खेकडा
भाग क्र - १
(नमस्कार....ह्या विषयावर लघुकथा लिहणार होतो पण ही कथा थोडी मोठी झाली आहे....फेसबुक शब्दमर्यादेमुळे 2 भाग सलग पोस्ट करत आहे....दुसऱ्या भागाची लिंक ही कथा संपताच दिसेल....तेव्हा वाचून जरूर अभिप्राय द्या ...दोन्ही भागावर कमेंट्स वाचायला उत्सुक आहे)
सकाळची वेळ 11 वाजले असतील.....रस्त्याच्या कडेला एका पादचारी पुलाच्या खाली लोकांची गर्दी जमली होती.....प्रत्येकाचे कॅमेरे समोरचा सिन टिपून घेत होते काहींचे फोटो काढून झाल्यावर गर्दीला बाजूला करत मोकळ्या जागेत येऊन काहीजण तो छिन्नविच्छिन्न फोटो व्हाट्सएपवर टाकून वरती "सिरीयल किलर कडून अजून एक खून" अस काहीस टायटल टाकून मेसेज व्हायरल करण्यात व्यस्त होता.....तिकडून दोन कॉन्स्टेबल धावत येत होते "अजून एक खून" ह्या बातमीतला "अजून" हा शब्द त्यांना अजून शिव्या खायला लावणारा होता.....कारण जवळपास हा तेरावा खून पडला होता......दर महिन्याला हे सत्र चालूच होतं.....खून करायची पद्धत तीच......कुणी तरी निराधार रस्त्याकडेला झोपलेला भिकारी शोधून जवळपास 20-25 किलोचा दगड त्या झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात घालून कुणीतरी निर्घृण खून करत होते......मरणारे सगळे बेवारस,गरीब त्यामुळे आधी ह्या घटनांना तितके महत्व दिले गेले नाही पण नंतर नंतर हे सत्र वाढू लागले दर महिन्याला एक खून पडत होता.....आणि हा खुनी मोकाट......पोलिसांना नेमकं कारण समजत नव्हतं.....गरीब निराधार भिकारी लोकांना मारून कुणाला काय मिळणार?? हा प्रश्न अनेकांना पडला होता......पण त्या माथेफिरूला पकडणे गरजेचे होते.......पोलिसांच्या गस्ती वाढल्या होत्या.....अनेक वेडसर संशयित पोलिसांच्या ताब्यात होते......पण काही तपास लागत नव्हता.....लोकांत दहशत होती......मीडिया मध्ये ही news सतत फिरत असल्यामुळे पोलीस कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते......ह्या प्रकरणाचा तपास इन्स्पेक्टर कोलप करत होते.....त्यांनी अनेक केस सोल्व्ह केल्या होत्या पण हा सायको किलर मात्र जड जात होता......पोलीस रात्री फिरून फिरून अक्षरशः मेटाकुटीला आले होते एवढ्या मोठ्या शहरात हा आरोपी गवसायचा कसा??......दुपारी 12 वाजण्याच्या आसपास कोलप साहेब तिथे आले......रक्ताचा सडा पडला होता......निवांत झोपलेल्या भिकार्याच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.....रक्त वाहत होतं.....आणि आता पर्यतच्या तेरा खुनात जी घटना कायम दिसून आली तीच इथे होती......एका कोपऱ्यात रक्ताच्या थारोळ्यात काही हाताचे ठसे होते.......ते ठसे प्रत्येक खुनाच्या वेळी दिसायचे.....त्या रक्तात कुणी हात धुवून घेतल्यासारख काहीसं होतं.......कोलप यांनी आपली टोपी काढली आणि आपल्या मुठी आवळल्या.....स्वतःच्या मनाला ते प्रश्न करू लागले......"कोण असेल हा सनकी??""
(12 तासापूर्वी...........)
