शिकार
लेखन :- शशांक सुर्वे
प्रेम म्हणजे स्वार्थ...पैसा तिथे प्रेम...भिन्नलिंगी शारीरिक आकर्षणाचा दिलेलं गोंडस नाव म्हणजे प्रेम....अश्या काही व्याख्या घेऊन स्वप्नील आपलं आयुष्य जगत होता....तो तसा अनाथ मुलगा होता....पुण्यात आला आणि इथलाच झाला....सकाळचे कॉलेज दुपारचे काम त्या कामातून मिळणाऱ्या पैशातून "एकटा जीव सदाशिव" जगत होता....लग्नाचं वय झालं होतं पण इच्छा मात्र नव्हती....आधीपासून लाजाळू असलेला स्वप्नील....कॉलेजमधल्या मुलींशी मान वर करून बोलायचं धाडस अजून एकवटू शकला नव्हता...आपलं शिक्षण आणि आपला खेळ....ह्या वयात कॉलेजमधली मुलं इकडे तिकडे भटकत होती...व्यसन करत फिरत होती त्या वयात स्वप्नील राज्यस्तरीय धावपटू होता....अनेक राज्यस्तरीय स्पर्धा जिंकून त्याने नाव कमवलं होतं....स्वप्नील तसा खूपच व्यवहारी मुलगा होता मनाने विचार करण्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारण्यात तो धन्यता मानत होता...आणि प्रेम आणि प्रेयसी ह्या गणिताचे उत्तर त्याने अमाप पैसा अस काढलं होतं...
"जीसके पास पैसा है लोग उसी से पूछते भाई तू कैसा है"
हे साधं सरळ सूत्र घेऊन तो जगत होता....राज्यस्तरीय खेळात नाव कमवून नंतर आर्मी जॉईन करायची हे स्वप्न उराशी बाळगून त्याचे प्रयत्न चालू होते....राज्यस्तरीय खेळाडू आणि आपलं आर्मीच स्वप्न ह्यात आता फक्त थोडंच अंतर बाकी होत.....तो यशस्वी होणारच होता पण अचानक त्याच्या आयुष्यात ती आली.....आता स्त्री जातीविषयी त्याने जे भाकीत केले होते की स्त्री हि फक्त यशस्वी पुरुषामागे असते किंवा पैश्याच्या मागे धावते...ह्या एक एक समज आणि गैरसमजाला ज्यूली अक्षरशः सुरुंग लावून नेस्तनाबूत करत होती.....आपण सात जन्माचे फाटके आहोत...आपल्या आयुष्यात कसलं आलंय प्रेम??.....अस बोलून प्रेमाला साफ झिडकरलेल्या स्वप्नीलला ज्यूली प्रेमाची एक एक पायरी चढवत होती.....आणि स्वप्नील सुद्धा तिला पूर्णपणे समर्पित होऊन तिची प्रत्येक गोष्ट आदराने ऐकत होता....थोडाफार आहारीही गेला होता
ज्यूली ही स्वप्नीलला कधीही भेटली नव्हती....समोरासमोरच्या बागेत किंवा निवांत कोपऱ्यातल्या ह्या जुनाट भेटी आधुनिक इन्स्टग्राम सारख्या आधुनिक app ने जणू काही गिळंकृतच केल्या आहेत..... हे पण दोघे भेटले ते इन्स्टग्रामवरच....ज्यूलीला स्पोर्ट्स खूप आवडायचे आणि स्वप्नील ह्या क्षेत्रातला हिरो होता....इन्स्टग्राम वर चॅट त्यातून झालेल्या ओळखी पुढे पुढे घट्ट आणि विश्वासू होऊ लागल्या....स्वप्नील ज्यूलीला भेटून जणू हवेतच होता.......julie_666 ही तिची id होती.....तिने पुढाकार घेतला होता आणि प्रथम hii ही तिच्याकडून होतं..मुलीकडून पहिला मेसेज स्वप्नीलला न पटण्यासारखा होता....फेक id असेल वैगेरे तर्क त्याने लावला होता....पण त्याचा टाईमपास मात्र होत होता..ज्यूली कडून लडिवाळ शब्दांचा जो प्रवाह तिने काढला होता त्यात वाहवत जाण्याखेरीज स्वप्नीलला पर्याय नव्हता...एखादी मुलगी का पुढाकार घेत आहे अश्या क्षुल्लक गोष्टी विचार करण्याचा त्याला वेळ नव्हता.....