#फायनलड्राप्ट (लघुकथा )
काळ्याकुट्ट गहिऱ्या काळोखाच्या त्या गडद रात्रीला हळूहळू सुरुवात झाली होती. आभाळ गच्च भरले गेले होते. मध्येच लक्खकन अधूनमधून विजा चमकत त्या काळोखात आपले अल्पसे प्रकाशमान अस्तित्व दाखवून देण्यासाठी आभाळात चमकून जात होत्या. हायवेवरील वळणावर असलेल्या त्या ढाब्यावजा हॉटेलात अजुनही काही तुरळक गर्दी दिसून येत होती.
हा शेवटचा पेग अगदी शेवटचा.... !!
प्रॉमिस... मला जास्त चढली नाही. मी अजुनही त्या कोपऱ्यातील घड्याळात रात्रीचे बारा वाजून सोळा मिनिटे झाले आहेत हे अचूक पाहून सांगू शकतो.
खरंच यार हा शेवटचा पेग.. त्यानंतर थेट आपापल्या घरी ! हवे तर तुला घरी ड्रॉप करू शकतो मी !!
समोरील आईस ट्रे मधील दोन आईस क्यूब उचलत रोहितने ग्लासात टाकत समोरील खुर्चीवर बसलेल्या पवनला सांगितले.
अरे पण रोहित उद्या फायनल डील आहे तुझ्या प्रोजेक्ट्सची प्रोड्युसरसोबत... तो सकाळीच येणार आहे. बेशिस्त अजिबात खपत नाही त्याला!!
त्याची शिस्तबद्ध जीवनशैली आणि प्रोफेशनल व्यवहार तू ऐकून आहेस ना??
अरे गोली मार उसको !! ही स्क्रिप्ट त्याला आतापर्यन्त मी जुजबी ऐकवली आहे. त्याचा बराच होकार आहे. एंडिंगला काहीतरी भन्नाट आणि वेगळाच अनपेक्षित ट्विस्ट हवा आहे असे तो म्हणतोय. मी स्क्रिप्ट बऱ्यापैकी फायनल केली आहे. उद्या त्याला पूर्ण स्क्रिप्ट ऐकवायची. आणि आपला हक्काचा चेक त्याच्याकडून साइन करून घ्यायचा. मग मस्त दहा पंधरा दिवस उटी किंवा गोव्याला.. !! या मुंबईच्या उकाड्यात कोण थांबेल.
शेवटचा पेग घशाखाली रिता करत रोहित त्याच्या आगामी प्लॅनबद्दल पवनला सांगू लागला.
असे काय डील आहे नक्की?? आणि फायनल प्रोजेक्ट फिल्म की वेबसिरीज?? पवन काहीसा गोंधळला.
वेबसिरीज ! नुसती वेबसिरीज नाही तर हॉरर वेबसिरीज ...
बजेट फिल्मइतकं नाही पण प्लॅटफॉर्म मोठा आहे. तिथे पुढे जाण्यास वाव आहे. फायनल अमाऊंट साधारण 10 लाख रुपये !!
वा पण तो फायनल ट्विस्ट काय लिहिला आहेस??
ऐक !!
हिरो परदेशातून आलेल्या त्या हिरोईनला फसवून मारण्याचा प्रयत्न करतो. जी पूर्वायुष्यात एक सुंदर "यक्षिणी " असते. तिची सर्व संपत्ती हडप केल्यावर तो तिची धनदौलत लुटून एका रात्री तिच्या बंगल्यातून बाहेरगावी जाण्यास निघतो. आतापर्यंत त्याने अनेकजणींना फसवलेले असते. ही सुद्धा अशीच त्याच्या जाळ्यात फसते. मग्...
मग पुढे काय?? पवन ती स्क्रिप्ट ऐकून थोडासा उत्साहीत झाला.
इथेच खरी हॉरर एंट्री आहे. रात्रीच्या वेळेस तो सुनसान रस्त्याने कारमधून जात असतो. अचानक ती पुन्हा कारसमोर येते. आणि कारचे नियंत्रण सुटते. हिरोचा खेळ खल्लास....
म्हणजे यक्षिनी कधीच मरत नाही हे मला दाखवून द्यायचे आहे.
रोहित बराच आत्मविश्वासाने सांगत होता.
बस इतकीच स्टोरी... आणि ह्याचे दहा लाख?? कमाल आहे तुझी !!