सगळीकडे किर्रर्र शांतता होती.....तो आपले सावज शोधत होता....त्याची बेचैनी वाढत होती कारण त्याच्याच भीतीने कुणी रस्त्याकडेला झोपत नव्हते.....मधून मधून पोलीस सायरनचा आवाज येत होता तो आवाज आला की त्याची तारांबळ उडायची.....लगेच लपण्याची जागा शोधायचा.......पण ह्यावेळी त्याला इच्छित अस काही घडत नव्हता.....पोलिसांना मनोमन शिव्या देत हातात एक रिकामी पाण्याची बाटली घेऊन तो एका कोपऱ्यात लपला होता......एका पादचारी पुलाचा कोपरा होता तो.....तिकडून कोपऱ्यातून कुणी खोकत होतं.....त्या आवाजाचा पाठलाग करत तो तिथे पोहोचला.......दगडू आज मारलेल्या पाकिटातून पैसे मोजून ठेवत होता.....आज त्याला भली मोठी रक्कम मिळाली होती.....त्यातला निम्मा ऐवज त्याने दारूच्या अड्ड्यावर कधीच संपवला होता......बाकीचा ऐवज त्याने नीट आपल्या खिश्यात ठेवून मस्त झोपी गेला होता......दगडूला बघून त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली......त्याने डोळे मिटले.....त्या स्वर्गातील एक अप्सरा त्याच्या समोर अर्ध नग्न उभी राहून लडिवाळपणे बोलावत असल्याचं चित्र त्याने आपल्या बंद डोळ्याच्या मागे उभं केलं आणि त्याच्या अंगावर एक शहरा उठला.....आपल्या कामेच्छा त्याला अजिबात आवरता येत नव्हत्या......आपली शरीराची भूक भागवण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार होता......त्याचे अंग थरथरत होते.....त्या स्वर्गासारख्या असणाऱ्या जागेतील ती अर्धनग्न अप्सरा आणि तिचं ते सौन्दर्य.......त्याने थरथरत समोरचा भला मोठा दगड उचलला....आणि झोपलेल्या पाकीटमार दगडू जवळ जाऊ लागला.....क्षणाचाही विलंब न लावता त्याने तो भलामोठा दगड पाकिटमार दगडूच्या डोक्यात मारला......दगडाचा वार एवढा भयानक होता की दगडूच्या तोंडातुन ब्र ही बाहेर पडला नाही फक्त त्याच्या हातापायाची धडपड होत होती.......पण त्याकडे दुर्लक्ष करत दगडूच्या डोक्यातून जो रक्ताचा ओघळ निघत होता ते रक्त तो एका बाटलीत साठवून घेऊ लागला......एका हाताची ओंजळ करून दुसऱ्या हाताच्या बाटलीत त्याने आपल्या हाताने ते रक्त भरायला सुरवात केली......बाटली जवळपास भरत आली होती आणि दगडूच्या हातापायाची हालचालही शांत झाली होती......रक्ताने भरलेली बाटली घेऊन तो इकडे तिकडे बघत धावत आपल्या घराकडे जाऊ लागला.....अनेक शॉर्टकट्स त्याला माहित होते....रात्रीच्या अंधारात काही कुत्री सुद्धा मागे लागली होती.....पण अनेक आठवणी सोबत मनात अनेक ठराव करून तो धापा टाकत धावत होता......अजूनही ती सुंदर स्त्री त्याच्या डोक्यात घुमत होती.....पण त्या स्त्रीला त्याने बदलायचे ठरवले होते.....त्याच्या हातात एक वेगळ्याच सुंदर अभिनेत्रीचा फोटो होता.....आज हीच आपल्या सोबत असेल असं तो ठरवून बैचेन होऊन धावत होता.....अखेर त्याचं घर आलं.....दार उघडताच कुबट वासाचा भपका नाकात शिरला पण त्या वासाची त्याला सवय होती......त्याला काही तयारी करायची होती.....त्याने आपले सगळे कपडे काढले आणि दुपारीच आणून ठेवलेले ऍडल्ट डायपर घातले.....तो बेडवर झोपला....बाजूला एक दोरी होती त्या दोरीला एक भलीमोठी बाटली लटकली होती.......