ज्यूली कमालीची सुंदर आणि तितकीच मादक होती....तिचा देह जणू स्वर्गनिर्मितच होता.....अशी मुलगी स्वप्नील सारख्या अनाथ फाटक्या मुलाच्या प्रेमात पडणे म्हणजे दोन परस्पर विरोधी टोके एकत्र जोडण्यासारखे होते पण ते शक्य झाले होते......तिला स्वप्नील मधला स्पोर्ट्समन आवडला होता आणि स्वप्नीलला अख्खीच्या अख्खी ती.... ज्यूली एखाद्या सुंदर फॉरेनरप्रमाणे दिसत होती....गोल चेहरा....सोनेरी कंबरेपर्यंत पसरलेले केस...अस संमोहित करणारे सौन्दर्य कदाचित ह्या जगातील नसावच...एक गूढ हास्य...भेदक नजर...डोळ्यात आणि डोक्यात गूढ गोष्टी साठवून ठेवलेली ज्यूली कधी कधी असबंध बोलायची कधी कोणत्यातरी वेगळ्याच भाषेत गाणं गुणगुणयाची पण हे सगळं स्वप्नीलला कधीच खटकलं नाही.... कारण ती त्या मादक देहाची मालकीण होती जीचा गुलाम होण्यासाठी लाखो तरुणांची रांग लागली असती....पण आता हा गुलामीचा मान स्वप्नीलला मिळाला होता....दोघांचा रोज रात्री व्हिडिओ कॉल व्हायचा .....ती बोलता बोलता आपला टीशर्ट काढून आपल्या आखीव रेखीव देहाचे दर्शन स्वप्नीलला घडवत होती आणि परतफेड म्हणून ती स्वप्नीलला आपल्या तगड्या मांड्या आणि रनिंग करून बनलेले घटिव पायाचे फोटो मागायची....तिची ही मागणी स्वप्नीलला विचित्र वाटत असे.....मुली कशावर फिदा होतील काही सांगता येत नाही.....रनिंग करून फुगलेल्या त्याच्या पिंडर्या आणि त्यावरच्या फुगलेल्या नसांची तारीफ ज्यूली सतत करत असे....तिची नजर सतत स्वप्नीलच्या पायावर खिळली असायची तो सुद्धा वर्कआऊट करून आल्यावर आपल्या तगड्या मांड्या तिला दाखवत असे आणि रात्री ती सुद्धा त्याच्याशी टॉपलेस व्हिडिओ चॅट करत असे...हे विश्वासाचं नातं असच बहरत जावावे असे स्वप्नीलला वाटत होते.....तो ज्युलीला जराही नाराज करत नव्हता....ती जे सांगेल ते ऐकत होता....कारण तिच्याही काही छोट्या छोट्या इच्छा असायच्या ज्या स्वप्नील पूर्ण करू शकत होता...पण ज्युलीचे बोलणे आणि वागणे काहीसे गूढ होते....चेहऱ्यावर खोटं हसू....डोळ्यात काहीसे स्वार्थी भाव....तिच्या डोळ्यात स्वप्नील विषयी जराही प्रेम नव्हतं.....तिच्या पाठीवर एक मोठासा टॅटू होता उजवा हात पूर्ण टॅटूने भरला होता काहीसे विचित्र आकाराचे टॅटू होते.....ती एक नॉर्मल मुलगी वाटतच नव्हती....तिच्या निळ्याशार डोळ्यात अनेक गूढ होते पण स्वप्नील तिच्या आहारी गेला होता.....तो रविवारची आतुरतेने वाट बघत असायचा
रविवारी ज्युली तिच्या घराच्या बाहेर गार्डनमध्ये यायची....एक शेकोटी पेटवायची....बाजूला एक बुजगावणे त्या शेकोटीच्या उजेडात कमालीचे भयानक वाटायचे....त्या बुजगवण्याला बकऱ्याची कवटी लावली असायची.....त्या बुजगावण्याच्या गळ्यात काही हिरव्या,लाल बाटल्यांची माळ लटकत असायची.... ज्यूलीचे ते गार्डन कमालीचे गूढ असायचे आजूबाजूला त्या शेकोटीच्या उजेडाखेरिज दुसऱ्या कश्याही प्रकाशमान गोष्टीचा लवलेश नसायचा....दूर दूर फक्त आणि फक्त अंधार अंधार आणि फक्त अंधार असायचा....