नाही अजून बरेच आहे. हिरोचे पूर्वायुष्य, त्याची हिरोईनसोबत भेट, मग थोडासा रोमान्स काहीशी पटकथा, मग त्याला तिचे खरे स्वरूप कळणे. मग् त्याने जीवावर बेतलेल्या संकटातून सुरक्षित केलेला पोबारा..
धुंदिचा अंमल जास्तच चढला गेला होता. वातावरण काहीसे झिंगलेले बेभान करणारे तयार होत होते.
सर अजून फक्त पंधरा मिनिट नंतर बार बंद करण्याची वेळ येईल.
तो पांढऱ्या शर्टावर लाल वेलवेटचा सूट चढवलेला हसतमुख वेटर त्याला सूचना देऊ लागला.
हो फक्त शेवटचा फायनल पेग पंधरा मिनिटात संपवतो. तो आण...... माझे होत आले आहे.
वेटरने त्या चकचकित काचेच्या ग्लासातून काहीसे अर्धवट भरलेले ते पेय त्याच्या पुढ्यात आणून ठेवले.
तर मग पवन अशी आहे फायनल स्टोरी.
शेवटचा पेग काहीसा जळजळ करत घशाखाली उतरत गेला.
मला नाही वाटत ही स्टोरी सुचलेली आहे. ही कुठेतरी तू अनुभवलेली प्रत्यक्षात घडलेली कथा आहे. पवनने शंका बोलून दाखवली.
अचूक.. शुअर शॉट..
प्रत्यक्ष माझ्यासोबत घडलेली.. फरक इतकाच की मी कोणालाही फसवले नाही. किंवा कोणाला जीवे मारले सुद्धा नाही. फरक इतकाच कि ती "यक्षिनी" होती हे मला ठाऊक होते. तिचा जीव जडला गेला होता माझ्यावर... सर्व काही मला सहजच मिळत होते. बदल्यात दररोज थोडीशी तडजोड...
कसली तडजोड?? पवन सांशक झाला.
रोजच तिला पोटभर रक्त पिण्यास द्यायचे.
तो शांतपणे उत्तरला.
मग??
एके दिवशी ती सहजच जशी आली तशी जीवनातून एकाएक अदृश्य झाली.
माझा नाही विश्वास ह्या गोष्टीवर... मी ह्या सर्वाला फक्त काल्पनिक मानतो. असे काही जर असेल तर सर्व किती सहजशक्य झाले असते.
पवनने त्याच्या विचाराशी प्रामाणिक राहत रोहितला निरूत्तर करण्याचा प्रयत्न केला.
ऐक !!
ह्या सर्व गूढ गोष्टी अजूनही अस्तित्वात आहे. त्या सर्व माझ्यासारख्या व्यक्तीकडे खेचून घेतल्या जातात. लोहचुंबकाचा खेळ म्हण हवे तर..
ज्या गोष्टीबाबत आकर्षण असते. निसर्गतः त्या गोष्टी त्या माध्यमातून अवतरीत होतात. खेचून घेतल्या जातात. काहीजण याला अनादर किंवा पॅरालल वर्ल्ड थियरी म्हणतात. शिवाय लॉ ऑफ अँट्रॅक्शन आहे. ज्याला आजकाल सर्व मान्य करतात.
सिगारेटच्या गोलाकार वलयांनी आसपासचा परिसर धुराळलेला गेला होता. शेवटची पंधरा मिनिट केव्हाच संपून गेली होती.
शेवटची बार बंद होण्याची रिंग ऐकू आली तसे ते दोघेही उठले. बिल पेड करत पार्किंग लॉट मध्ये पार्क केलेल्या त्याच्या गाडीपाशी आले.
मग ती कशी अदृश्य झाली तुझ्या जीवनातून?? तू काहीच तिचा शोध घेतला नाहीस???
पवनने पुढचा प्रश्न टाकला.
कदाचित तिची इच्छा होती.. मी तिच्यासोबत तिच्या अदृश्य जगतात कायमच निघून जावे. मृत्यू नाही. पण असेच काहीसे बेचैन जीवन व्यतित करावे.
ति त्या रात्रीनंतर केव्हाच मला दिसली नाही. कदाचित तिने माझा विचार करून देणे सोडले असेल. तो उत्तरला.