सलाईन वॉटरने ती बाटली त्याने दुपारीच भरून घेतली होती......बेड वर झोपून त्या नवीन आणलेल्या अभिनेत्रीच चित्र त्याने डोळ्यात साठवलं.......बाजूला लोंबत असलेली सलाईन पाईपची सुई त्याने आपल्या शिरेत खसकन खुपसली.....एक रक्ताचा हलकासा ओघळ वाहत होता.....पण त्याला कसलीच फिकीर नव्हती.....त्याने तो सलाईन सप्लाय सुरू केला.....ह्यावेळी पाच दिवस तरी तिथं ह्या नवीन अभिनेत्री सोबत जाऊन यायचं अस त्याने ठरवलं होतं......आता मुख्य काम बाकी होतं......त्याने नुकतीच भरून आणलेली रक्ताची बाटली हातात घेतली...... आणि हळूहळू आपल्या गळ्याला असलेल्या छोट्याशा छिद्रात एक एक थेंब रक्त सोडू लागला......रक्ताचे थेंब त्या छोट्या छिद्रात जाताच त्याच्या गळ्यात एक हालचाल होऊ लागली.....ते छिद्र हळूहळू मोठं होऊ लागलं.....छिद्र मोठं होताच रक्ताची धार मोठी होऊ लागली.....आपल्या गळ्यात पडलेल्या मोठ्या छिद्रात तो ते रक्त ओतत होता.....एक रक्ताने लालभडक झालेला खेकड्याचा मोठा नांगा त्या छिद्रातून बाहेर आला होता.....अखेर त्याने सगळी रक्ताची बाटली त्या छिद्रात रिकामी केली......त्याच्या गळ्यातून त्या खेकड्याची हालचाल होत होती.....गळ्याच्या आतल्या बाजूला असलेल्या खेकड्याचा हालचालीमुळे त्याला वेदना होत होत्या पण त्याला आता थोडीफार सवय झाली होती.....कारण ह्या वेदनेनंतर मिळणारा आनंद खूप मोठा होता त्याच्यासाठी......एक रक्ताचा ओघळ त्याच्या मानेवरही वाहत होता.....सगळं रक्त संपलं तो अर्धवट बाहेर आलेला खेकडा परत आत जाऊ लागला.....त्याच्या गळ्याला असलेलं छिद्र परत बंद होऊ लागलं.....आता त्याचा नंबर होता......त्याने डोळे बंद केले....एक सुंदर चेहरा त्याने डोळ्यासमोर आणला आणि काहीतरी पुटपटू लागला......ह्यावेळची त्याची लिस्ट मोठी होती किमान पाच दिवस तरी तो तिथे राहणार होता तो सुंदर समुद्र किनारा.....तो मोठा राजवाडा आणि त्याच्या सोबत असणारी ही नवीन दासी......जी त्याचा प्रत्येक हुकूम मानत होती.......सगळा विचार केल्यानंतर त्याने आपले डोळे मिटले....त्याला एक प्रचंड जोराची वेदना झाली आणि त्याने मान टाकली......आता तो दुसऱ्या जगात पोहोचला होता.......त्याने हलकेच डोळे उघडायला सुरवात केली तर त्याला सावरायला आलेली एक सुंदर तरुणी अगदी त्याच्या समोर होती......सूर्याची कोवळी किरणे त्याच्या अंगाला स्पर्श करत होती.....की किणकिन्या डोळ्यांनी त्याने तिला पाहिले आणि झटकन उठून बसला....त्याने आजूबाजूला बघितले समुद्राचा आवाज निळसर पाणी.....मागे असलेला सुंदर राजवाडा आणि त्याचं मुख्य आकर्षण असलेली ती सुंदर तरुणी......तो हसला त्याने आपल्या शरीराकडे बघितले.....त्याचे विद्रुप शरीर तिकडेच राहिले होते ह्या जगात तो एकदम तरुण आणि सुंदर दिसत होता......त्याने कल्पना केल्याप्रमाणे ती अगदी तशीच होती.......त्याला हव्या असलेल्या कपड्यात....त्याने तिला पकडले आणि त्या किनाऱ्यावरच तिच्याशी प्रणय सुरू केला.....त्याला जराही वेळ बरबाद करायचा नव्हता कारण इथे येण्यासाठी त्याने एक खून केला होता........