त्या शेकोटीचा जो उजेड तोच....बाकी सर्व अंधाराने गिळून टाकल्या सारखं होतं..हे असं काळोखी वातावरण नक्कीच शहरातलं नसावं.....ह्या अंधारात त्या बकऱ्याच्या कवटीच्या बुजगावण्या समोर ज्युली काहीशी ध्यान मुद्रेत उभी असायची तिची फक्त मान एका विशिष्ठ गतीने गोल गोल फिरायची तिच्या तोंडून काहीशे विचित्र मंत्र बाहेर पडत असायचे....ज्यूली समोरच्या दगडावर मोबाईल ठेवून स्वप्नीलला हा सगळा प्रकार लाईव्ह दाखवत होती हा सगळा प्रकार कमालीचा अनोळखी असायचा.....हा सगळा ज्युलिचा धार्मिक आस्थेचा भाग होता अस तीनेच सांगितलं होतं..हा सगळा भाग स्वप्नीलला आवडायचा कारण हे सगळं करत असताना ज्यूली पूर्णपणे नग्न असायची.....त्या शेकोटीच्या आगीत तीच गोरं अंग सोनेरी दिसत होतं.....हाच प्रकार स्वप्नीलला प्रचंड आवडायचा.....15 मिनिटे त्या विचित्र मंत्रात आपली मान फिरवल्यानंतर ज्यूली एक विशिष्ट नृत्य करत असायची शेकोटी भोवती पूर्णपणे नग्न होऊन किंचाळत नाचत असायची.....सोनं वितळवून एखाद्या सुंदर स्त्रीच्या साच्यात ओतावे आणि त्यात जीव येऊन ती आपल्या समोर नाचावी अशी ती काहीशी होती.....तिची आखीवरेखीव काया सुंदर बांधा लांब केस ह्या सगळ्या नैसर्गिक देणगीला तो डान्स सूट होत नव्हता.....काहीसा राक्षसी वाटत होता....ज्यूली अगदी त्वेषाने किंचाळत नाचत असायची.....काही मिनिटातच घामाने तिचं पूर्ण अंग आणि केस भिजून जायचे....त्याच क्षणाची स्वप्नील वाट बघत असायचा तिच्या त्या सुंदर सोनेरी देहावरून ओघळणारा घाम तिची सुंदरता अजून वाढवत होता....तिचं घामाने भिजलेलं नग्न शरीर बघून स्वप्नील भान हरपून जायचा....त्या शेकोटी बरोबर स्वप्नीलची कामाग्नी सुद्धा भडकायची....ते राक्षसी नृत्य त्याला एखाद्या अप्सरेच्या नृत्याप्रमाणे वाटायचं....तासभर तो हरवून जायचा....तिच्या संमोहनात अजून आहारी जायचा.....तासभर नाचून झाल्यावर ती 5 फूट भडकलेली आग ज्यूली एक फुंकर मारून कशी विझवते? हे विचायचे भान ही त्याला नसायचे...एक प्रकारे तिने स्वप्नीलला काबीज केलं होतं....हे व्यसन आपल्याला कुठे घेऊन जाणार ह्याची स्वप्नीलला कल्पना नव्हती
त्या दिवशी स्वप्नील कमालीचा खुश होता....सकाळीच ज्यूलीचा इन्स्टग्राम वर मेसेज बघितला....आज ती भेटायला बोलावत होती....स्वप्नील अगदी हवेत होता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तोच क्षण आज आला होता.....तिने तिच्या बंगल्याच गुगल लोकेशन स्वप्नीलला सेंड केलं होतं....ते गुगल लोकेशन आणि पत्ता बघून स्वप्नीलचे डोळे थोडे विस्फारले.....कालसर्प जंगल नावाप्रमाणे काळ होतं.....तिथे आढळणाऱ्या विविध जातीच्या सर्पामुळे ते जंगल सामान्य लोकांच्यासाठी निषिद्ध होतं....भारतातील अनेक विषारी जातीच्या सर्पाचा तिथे वावर होता त्यामुळे अगदी पुरातन काळापासून हे जंगल सर्पांचे स्थान म्हणून कालसर्प जंगल म्हणून ओळखले जाई....अजूनही इथे मानवी वावर कमीच होता....कालसर्प जंगलाचे नाव वाचून स्वप्नील ज्यूलीच्या धुंदीतून बाहेर आला
"इथे ह्या भयाण जंगलात राहते ती??"