कदाचित असेही असू शकेल ती तिच्या पूर्वीच्या आयुष्यातील एकुण एक तरुणांना आपल्या अदृश्य विश्वात खेचून घेत त्यांना आपले कायमचे गुलाम करत असावी. एकापाठोपाठ एक ती सर्वांना संपवत असावी. कदाचित पुढचा नंबर तुझाही असू शकेल... पवनने भिती बोलून दाखवली.
गप्प काहीही बरळू नकोस.. नुसत्या विचाराने हालत खराब झाली. पण एक सांगू.. तो काहीसा शून्यात पाहून त्याला म्हणू लागला.
काय???
जर असे झालेच तर माझी ही स्टोरी लवकरात लवकर प्रेक्षकासमोर आणायची जबाबदारी तुझी.. बोल मंजूर... !!
यार तू तर इमोशनल झाला. मी तर तुझी मजा घेत होतो. इट्स ओके... असे काही घडणार नाही.
एकमेकांना शेकहॅन्ड करत ते दोघेही निघाले. पार्किंग लॉटमधील दोन गाड्याचे दिवे उघडझाप करू लागले.
खाडखुट गियर टाकण्याचा आवाज झाला. पार्किंग लॉट मधून बाहेर पडत दोन्ही गाड्या आपापल्या मार्गाला भरधाव वेगात निघून गेल्या.
........
........
सुमारे दोन वर्षांनंत्तर....
रोहितच्या घरी त्याच्या तसबीरीला तो चंदनी हार वाऱ्यावर फडफडत होता. समोरच पोर्चवर पवन बसला होता. त्याच्या हातात तो दहा लाख रुपयाचा चेक दिसत होता.
हे घ्या.. आई... रोहितच्या हक्काची कमाई.... जे झाले ते अघटीत झाले. शेवटी आजतागायत तो कोमातून बाहेर येईलच या आशेवर मी थांबलो होतो. पण तो ब्रेनडेड झाला. आता सर्व संपले.
तो आहे इथेच !! आमच्यासोबत असतोच !! त्याला हवं तेव्हा तो येतो.. आणि हवं तेव्हा जातो. कुठे असतो हे कधीच सांगत नाही.
म्हणजे?? रोहितच्या आईचा खुलासा ऐकून तो चक्रावून गेला.
त्याच्या स्टोरीवर बनलेली वेबसिरीज तुफान चालली हे ठाऊक आहे त्याला?? पवनने तिला विचारले.
हो. तिचे शांतपणे उत्तर आले.
मी निघतो . काही हवे असल्यास कळवावे.
अपार्टमेंटखाली थांबलेली गाडी वेगाने निघून गेली. ती थेट पोलीस स्टेशनमध्ये...
समोरच्या टेबलवर फिट अँड फाईन दिसत असलेले निरीक्षक प्रधान बसलेले होते.
हं बोला काय तक्रार आहे तुमची???
माफ करा सर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. पण मला रोहितच्या अपघाताबद्दल काही माहिती हवी आहे.
तुम्ही??
मी पवन... त्या रात्री तो अपघात घडण्याआधी त्याच्यासोबत होतो.
ओह आय सी... आठवले, ती फिल्म रायटरच्या अपघाताची केस?? मी नुकताच चार्ज घेतला होता तेव्हा.. तुमची चौकशी सुद्धा झाली होती मग??
मग सर तुम्हाला यात काही वेगळे जाणवले नाही.
तो काहीसा गोंधळला होता.
आय सी... केस ड्रिंक ड्रायव्हिंग ची होती. जी ओपन अँड शट प्रकारातील होती.
पण सर?? गाडीला ठोकर कुठे बसली???
अपघातीविमा केव्हाच नाकारला गेला आहे.
ती ठोकर नव्हतीच..भरधाव वेगात असलेल्या गाडीला करकचून ब्रेक दाबल्याने स्टीयरिंगवर त्याचे डोके आपटले गेले होते. वर स्पॉट डेथ नव्हती. मला वाटते तो रायटर कोमात गेला असावा. म्हणून प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हता. केस क्लोज करण्यात आली.
इतकं सर्व आजच विचारण्याचे कारण?? इन्स्पेक्टर प्रधान काहीसे चिडचिड करू लागले होते.