( 13 महिन्यांपूर्वी...........)
"आरं ये अन्या रांxxx......उकर लवकर बघ तुझ्या बरोबरचे काम आवरून जेवायला गेले आणि तुला एक काम नीट जमना"
खड्ड्यात उतरून अनिल कुदळ चालवत होता.....एका गावात सरकारी गटारीचे काम सुरू होते त्याचीच खुदाई सुरू होती.....ठेकेदार नाकाला रुमाल लावून अनिलकडे बघत होता......अनिलला तो का रुमाल लावून उभा आहे हे माहीत होतं.....ह्या विचारातच त्याचे आजचे काम झालं नव्हतं......तसा अनिल गाव सोडून आलेला.....काय कामधंदा करत नाही म्हणून त्याच्या बापाने त्याला लाथ मारून घराबाहेर काढलं होत.....झाली असतील त्या घटनेला 20 वर्ष.....पण अनिल परत गावाकडे फिरकला नाही......बरोबर पोटापूरत काम करायचं रोज आपले शौक भागवायचे हेच त्याचं सुरू होतं......बाकी कालच्या घटनेमुळे त्याला प्रचंड राग आला होता......अनिल तसा रंगेल माणूस......त्या शहराची वेश्यावस्ती म्हणजे त्याचं दुसरं घर होतं.....सगळी कमाई त्याने ह्याच नादात गमावली होती.......दिवसभर उन्हात त्या वेश्याल्यातील बायकांची स्वप्नं रंगवत काम करायचं आणि रात्री पैसे मिळाल्यावर ते स्वप्न पूर्ण करायचं अस काहीस त्याचं सुरू होतं......वंशपरंपरागत गोऱ्या गोमट्या रंगला उन्हात काम करून खड्डे खणून ग्रहण लागलं होतं......उन्हात काम करून अनिल पूर्ण काळवंढलेला होता.....पण त्याला फिकीर कसली.....चार पैसे फेकले की त्या वेश्यालयातील बायका त्याच्याबद्दल अगदी तोंडात साखर आणून बोलायच्या.......सगळं अगदी एका रेषेत चाललं होतं......अनिल आपल्या कामेच्छा अजिबात कंट्रोल करू शकत नव्हता......म्हणून तर गेल्या वर्षी त्याच्या हाताला दुखापत झाली असताना चोऱ्या करून आपले रंगेल शौक भागवले होते.....पण आता परिस्थिती वेगळी होती......ज्या वेश्यासाठी तो पैसे कमवत जमवत होता त्यातली एकही वेश्या त्याला जवळ घेत नव्हती....त्याला आजारच तसा झाला होता.....त्याच्या शरीराची त्वचा लालसर झाली होती त्यातून एक द्रव नेहमी पाझरत असे.....अनिलच्या अंगाला प्रचंड खाज सुटत होती आणि तो उग्र वास त्याला लोकांच्या पासून दूर घेऊन गेला होता....त्याच्या पूर्ण शरीरभर बारीक फोड उठले होते आणि त्यातून निघणारा तो उग्र वास.......अनिलने अनेक डॉक्टरांना दाखवले पण काहीच फायदा नव्हता......कधी कधी तो एकटाच रडायचा.....अंगावर जाड चादर पांघरून बाहेर पडल्याशिवाय त्याला पर्याय नव्हता.....त्यातच त्याला कोणतीही वेश्या स्वीकारत नव्हती.....कधी कधी त्यांच्या घाण घाण शिव्या ऐकून अनिल परतत होता.....आता तो ह्या त्वचारोगाला कंटाळला होता....त्याच रागात त्याची कुदळ जमिनीवर वार करून माती उकरत होती......अचानक एक खळळळ असा आवाज झाला......