मनाला प्रश्न पडला.....त्या जंगलाबद्दल स्वप्नील ऐकून होता.....काही व्हिडिओ त्याने बघितले होते...झाडावर लटकणारे विषारी साप भयानक वाटत होते....ज्यूली ह्या जंगलाजवळ राहते ही गोष्ट स्वप्नीलला न पटणारी होती...म्हणून त्याने त्या जंगलाचा पुर्ण सॅटेलाईट व्हीव बघितला....मानवी हस्तक्षेप दाखवणारे कोणतेही बांधकाम त्या जंगलाजवळ दिसत नव्हते.....मग हा पत्ता??
एक तरुणी जीचे वागणे,हावभाव सगळं गूढ आहे ती काहीही करू शकते किंवा तिचा हेतू वाईट असू शकतो असे काहीसे विचार स्वप्नीलच्या मनाला स्पर्शही केले नाहीत कारण ज्या मुलीची सुंदर काया आपण फक्त मोबाईल मध्ये बघत होतो ती आता प्रत्यक्षात बघायला मिळणार होती कदाचित ती कायमची स्वप्नीलची होणार होती तिने कॉल वर तस बोललं होतं तीच गूढ भाषा
"ऑनलाइन ही आपली शेवटची भेट असेल उद्या पासून तू माझा असशील"
बोलताना ज्यूलीचे शब्द गूढ होते पण ते समजणे किंवा समजून घेणे स्वप्नील आवश्यक समजत नव्हता....तो कधीच तिच्यावर मोहित झाला होता त्यामुळे त्याने कालसर्प जंगलात जायचं ठरवलं.....350 km प्रवास करायचा होता.....त्यामुळे तो सकाळीच बाईक वरून निघाला.....त्याच्या डोळ्यासमोर ती घामाने भिजलेली सोनेरी अंगाची ज्यूली दिसत होती....त्याची बाईक सुसाट सुटली होती.....अखेर तो कालसर्प जंगलाजवळ पोहोचला.....कालसर्प जंगलाला मानवी हस्तक्षेप नव्हताच कारण त्या जंगलाची रक्षा तिथले विषारी सर्प करत असत....झाडावर,झुडपात त्यांचा मुक्त वावर असायचा....तिथे जाणं म्हणजे परत यायची शाश्वती नव्हती पण म्हणतात ना " कामातुरा न भयम न लज्जा" ह्यातला भय हा प्रकार स्वप्नील साठी दुय्यम होता कारण त्याला काहीही करून ज्यूलीला भेटायचं होतं....त्यामुळेच तर तो कालसर्प जंगलाच्या हद्दीजवळ पोहोचला होता.....पौर्णिमा होती चंद्रप्रकाशात सर्व स्वच्छ दिसत होतं.....एका टेकडीवर स्वप्नील उभा होता आणि नावाप्रमाणे कालसर्प जंगल एका अजगरासारखं सुस्त आणि अक्राळविक्राळ पसरलं होती.....स्वप्नीलने मोबाईल हातात घेतला ज्युलिने जे लोकेशन पाठवलं होतं ते फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर दाखवत होतं.....आता हे एकच माध्यम त्याला ज्यूली पर्यंत पोहोचवणारे होतं.....स्वप्नील ने हातात मोबाईल धरला आणि मॅप जिथे दिशा दाखवेल त्या दिशेने चालू लागला....भयाण शांतता होती त्यात उन्हाळ्यात पानांची पडझड झाली होती त्यातून चालताना विशिष्ट कर्रर्रर्रर्रर्रर्र कर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज शांतता भंग करत होता....प्रत्येक पावलानिशी स्वप्नील थबकायचा मोबाईलची टॉर्च मारून पुढच्या जमिनीचा अंदाज घ्यायचा......इथे प्रत्येक झाडांवर सापांचे वास्तव्य आहे ही गोष्ट त्याला ऐकीव होती आणि विश्वास ठेवणे भाग होते....