सर त्या रायटरचा अगदी काही दिवसापूर्वी ब्रेनडेड झाल्याने मृत्यू झाला. पण त्याच्या घरातील व्यक्ती काहीतरी वेगळेच सांगत आहे. त्याने पुन्हा इन्स्पेक्टर प्रधानला कोड्यात टाकले.
म्हणजे?? सर अनधिकृतरित्या या केस मध्ये काही पॅरानॉर्मल असल्याचे तुम्हाला जाणवले काय??
त्याने अगदी मुद्याला हात घातला.
येस... पण हे ऑफ द रेकॉर्ड सांगतोय..
अपघातात सापडलेल्या व्यक्तीच्या शरीरावर कुठेही जबरी घाव दिसून आले नाहीत. वर कारमध्ये ही कुठेही रक्त नव्हते. कोणीतरी शरीरातील रक्ताचा थेंब आणि थेंब शोषित केला असावा. काहीसे डोळे हे भयचकित झाल्याप्रमाणे उघडे होते. कदाचित काहीतरी विचित्र दिसल्यावर मेंदूला शॉक लागला गेला असावा.
आभारी आहे सर... तुमच्या अमूल्य वेळेबद्दल..
माझी शंका मिटली.
पोलीस स्टेशनमधून गाडी निघाली. ती थेट त्याच्या बंगल्यावर थांबली.
...
...
धुंद पावसाची बारीकशी रिमझिम बाहेर सुरु होती.
काचेच्या तावदानावर त्याचे ओघळ निथळत होते. हवेत गारवा वाढत चालला होता. बाहेर सर्वत्र अंधार दाटून आला होता. आभाळात चंद्र काळोख्या ढगानी झाकोळला गेला होता.
बंगल्याच्या गच्चीवरच्या एका कोपऱ्यात छोटेसे टेबल व्यवस्थित मांडून ठेवले गेले होते. त्यावर इंपोर्टेड स्कॉच आणि काहीसे ग्लास ठेवले गेले होते.
एक मोठा पेग भरत त्याने तो घशाखाली रिता केला.
दुरूनच आभाळात कुठेतरी गडगडाट ऐकु आला. लक्खकन विजा कडाडल्या. जोरदार वारा त्या रिमझिम करणाऱ्या पावसाशी झोंबू लागला.
ती पावसाची झडप थेट तोंडावर आली त्याने डोळे बंद केले.
समोरच्या गच्चीतील एका काळोखी अंधारी भागात रोहित उभा होता. अगदी पहिल्यासारखा फ्रेश आणि टवटवीत....
रोहित तू?? इकडे?? कस शक्य आहे हे सर्व??
मी म्हणालो होतो ना.. ती.. तिचे अदृश्य जग..
पलीकडून शांत आवाज आला.
मग?? पवन काहीसा घाबरला.
त्या रात्री तिने अगदी मी लिहिलेल्या स्टोरीच्या नायिकेप्रमाणे भरधाव वेगात असलेल्या माझ्या कार समोर एंट्री घेतली. त्या रात्री शरीराने इथे असलो तरी मनाने आणि आत्म्याने तिच्या अदृश्य जगात खेचून घेतलो गेलो होतो.
जी काही इथे अंशरुपी आत्म्याची धुगधुगी शिल्लक होती. ती लवकरच संपून गेली. आता हेच माझे नवीन जग....
तो आवाज काहीसा विफल झाला होता.
मग तू आता इथे पुन्हा??? पवनने त्याला प्रश्न केला.
हा नियम आहे. अदृश्य जगाचा....
कोणालाही अनुत्तरीत न ठेवता कायमचे इथे निघून यायचे. आपले प्रयाण हे गूढ न राहता आपल्या विश्वाची माहिती प्रत्येक जिज्ञासु व्यक्तीला द्यायची.
हे सर्व खरे आहे काय??? पवन पुरता गोंधळला होता.
हो. त्याचा आवाज काहीसा वरमला. काहीसा मवाळ झाला. त्याच्या अस्पष्ट तरंगत्या आकृतीमागे काहीशी हिडीस आकृती त्याला रागाने पाहत होती.
आभाळात लक्खकन वीज चमकली. कुठेतरी कडाडली. वारा गार सुटला गेला होता. त्या हिडीस आकृतीमागोमाग रोहितची आकृती हळूहळू विरळ झाली.
समाप्त.
फायनल ड्राप्ट...
लेखन : संदिप मुणगेकर ( MSR )