काहीतरी लोखंडी अनिलच्या कुदळीला लागलं होतं.....त्याने माती बाजूला केली कसली तरी पेटी होती ती......आता मात्र अनिलचे हात झपझप चालू लागले सगळी माती बाजूला करून त्याने त्या पेटीकडे बघितले.....अगदी छोटीशी लोखंडी पेटी होती......"खजाना तर नसेल??" ह्या एका प्रश्नाने अनिलचे डोळे विस्फारले.....त्याचा मालक सुद्धा उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने तिथून निघून गेला होता....आता अनिलला खूप उत्सुकता लागली होती.....इकडे तिकडे बघून त्याने ती पेटी आपल्या सदर्यात लपवली आणि अंगावर चादर पांघरून इकडे तिकडे बघत तो घरी आला.....त्या पेटीला कसलेसे धागे गुंडाळले होते पण जमिनीत किती दिवस ती पेटी पडून होती काय माहीत......सगळे धागे कुजले होते.....पेटी वरून सुंदर दिसत होती......एक सुंदर नक्षी त्यावर कोरली होती त्यात वरती सुंदर स्वर्गासारखं अस काहीसं होतं आणि खाली एका छोट्या खेकड्याचं चित्र होतं.....एवढ्या छोट्या पेटीवर अशी कला बघून अनिल थक्क होता पण आत काय असेल ह्या कल्पनेने त्याला धीर निघत नव्हता.....त्याचा स्वभाव आधीपासूनच चंचल होता....त्याने ते कुजलेले धागे ओढून काढायला सुरवात केली......सगळे धागे बाजूला झाले......त्या पेटीला कुठलं कुलूप किंवा लॉक अस काहीच नव्हतं......हे बघून अनिल गोंधळला त्या पेटीला लॉक वैगेरे काहीच नाही.....पेटी जुनी आहे पण बिनकामाची तर नसेल???......त्याने हळूहळू ती पेटी उघडली.....अनिलच्या घरचा पत्रा फाटला होता त्यातून तप्त सूर्यप्रकाश आत येत होता....त्या प्रकाशात त्याने ती पेटी उघडली पेटी उघडताच अनिलचे डोळे विस्फारले.....त्यात सोन्याची जाडसर मूर्ती होती हातभार आकाराची.....तो एक सोन्याचा खेकडा होता त्यावर बरोबर त्याच्या पाठीवर एक मोठा निळा हिरा चमकत होता......बरोबर त्यावरच सूर्यप्रकाश पडल्यामुळे.....सगळी कुबट खोली त्या हिऱ्याच्या निळसर प्रकाशात न्हाहून निघाली......अनिलचा श्वास वाढला त्याने तो सोन्याचा खेकडा हातात उचलला आणि आलटून पालटून बघू लागला.....एक मोठा खजाना त्याच्या हाती लागला होता.....अनिलची नजर आता त्या पेटीकडे गेली त्या पेटीत अजून काहीतरी होत....त्याने ते उचललं....एक चमड्याचा तुकडा होता घडी घालून ठेवलेला.....तो तुकडा अनिलने उचलला आणि त्याची घडी उघडली.......त्याने पेटीकडे बघितले आता ती रिकामी होती....दोनच वस्तू होत्या त्यात एक तर सोन्याची होती पण ह्या चमड्याच्या तुकड्याचा अंदाज अनिलला लागेना....त्यावर काहीतरी लिहल्यासारखं होतं काही चिन्हे दिसत होती कसली तरी वेगळी भाषा होती......अनिल तो चामडी तुकडा उलटा पालटा करून बघू लागला.....तसा तो चामडी तुकडा आणि त्यावर लिहलेला तो मजकूर त्याच्या कामाचा नव्हता.....अनिलची नजर परत त्या सोन्याच्या खेकड्याकडे गेली....तो चामडी तुकडा फेकणार इतक्यात त्याची नजर परत त्या मजकुराकडे गेली.....अनिलला आता दुसरा धक्का बसला होता....मगाशी निरुपयोगी भाषेत लिहलेला मजकुर आता मराठी भाषेत दिसत होता.....अनिल आपल्या कपाळावरील घाम पुसत तो मजकूर वाचत होता
"तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.....एका वेगळ्या दुनियेत तुम्ही राजे असाल तिथे सगळे तुमचा हुकूम मानतील....तिथले देव तुम्हीच असाल....त्या जगात पाहिजे तेवढं रहा आपल्या अमर्यादित इच्छा त्या जगात पूर्ण करून घ्या.....पण तिकडचे जायची किंमतही तशीच आहे.....नवीनच मृत झालेल्या व्यक्तीचं ताज गरम रक्त त्या जगात जायचं तिकीट आहे......जर तुम्हाला तिकडच्या जगात जायचं असेल तिथे मज्जा करायची असेल तर तेवढ्या प्रमाणात रक्त द्या....सगळं मान्य असेल तर ह्या चामडी तुकड्याच्या खाली आपलं थोडं रक्त टाकून संमती द्या"
काहीतरी विचित्र लिहलं होतं हे......अशुद्ध मराठी आणि वेडेवाकडे शब्द.....काहींचा अर्थ लागला काहींचा नाही....पण बऱ्यापैकी तो मजकुर अनिलला समजला होता......इच्छापूर्ण करणारी जादुई दुनिया असा एका वाक्यात त्याने अर्थ लावला......पण ह्या असल्या गोष्टीवर अनिलचा अजिबात विश्वास नव्हता.....तो सोन्याचा खेकडा विकून आलेले पैसे त्या वेशेच्या तोंडावर मारून तिला यथेच्छ भोगावी असा काहीसा विचार त्याच्या मनात येत होता.....पण आपोआप मराठीत बदलले शब्द त्यावरचा मजकूर त्याला विचार पडण्यास भाग पाडत होता......पण "मृत व्यक्तीचं ताजे रक्त" ही कल्पना त्याच्या डोक्याबाहेरची होती......त्याने आयुष्यात अनेक कांड केले होते पण कुणाला एक झापड सुद्धा मारली नव्हती......त्याने तो खेकडा परत त्या पेटीत ठेवला आणि पेटी एका कोपऱ्यात ठेवून परत आपल्या कामावर निघून गेला......ह्या विचारात त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता.....तेच तेच विचार त्याच्या मनात फिरत होते......"हे खरं असेल का??.....नाही असं काही नसतं.....आपण तो सोन्याचा खेकडा उद्याच विकून टाकू" असा काहीसा विचार त्याच्या डोक्यात दिवसभर घुमत होता.....काम आवरले अंधुकसा अंधार पडला होता.....कामापासून त्याच्या खोलीचे अंतर 4,5 किलोमीटर होते......त्या उकड्यात आपल्या शरीराचा सडका वास येऊ नये म्हणून अनिलने अंगावर चादर घेतली होती आणि बिडी ओढत तो त्या रस्त्यावरून चालला होता.....उद्या तो खेकडा विकून सरळ वेश्यालय गाठायचे.....सखूच्या तोंडावर जास्तीचे पैसे फेकले की झालं काम....ह्या विचाराने त्याच्या अंगावर शहारे येत होते......