एक मंद धुरकट वातावरण बनले होते धूर सगळ्या हवेत पसरला होता पण जसजसा स्वप्नील पुढे येईल तसा त्याला वाट दाखवत होता.....एक गडद करडे वातावरण तयार झाले होते स्वप्नीलला वाट करून मागे हटत होते.....स्वप्नील आजूबाजूला बघत चालला होता जरासा आवाज झाला तरी दचकायचा कारण कधीही न बघितलेला मनुष्य प्राणी बघून ते साप आपली जागा सोडत होते पण स्वप्नील जवळ येत नव्हते....चंद्राच्या अंधुक प्रकाशात थंडगार वाऱ्यात स्वप्नीलला दरदरून घाम फुटला होता....त्याची नजर सारखी मोबाईल मध्ये जात होती ज्यूलीने पाठवलेलं लोकेशन फक्त काहीच अंतरावर होतं....पण समोरचं काहीच दिसत नव्हतं ते अंधारातील धुके फक्त काही फूट अंतरावरचेच दाखवत होते....समोर फक्त आणि फक्त आकार बदलणारा धूर पसरला होता.....पानांची सळसळ सोबत पायातून काहीतरी गेल्याचे भास ह्या सगळ्या भयाण वातावरणात स्वप्निल काही काळ डोळे बंद करून चालत होता.....अचानक ती सळसळ थांबली....स्वप्नीलचे थरथरते हात शांत झाले.....टाइमट्रॅव्हल ह्या प्रकरासारखे काहीसे त्याला वाटत होते....एखादा मनुष्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अचानक पोहोचावा तसा स्वप्नील त्या भयाण कालसर्प जंगलातून एका मोठ्या दगडी हवेली समोर उभा होता....समोर अक्राळविक्राळ पसरलेली एखाद्या अवाढव्य दगडी राक्षसासारखी ती हवेली बघून स्वप्नील थक्क झाला त्याने मागे वळून बघितलं....ठराविक अंतरावर तो पांढरा धूर विशिष्ट पद्धतीने हलत उभा होता....स्वप्नीलच्या चेहऱ्यावर ती हवेली बघून थोडं स्मितहास्य फुललं....ह्या महालाच्या राजकुमारीची त्याच्याशी भेट होणार होती....तो पुढे पुढे जाऊ लागला....थबकत्या पावलांनी वेग पकडला होता स्वप्नील त्या भव्य वास्तुकडे बघत होता हे अस बांधकाम त्याने आजवर बघितलं नव्हतं....मुळात हे जुनं बांधकाम भारत स्थापत्यकलेप्रमाणे नव्हतंच.....अस बांधकाम परदेशात म्हणजे रोम सारख्या प्राचीन देशात शेकडो वर्षांपूर्वी बांधून घेतलं जायचं.....पण काय फरक पडणार होता....स्वप्नीलला तर ज्यूलीला भेटायचं होतं तिच्या सुंदर देहाला आपल्या बाहुपाशात ओढायचं होतं....तस तिने प्रॉमिस केलं होतं....स्वप्नील त्या भव्य वास्तूच्या गेटजवळ पोहोचला..आत मंद लाईट्स लागल्या होत्या....काही स्ट्रीट लाईट्स ही दिसत होत्या...त्यामुळे ती भव्य वास्तू उजळून निघाली होती..गेट उघडे होते...स्वप्नीलचे लक्ष बाजूला गेले त्या हवेलीच्या दगडी भिंतीच्या बाहेर मिठाने एक रिंगण आखले होते त्या भव्य वास्तूला त्या मिठाच्या गोल रिंगणात घेतले होते फक्त त्या गेटच्या आत जायच्या जागेवर मीठ नव्हते.....स्वप्नील परत थक्क झाला....."असेल काहीतरी किड्या मुंग्यापासून वाचायचे उपाय" अशी त्या मिठाच्या रिंगणाकडे बघत आपली समजूत घालून स्वप्नील आत शिरला.....
