#आत्मदाह
©® कविता दातार
कुणाच्यातरी रडण्याच्या आवाजाने मला जाग आली. पहाते तर, माझा राघव "आई...." अशी आर्त हाक देऊन ओक्सबोक्शी रडत होता. त्याचं रडणं बघून माझ्या काळजात कळ उठली. "राघव का रडतोस बाळा ?"असे बोलून, त्याचे मस्तक कुरवाळून, त्याला शांत करण्यासाठी मी हात पुढे केला. पण... अरेच्चा... हे काय ???
मी राघवला स्पर्श करू शकत नाहीये. त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. पण का ??? आणि ही पलंगावर निपचित पडलेली कोण आहे? हुबेहूब माझ्यासारखी दिसतेय. जिला बिलगून राघव एवढा रडतोय.... म्हणजे मी....
अरे देवा... काय होऊन बसले हे ?? आता माझ्या लाडक्या राघवचं कसं होणार ?? कसं समजावू मी त्याला ?? की तुझी आई शरीराने गेली असली तरी मनाने तुझ्यासोबत आहे आणि कायम राहील. पण...
माझं काय ?? हा आत्मदाह, ही तडफड कधी थांबणार?? आत्ताच असह्य झालीय. "तू या आत्मदाहापासून कधीच मुक्त होणार नाहीस. अशीच तडफडत राहशील. कारण तू स्वतःला संपवलस. मात्र राघव मध्ये अडकून पडली आहेस." माझ्या अंतरात्म्याने मला सुनावलं. का? का संपवलं मी स्वतःला?? होय... काल रात्री झोपेच्या गोळ्यांचा ओव्हर डोस घेतला मी आणि कायमची झोपले.
का विचारताय?? कंटाळले मी या नीरस, रखरखीत आयुष्याला... ज्यात प्रेम, आनंद, आशा अपेक्षा काहीही उरलं नव्हतं. होती फक्त नवऱ्यासोबत ची रोजची भांडणं, आरडा ओरड आणि विसंवाद...
शशी, माझा नवरा, पहिल्यापासूनच पराकोटीचा संतापी, अहंकारी त्यात दारूचे व्यसन... त्या पायी त्याच्या कामावर झालेला परिणाम... थांबून राहिलेले प्रमोशन... आणि या सगळ्याचा माझ्यावर आणि राघव वर निघणारा संताप... संताप सुद्धा साधा नाही, तर प्रचंड आरडाओरड, मारझोड, वस्तूंची फेकाफेक... कधी लहर असली आणि प्यायला नसला तर, शशी तसं बरं वागायचा... पण असा दिवस क्वचितच उगवायचा.
या सगळ्याचा माझ्या तब्येतीवर व्हायचा तोच परिणाम झाला. चाळीशी गाठण्या अगोदरच मला रक्तदाब आणि मधुमेहाचे दुखणे जडले. घरातील सततच्या भांडणांमुळे लहानगा राघव सतत भीतीच्या छायेखाली राहू लागला आणि समजायला लागल्यापासून बापाचा पराकोटीचा द्वेष करायला लागला. या सगळ्यात समाधानाची बाब म्हणजे माझं स्वतःच्या पायावर उभं असणं... माझी शहरातील नामांकित, सरकारी शाळेतील शिक्षिकेची कायम नोकरी.
राघव ची आई आणि बाबा अशा दोन्ही भूमिका मी पार पाडत होते. राघवला तर आई म्हणजे जीव की प्राण... अठरा वर्षांचा झालाय तरी, दिवसभरात घडलेली अगदी छोटीशी गोष्ट सुद्धा राघव मला सांगतो. माझ्यापासून काहीही लपवत नाही. गुणी बाळ आहे माझं तो..त्याच्याकडे बघूनच माझे दिवस सरत होते.
पत्नीचे कर्तव्य मात्र मी चोख पार पाडत होते. माझ्या संस्कारी मनामुळे आणि सहवासाने शशीवर माझं प्रेम होतं. त्याचं खाणं-पिणं, तब्येत सगळं व्यवस्थित सांभाळत होते. कसाही असला तरी माझा नवरा बाहेरख्याली नाही, चांगल्या चारित्र्याचा आहे, याचे मला समाधान होते. पण माझं हे समाधान नसून गैरसमज आहे, हे मला आमच्या लग्नाला तब्बल वीस वर्ष झाल्यानंतर कळलं... एका निनावी फोनमुळे...