"उद्या कशाला आजच विकून टाकून नाईट मारू सखूकडे....व्हय डबल पैशे देऊ मग तयार होईल ती"
ह्या विचाराने ढेंगा टाकीत तो घराकडे धावत होता.....रस्ता सुमसान होता.....मुश्किलीने एखादं दुसरी गाडी त्या रस्त्यावरून जात होती....इकडे अनिल मात्र आनंदात झपझप चालत होता.....अचानक कसला तरी जोराचा आवाज त्याला आला......समोर एकजण बाईक स्लिप होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.....त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं......तो आपला रक्ताळलेला हात उंचावून अनिल कडे मदतीची अपेक्षा करत होता......अनिल गोंधळला होता.....काही वेळ अनिल कडे बघत बघत त्या जखमी इसमाने जीव सोडला......त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्त वाहत होतं......अनिल त्याच्या जवळ गेला पण तो सुन्न निपचित पडला होता......अनिलला काहीतरी आठवलं.....एक अनुकुचीदार दगड डोक्यात घुसल्याने त्या इसमाच्या डोक्यात एक खोच पडली होती त्यातून रक्त वाहत होते......अनिलला चामडी कागदावरचा मजकूर आठवला......त्याच्या डोक्यात तो विचार घुमू लागला "ताजे रक्त.....सगळ्या इच्छा पूर्ण" हे शब्द त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागले......अनिलने इकडे तिकडे बघितले.....अंधुक अंधार पडत होता....अनिलने आपल्या बगलेत खवलेली प्लास्टिक पाण्याची बाटली काढली......तो माणूस निपचित पडला होता अनिलने बाटली काढली थरथरत्या हातांनी त्याने झाकण उघडले आणि त्या माणसाच्या डोक्यावर जिथे खोच पडली होती तिथे लावून त्या बाटलीत रक्त साठवू लागला......समाजाने नाकारलेल्या अनिलला त्या समाजाबद्दल आणि इथल्या लोकांबद्दल प्रचंड तिरस्कार होता पण हे कृत्य करताना त्याचे हात थरथरत होते.......शेवटी ती बाटली रक्ताने थोडी भरली आणि अनिल जेमतेम धावतच तिथून घराकडे आला.....त्याने दाराला कडी लावली आणि दरवाज्याला स्टूल ढकलून दरवाजा जाम केला....त्याला दरदरून घाम फुटला होता.....त्याने पाण्याच्या पूर्ण कळशीला तोंड लावले.....घटाघट पाणी पिऊन झाल्यावर तो त्याच्या 10 बाय 10 च्या खोलीच्या मध्ये बसला.....त्याने समोर ती पेटी ठेवली.....बाजूला ती रक्ताने भरलेली बाटली ठेवली......त्याने पेटी उघडून तो सोन्याचा खेकडा बाजूला ठेवला....त्याने परत तो चामडी कागद हातात घेतला.......त्यावरचा मजकूर परत वाचू लागला.....इच्छित गोष्ट डोळ्यासमोर आणायची होती.....त्याने आपल्या खोलीत दोन तीन ठिकाणी रत्नमाला जी आताची सुंदर अभिनेत्री होती तिचे मादक फोटो भिंतीवर टांगले होते.....त्या फोटोकडे बघत त्याने डोळे बंद केले.....मनात तो काहीतरी पुटपुटला......त्याने तो चामडी कागद बाजूला ठेवला.....मजकुरात लिहल्याप्रमाणे त्या चामडी कागदावर आपल्या रक्ताचे डाग आवश्यक होते....जणू ते एक कॉन्ट्रॅक्ट होते.....आणि त्याच रक्त म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्ट वर सही......अनिलने बाजूला भिंतीत खवलेले ब्लेड काढले आणि आपल्या बोटावर हलकासा कट मारला......बोटातून रक्त येत होतं.....ते रक्त त्याने त्या चामडी कागदावर टाकलं.....आणि आपलं रक्ताळलेलं बोट तोंडात पकडून त्या खेकड्याकडे बघू लागला.....काही क्षणात अनिलचे डोळे विस्फारले.....तो सोन्याचा निर्जीव खेकडा अचानक हालचाल करू लागला....अनिलला आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना....तो खेकडा हळूहळू त्याच्या जवळ येऊ लागला .....त्याचा आकार आता काहीसा छोटा झाला होता....एखाद्या लॉकेट एवढा...