ठक ठक ठक ठक
त्या हिरव्यागार गार्डन मधून आवाज येत होता....स्वप्नीलचं लक्ष त्या गार्डनच्या उजव्या बाजूला गेलं....एक धिप्पाड निग्रो हातात मोठी कुर्हाड घेऊन लाकडं तोडत होता.....धिप्पाड 7 फुटी देह हातात मोठ्या पातीची कुर्हाड घेऊन स्वप्नील कडे बघत सर्व ताकतीनिशी लाकूड फोडत होता....त्याची ती भेदक नजर स्वप्नीलला घाबरवत होती....स्वप्नीलकडे बघत तो हसला त्याचे ते शुभ्र मोठे दात बघून स्वप्नील कमालीचा घाबरला तो अगदी धावतच त्या हवेलीच्या गेट जवळ पोहोचला....त्याने बेल वाजवली तस काही सेकंदात दार उघडलं गेलं.....स्वप्नील आत शिरला.....आणि समोरची भव्यता ते वैभव बघून जागेवरच स्तब्ध झाला.....मंद प्रकाशात सोनेरी वस्तूंची,मोठ्या पोस्टरनी सजलेला तो हॉल एखाद्या श्रीमंत राजघराण्यातील व्यक्तीचा वाटत होता..काहीश्या महागड्या वस्तू किमती सोफे....भिंतीवर शिकार केलेल्या हिंसक प्राण्यांची भुसा भरून ठेवलेली मुंडकी...स्वप्नीलची नजर त्या भल्यामोठ्या चार पाच भित्तिचित्रांवर खिळली....त्या चित्रात दोन व्यक्ती काळा कोट घालून ऐटीत उभे होते...दोघेही निग्रो होते...त्यांची नजर त्या चित्रात क्रूर वाटत होती....बहुधा चित्रकार सुद्धा त्या डोळ्यातील क्रूर भाव कमी करू शकत नव्हता..त्याने आजूबाजूला नजर फिरवली.....हॉलच्या एका कोरपर्यातून कसला तरी आवाज येत होता......स्वप्नीलची नजर त्या आवाजाच्या दिशेने गेली.....तो आवाज त्याला बराचसा परिचित होता....शिलाई मशीनचा आवाज....आता मात्र स्वप्नीलची भिरभिरती नजर स्थिर झाली.....ज्यूली मन लावून काहीतरी शिवत होती.....स्वप्नील तिच्याजवळ पोहोचला पण तिला भानच नव्हतं....ती कसला तरी कोट शिवत होती....तिचं लक्ष नाही हे बघून स्वप्नीलनेच विषय काढला
"काय शिवत आहेस हे???"
ज्युलिने वरती बघितले आणि स्मितहास्य करून उभी राहिली
"ओहो...वेलकम...वेलकम....स्वप्नील...कधी आलात तुम्ही??"
