हता.
नंतर आम्ही सरोवराचा अभ्यास करून जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मध्ये पेपर पब्लिश केला. खरे तिथे तीन जमिनीत तीन प्रकारची भगदाडे होती. त्यातील एक जमिनीवर असल्याने ते सरोवर वाटायचे. तेथून काही अंतरावर जमिनीत दुसरे भगदाड होते पण ते अंडरगाऊंड होते. आणि त्याहूनही खाली जमिनीत एक पोकळ भाग होता जो फक्त कशा किरणांनी शोधू शकला जात होता. मधल्या पोकळींत एक प्रचंड लाकडी मोट होती. हि कुणी माणसानेच केली असावी. ह्यावर अजूनही रिसर्च चालू आहे.
पाऊस पडला करी सर्वप्रथम हि मधली पोकळी पाण्याने भरायची आणि त्यामुळे त्यातील लाकडी मोट वर यायची. असे झाले कि सरोवर आणि तिसऱ्या पोकळीला जोडणारा एक पाषाणी मार्ग होता तो उघडायचा आणि सरोवरातील पाणी प्रचंड वेगाने त्यांड ड्रेन व्हायचे. हे सर्व पाऊस एका ठराविक वेगाने सुरु आहे त्याच वेळी होऊ शकत होते. आणि ह्या भागांत असा पाऊस क्वचितच पडायचा. कॅप्टन जोन्स कदाचित अश्या पावसाच्या वेळी ह्या सरोवरातील मंदिरांत शिरला असावा आणि पाऊस बंद झाल्यानंतर सरोवरात पुन्हा पाणी भरले असावे आणि तो त्या मंदिरात बुडून मेला असावा. नंतरच्या शोध कर्त्यांना हे मंदिर दिसणे सुद्धा अशक्य होते.
आम्हाला म्हणून त्या मंदिरात जायला भीती वाटत होती पण सूर्याने एक भाला मोठा दोरखंड टाकून आम्हाला आंत जाण्यास मदत केली. पाणी भरलेच तर दोरी वापरून आम्ही वर येऊ शकत होतो. त्या मंदिरात प्रवाह करताच हे मंदिर नाही हे लक्षांत आले. तिचे असलेले शिलालेख हे एक थडगे आहे असे दर्शवत होते. हिंदू संस्कृतीत थडगे हि संकल्पना अतिशय कमी आढळून येते.
पण आम्ही त्या छोट्याच्या मंदिरातील सर्वांत आतील भागांत प्रवेश केला आणि आम्हाला एक भाला मोठा दरवाजा दिसला. पाषाणी दरवाजा. आम्ही तो जोर लावू उघडला तर आंत काहीही नव्हते. पूर्ण रिकामी. फक्त होते ते काही काजव्या प्रमाणे चकाकणारे कीटक जे उडून बाहेर गेले. आमच्या विजेरीच्या उजेडाने कदाचित ते चमकले असावेत.
आम्ही परत येताना आम्हाला सूर्याची किंचाळी ऐकू आली. तो "मला वाचावा वाचवा" असे आर्ततेने ओरडत होता. मी पळत वर गेलो आणि इतर मंडळी मागे आली. वर आलो तर सूर्य कुठेही नव्हता. कुठेच नाही, अगदी नख सुद्धा नाही. कुना जनावराने हल्ला केल्याचे सुद्धा चिन्ह नव्हते. आम्ही सुन्न झालो. इतक्यांत सामंथा ओरडू लागली. आम्ही तिच्याकडे पहिले तर तिच्या हातावर आणि तोंडावर काही काजवे होते. मी विजेरीचा प्रकाश टाकताच ते उडून गेले पण पाणी अक्षरशः तिचे तोंड आणि हातावरचे मास ओरबाडले होते. ती किंचाळत होती आणि जेस्सी ने तिला घट्ट पकडून फर्स्ट ऍड दिला.
मग आमच्या लक्ष्यांत आले कि ते काजवे नसून कसले तर नरभक्षी कीटक होते हे फक्त उजेडाला घाबरत होते. जे कीटक त्या मंदिरात बंद होते आणि कदाचित कप्तान जोन्स नंतर आम्ही त्यांना मुक्त केले होते. ती संपूर्ण रात्र आम्ही घाबरून काढली आम्ही रात्रभर तंबूत विजेरो चालू ठेवून होतो. सुदैवाने LED असल्याने रात्रभर दिवा चालू राहू शकत होता. कधी काही ते काजवे आम्हाला तंबूच्या बेहरे घुटमळताना दिसत असत. सकाळ होताच आम्ही तेथून पोबारा केला.
सुदैवाने ड्युटीच्या नादात पुन्हा कधी त्या कीटकांची भेट नाही झाली अन त्यानंतर तिथे अनेक संशोधक गेले पण कुणाला हि ते पुन्हा आढळले नाहीत.
सूर्याचे काय झाले ? तो कुणालाच सापडला नाही. अगदी कपडे किंवा हाडे सुद्धा नाही. जेस्सी ने नंतर ह्या विषयावर मला जास्त माहित पाठविली.
हजारो वर्षे पूर्वी आपली पृथ्वी अशी नव्हती. इथे भयानक प्रकारचे प्राणी, कीटक आणि जंतू राहत होते. ह्यातील बहुतेक काळाच्या ओघांत नाहीसे झाले पण त्यातील काही अंटार्टिकावरील हिमनगांत, कॅलिफोर्निया मधील रेडवूड्स ह्या मोठ्या आणि जुनाट झाडांत वगैरे अडकून हिमनिद्रेंत आहे. अनेकदा काही जाती एखाद्या वृक्षाला किंवा जंगलाला देव/देवराई वगैरे मानून तिथे काहीही तोडण्यास मज्जाव करतेज्याचे पारंपरिक कारण हेच आहे. अगदी मेक्सिको, अल्बर्टा, अलास्का, रशिया, इरलंड इत्यादी भागांत सुद्धा अश्या प्रकारच्या परंपरा आढळतात.
त्या भागांत भारतीय शास्त्रज्ञांना विशेष काही सापडले नसले तरी त्या सरोवराच्या भागांत जी विशिष्ट रचना आमच्या पूर्वजांनी केली होती ती त्या कीटकांना अडकवून ठेवण्यासाठीच केली होती. आमच्या हस्तक्षेपामुळे ते त्यादिवशी सुटले आणि त्यांनी सूर्याचा बळी घेतला.