काहीवेळ एकटक अनिलकडे बघत त्या खेकड्याने अनिल वर झेप घेतली आणि सरळ त्याच्या तोंडात घुसला....अनिल घाबरला.....तो खेकडा बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला पण तो खेकडा आता त्याच्या गळ्यातून पोटात उतरला होता......अनिलच्या अंगात वेदना होऊ लागल्या.....एखादं लहान मुलं नवीन घरात पाहिजे तिकडे धावत सुटावं तसा तो खेकडा अनिलच्या शरीरात आतून सगळीकडे फिरत होता.....अनिलच्या पोटात पाठीत हातावर जिथे तो खेकडा जाईल तिथे तिथे त्याला जबर वेदना होऊ लागल्या अनिल किंचाळू लागला....अखेर मानेच्या मागच्या बाजूने तो खेकडा आतून अनिलच्या मेंदू जवळ शिरला....तेव्हा मात्र अनिल बेशुद्ध पडला होता.....त्या खेकड्याने जणू आता पूर्ण शरीरावर ताबा मिळवला होता.....अनिल बसल्याजागी खाली कोसळला हळूहळू त्याच्या गळ्याजवळून एक बारीक रक्ताची धार लागली अनिलचे डोळे एखाद्या मूडद्या प्रमाणे उघडे होते.....त्याच्या गळ्यातून आतल्या बाजूने ड्रिल मारल्या सारखं एक छिद्र पडू लागलं....ते छिद्र आता मोठं होऊ लागलं.....त्यातून त्या खेकड्याचा रक्ताळलेली सोन्याची नांगी बाहेर पडली......अनिलच्या डोळे आता बंद झाले.....त्याचे हात आता ती बाटली शोधू लागले हातात ती रक्ताची बाटली लागताच....त्याचा हात आपोआप ती बाटली पडून त्याच्या गळ्याला पडलेल्या छिद्रात ते रक्त ओतू लागला.....रक्त त्याच्या गळ्याच्या छिद्रात आणि त्या खेकड्याचा नांगीवर पडत होते.....काही वेळाने रक्त संपलं अनिलचा हात खाली गेला.....तो खेकडाही बिळात घुसल्याप्रमाणे अनिलच्या गळ्यात पोखरलेल्या बिळात जाऊन बसला आणि आपोआप ते गळ्याचे छिद्र बंद होऊ लागलं......त्याच्या गळ्याभोवती आता फक्त एक छोटंसं छिद्र दिसत होतं.....अनिलचे डोळे बंद झाले......त्याचे शरीर गार पडू लागले....काहीवेळातच त्याच्या अंगाला सूर्याची प्रखर किरणे झोंबु लागली......सागरी लाटांचा खळखळाट......अनिलचे डोळे बंद होते तरी त्याचा मेंदू विचार करत होता.....आपण तरी घरी झोपलो होतो ते ही रात्री मग हा उन्हाचा दाह कसा???......आणि हा समुद्र??.....त्याने फक्त स्वप्नात बघितला होता....त्याची इच्छा होती समुद्र बघायची पण तो आवाज ऐकून त्याचे डोळे उघडले.....वरती एकदम निरभ्र आकाश होते अनिल ताडकन उठून बसला समोर समुद्र खळाळत होता......आणि त्याच्या समोरच तीच होती त्याची आवडती अभिनेत्री रत्नमाला......ती नुकतीच समुद्रातून भिजून आली होती तिचे कपडे तिच्या सुंदर शरीराला अगदी घट्ट चिटकले होते.....कमालीची मादक दिसत होती.....अनिलने आपल्या शरीराकडे बघितले.....अंगावर फोड उठलेले उग्र वासाचे त्याचे शरीर नव्हतेच.....एकदम गोरगोमटं घटिव शरीर पिळदार स्नायू......अशी स्वप्न तो नेहमी बघायचा पण आता हे स्वप्न खरं होत असल्याचं अनिलला जाणवलं......तो उठून उभा राहिला रत्नमालाही आपल्या विशिष्ट मादक चालीत त्याच्या समोर आली होती......"म्हणजे एकूण हे सगळे खरे आहे....खरच माझ्या इच्छा पूर्ण झाल्या??.....हा समुद्र आणि ही माझी आवडती.....पण खरी इच्छा अजून कुठे पूर्ण झालीय" अस मनोमन विचार करून रत्नमालेच्या कंबरेला हात घालून तिला जवळ ओढले.....जवळून ती अजूनच सुंदर दिसत होती......तिच्या सौन्दर्याचे रसपान करीत त्या फेसळत्या बीच वर दोघांचा प्रणय सुरू झाला.....अश्या प्रणयाची त्याने कल्पनाही केली नव्हती......पण हे जरी सगळं एका वेगळ्या दुनियेत होत असलं तरी तिचा तो उबदार स्पर्श अनिलला स्वर्गसुख देत होता........(क्रमशः)
लेखन - शशांक सुर्वे