"हे काय आताच....तू काहीतरी शिवत होतीस ह्या मशीन वर....काय आहे हे"
"ओहहह हे??.....कोट आहे हा.....since 1868.....ते येणार आहेत ना...त्याच्यासाठी शिवतेय....त्यांना खूप आवडतो तो कोट"
पुढचा प्रश्न विचारायच्या आतच ज्यूलीने स्वप्नीलच्या पाठीवरून कंबरेत हात घातला आणि त्याला तिथून नेऊ लागली.....त्याला तिने सोफ्यावर बसवलं....आणि त्याला बिलगून ती बसली.....काहीतरी विषय छेडायचा होता म्हणून आपला प्रथम प्रश्न स्वप्नीलने तिच्यासमोर ठेवला
"तू ह्या भयानक ठिकाणी कशी राहतेस??"
ज्यूलीने स्वप्नीलचा हात पकडला
"अरे हे आमचं घर आहे....आम्ही सारखं बदलत असतो....आज इथे तर उद्या तिथे चालूच असत"
अजून एक गूढ .....स्वप्नीलचा चेहरा परत प्रश्नर्थी झाला....त्याला ज्यूलीच्या चेहऱ्यावरील प्रेमळ हावभाव आज काहीसे नकली वाटत होते....ती काय बोलत होती "1868,घर बदलत असतो" वैगेरे वैगेरे ह्या गोष्टी स्वप्नीलच्या समजण्यापलीकडच्या होत्या....काही विचारायच्या आतच ज्यूलीने गार्डनकडे बघितलं
"ऍडम.....ऍडम"
अशी हाक मारली त्याच बरोबर तो धिप्पाड निग्रो आपल्या हातातले काम टाकून सोफ्याजवळ आला....त्या हॉल मधील उजेडात तो अजूनच भयानक वाटत होता....त्याच्या अंगावर अनेक ओरखडे होते.....त्याला बघून ज्यूली म्हणाली
"अरे ऍडम....स्वप्नील साहेब आलेत...आपली वस्तू घेऊन....त्यांना चहा वैगेरे पाजशील की नाही.....वेळ झालीय आपली आता"
ह्या अजून एका गूढ वाक्याने स्वप्नीलच्या भुवया उंचावल्या....पण ज्यूलीने आपला नाजूक हात त्याच्या तगड्या मांडीवर ठेवला....काही क्षण ती त्याच्या मांड्याकडे बघू लागली....तिचा तो नाजूक स्पर्श....स्वप्नील तिच्याकडे बघतच राहिला....
"तू बस मी जरा मूड बनवते तुझा"
अस बोलून तिने स्वप्नीलच्या गालाचे चुंबन घेतले आणि समोरच्या पियानो जवळ जाऊन बसली आणि पियानोच्या पांढऱ्या निळ्या बटणावर आपली बोटे वेगाने फिरवू लागली.....अगदी बेभान होऊन वाजवू लागली....त्या पियानोच्या संगीतात एक वेगळीच लयबद्धता होती एक वेगळं कंपन तयार झालं होतं....आता तो आवाज काहीसा भयानक वाटत होता.....किंचाळीसारखा वाटत होता....काही कळायच्या आत ऍडम तिकडून चहाचा एक कप घेऊन आला....ज्यूलीने स्मितहास्य करत इशारा केला...तिचे डोळे काहीसे गूढ आणि क्रूर बनले होते.....जणू ती स्वप्नीलला डोळ्यांनी आदेश देत होती....स्वप्नील त्या कपातला चहा पिऊ लागला....आता ज्यूली त्वेषाने पियानो वाजवू लागली.....स्वप्नीलचं डोकं गरगरु लागलं...सगळं काही अंधुक दिसू लागलं.....त्याच्या हातातून तो चहाचा कप खाली पडला.....स्वप्नीलचे डोळे हळूहळू बंद झाले.....तो सोफ्यावर बेशुद्ध पडला.....ज्यूलीची बोटं थांबली....बेशुद्ध झालेल्या स्वप्नीलकडे बघून ऍडम आणि ज्यूली एकामेकाकडे बघून स्मितहास्य करू लागले....त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं..............(क्रमशः)
लेखन :- शशांक सुर्वे