शशीचे त्याच्या ऑफिस मधल्या कलिग नयना सोबत गेल्या सहा वर्षांपासून असलेल्या संबंधांबाबत समजल्यावर संतापाने आणि अपमानाने मी पेटून उठले. शशीला याचा जाब विचारता क्षणी त्याचा रंग उडालेला चेहरा पाहून मी काय ते समजले. पण पुढच्या क्षणी तो निगरगट्ट माणूस, हे संबंध सरळ सरळ नाकबूल करून मोकळा झाला. मी नयनालाही जाऊन भेटले. तिच्याशी भांडले. पण...
"तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे मॅडम, शशिकांत सरांशी माझा ऑफिसच्या कामा व्यतिरिक्त काहीही संबंध नाही." हेच ती पुन्हा पुन्हा सांगत राहिली.
गेल्या चार महिन्यांपासून पत्नी म्हणून शशी सोबत असलेले सगळे संबंध मी संपवले आहेत. त्याच्याशी बोलणे बंद केलेय. निव्वळ राघव मुळे मी या घरात राहतेय. पण माझे आता कशातच मन नाहीये. हा ताण आता असह्य झालाय... मी सगळं काही सहन करेन, पण फसवणूक नाही सहन होत आहे. अपमान आणि अवहेलनेने मी जळतेय. तडफड होतेय जीवाची...
यातून सुटण्याचा एकच मार्ग दिसतोय... स्वतःला संपवायचं... पण... पण... राघवच काय ? त्याला कोण आहे माझ्याशिवाय ?? पण आई विना तान्ही बाळ सुद्धा राहतात. मग राघव तर अठरा वर्षांचा आहे...आणि शहाणा सुद्धा... माझ्या जाण्याने त्याला खूप दुःख होईल. पण सावरेल तो हळूहळू जसा काळ जाईल तसा...मी मात्र या रखरखीत, निष्प्रेम, नरकासारख्या आयुष्यातून एकदाची सुटेन.
माझा विचार पक्का झाला. माझ्या डॉक्टर मैत्रिणीला भेटून 'झोप येत नाही...' या सबबीखाली मी झोपेच्या गोळ्यांचे प्रिस्क्रीप्शन मिळवलं. तेच प्रिस्क्रीप्शन तीन-चार मेडिकल स्टोअर्स मध्ये दाखवून जास्तीच्या झोपेच्या गोळ्या खरेदी केल्या. त्या सगळ्या गोळ्यांची पावडर करून पाण्यात मिसळून काल रात्री एका दमात प्यायले आणि हा त्रास, ही तडफड आता संपेल या विचाराने शांत झोपले.
पण... माझी शारीरिक तडफड, त्रास संपले तरी....माझा आत्मदाह मात्र कमी झाला नाहीये. उलट कैक पटीने तो वाढलाय. माझा जीव माझ्या राघव मध्ये अडकलाय. त्यामुळे माझी तडफड वाढतेय. कसं होणार त्याचं माझ्याशिवाय ? किती रडतोय तो ?? बाळा राघव मी हे काय करून बसले रे ??? निदान तुझ्याकडे पाहून तरी जगायला हवं होतं. आता माझी या आत्मदाहातून सुटका कधी होणार? माहित नाही. देहविहीन मी, माझा आत्मा आक्रंदतो आहे. पण ते आक्रंदन कोणापर्यंत पोहोचू शकत नाहीये.
अलार्म च्या कर्कश्य आवाजाने मला जाग आली. सकाळचे सहा वाजले होते. बापरे !!! केवढं भयानक स्वप्न होतं हे ... हे खरे की आयुष्याला त्रासून, आत्महत्येचा विचार करून मी झोपेच्या गोळ्या आणून ठेवल्या आहेत. पण अजून मला त्या गोळ्या घेण्याची हिंमत झाली नाहीये. खरंतर हिम्मत आत्महत्या करून मरायला नाही, आयुष्याशी दोन हात करून, त्यातील अडचणींवर मात करून जगायला लागते, हे कळलय मला.
माझ्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी आहेत ??? माझा लाडका राघव, माझं आवडतं अध्यापनाचं, विद्यार्थी घडवण्याचं काम.... ज्या वाईट त्रासदायक गोष्टी आहेत ते माझे प्रारब्ध भोग आहेत. मग तक्रार कशाची???
मी पुन्हा असा आत्महत्येचा, पळपुटा विचार कधीही करणार नाही. कुठल्यातरी मराठी चित्रपटातील "आयुष्य सुंदर आहे. त्याला मी अजून सुंदर बनवणार..." हा संवाद मला आठवून गेला आणि एका ऊर्मी सरशी उठून मी आणलेल्या झोपेच्या गोळ्या उचलून केरात टाकल्या.
(कथा काल्पनिक आहे.)
©® कविता दातार