जिंगल्या ...
जिंगल्यानी आज पंचवीस वर्षांनी गावात पाय ठेवला ,सोळाव्या वर्षी एका मांत्रिकांबरोबर जिंगल्या गायब झाला तो आज उगवत होता ,आईबाप हाय खाऊन मेले आता जिंगल्याच कोणी नव्हतं घरी . जिंगल्याला गावातल्या सगळ्या खुणा आठवत होत्या ,तसंच होत सर्व गाव बदललं नव्हतं अजिबात पण जिंगल्या पार बदलला होता . जिंगल्या इतके वर्ष कुठे होता ते त्यालाच माहित्ये ,गावातले त्याला आता ओळखतील ही सुतारामही शक्यता नव्हती . जिंगल्या चांगला धिप्पाड आणि आडवा होता ,अस्ताव्यस्त वाढलेली दाढी ,लाल डोळे पाहून धडकीच भरायची मनात सामान्य माणसाच्या . जिंगल्या गावाच्या विहिरीला वळसा घालून पिंपळाजवळ आला ,आता जरा खाली उतरलं की आपलं घर ,असेल का जाग्यावर हा विचार करत करत जिंगल्या उतारावरून खाली आला,समोर जिंगल्याच्या बापाचं रान ,ओसाड पडलेलं होत आणि रानातच मध्यभागी कौलारू घर ,आजूबाजूला वडापिंपळाची झाड ,जिंगल्याला घर बघून मनातून बर वाटलं . जिंगल्या झपझप शेतवाटेवरून घरासमोर येऊन उभा राहिला ,घराचं दार नुसतं लोटलं होत .आईबाप गेल्यापासून त्या घराकडे कोणी ढुंकून बघत नव्हतं . जिंगल्यानी दार ढकललं आणि घाणीचा भपकारा त्याच्या नाकात भरला ,घरात घूस मरून पडली होती . विहिरीत डोकावून पाहिलं तर कमरेभर पाणी होत ,जिंगल्या विहिरीत उतरला आणि पाच सहा डुबक्या मारल्या ,थंडगार पाण्यात अंगावर शहारा आला जिंगल्याच्या .
जिंगल्या पश्चिम बंगालच्या कुठल्यातरी जंगलात त्या मांत्रिकांबरोबर राहत होता ,पंचवीस वर्ष ,अनेक सिद्धी आणि काळ्या जादू आत्मसात असल्याचा त्याला गर्व होता . जिंगल्या घरात राहायला लागला आणि गावात एकच चर्चा सुरु झाली त्याच्याबद्धल ,लोक घाबरून होते त्याला ,त्याच्या चेटूक जादूला,त्या घरात अनेक चमत्कारिक गोष्टी घडायला लागल्यात अशी वार्ता पण गावात होती . पहिला एक महिना जिंगल्या शेताच्या परिसरातून बाहेरच पडला नाही. गावाच्या जत्रेला जिंगल्या फिरत होता इकडे तिकडे ,लोक त्याच्याकडे कुतूहल मिश्रित भीतीने बघत होते .
पाटलाची सून अजूनही कोरडीच होती ,ओटीत मुल नव्हतं ,भरलेल्या शरीराची पाटलाची सून गावातून जायला लागली की तरुण मंडळींच्या हृदयात धड धडायचं . जत्रेत पाटलाची सून आली होती घरच्या मंडळींबरोबर ,जिंगल्या बसला होता वडाच्या पारावर चिलीम फुकत ,डोळे लालबुंद झाले होते आणि त्यात एकप्रकारची गुर्मी दिसत होती . पाटलाची सून वडाच्या पारापाशी थबकली जिंगल्याला बघून . धिप्पाड देहाचा जिंगल्या मांडी घालून बेफिकीरपणे चिलीमीचे झुरके मारत होता . जिंगल्याची नजर पाटलाच्या सुनेवर पडली आणि त्याच्या अंतरंगात खळबळ उडाली ,तिचा देह बघून रोमारोमात आग पेटली ,तिच्या देहाची स्वप्न बघून कानशिलं तापली त्याची .
जिंगल्याच्या डोळ्यासमोरून पाटलाची सून काही हलेना ,झोपड्यात आल्यावर ,जिंगल्यानी विहिरीत डुबकी मारली ,आणि नागव्यानी तो घरात येऊन बसला धुनीसमोर ,डोळ्यात नुसती वासना पेटली होती . पाटलाच्या सुनेचा नागिणीसारखा सळसळता देह थैमान घालत होता त्याच्या मनात . त्यानी त्याचा डबा काढला आणि एक डबी उघडून त्यातून राखेची चिमूट घेऊन त्या धुनीत फुंकरली एकच भपकारा उडाला धुराचा आणि ज्वाळांचा . हळू हळू घरामध्ये कुजबुज ऐकू येऊ लागली ,कुजकट हसण ,किंचाळ्या ,जिंगल्याच्या आजूबाजूला जाग निर्माण झाली . जिंगल्यानी परत एक चिमूट वातावरणात फुंकरली आणि किंकाळ्यांनी घर भरून गेलं . जिंगल्यानी एक रिंगण काढल पाण्याचं ,त्यात डोळे स्थिर करून काहीतरी पुटपुटला आणि त्या रिंगणात हालचाली सुरु झाल्या . जिंगल्यानी पाटलाच्या घराच्या दिशेने ती राखेची चिमूट फुंकरली आणि एकच वावटळ जिंगल्याच्या घराबाहेर निघाली पाटलाच्या घराच्या दिशेने .
पाटलाची सून गाढ झोपेत होती ,अचानक वातावरणात थंडावा आलं म्हणून पांघरूण ओढायला ती उठली आणि तिला काय झालं तेच समजलं नाही,ती उठून चालायला लागली ,बाहेर सोप्यात आली , बाहेर पाटलांचा गडी झोपलेला ,त्याला चाहूल लागल्यावर त्यांनी टॉर्च मारला तर सुनबाई बाहेर निघालेल्या झोपेच्या अवतारात ,पदराचं भान नसल्यानं छातीचा उभार उघडा पडला होता .शंकऱ्यान बोंब ठोकली पाटील म्हणून ,पाटलाचा पोरगा घरात नव्हता म्हणून पाटील धावत आले बाहेर ,सुनेच्या अवताराकडे ते थक्क होऊन बघत राहिले ,"सुनबाई "पाटलांनी हाक मारली ,सुंबाईंनी नुसतं मागे वळून बघितलं त्या नजरेत वेगळच होत काहीतरी . पाटलीण बाई ,स्वयंपाकीणबाई बाहेर आल्या ,दोघीनी सुनबाईंना पकडले . सुनबाईनी त्यांच्या कडे बघितलं आणि एक हिंस्त्र गुरगुर त्यांच्या घश्यातुन ऐकायला मिळली . सगळे दचकले ,सुनबाई आवरत नव्हत्या ,पाटलीणबाईंनी खंडोबाचा भंडारा आणला आणि सूनबाईंच्या कपाळावर लावला ,सूनबाईंची घश्यातील गुरगुर कमी झाली ,त्या निपचित पडल्या ,त्यांना परत खोलीत आणून झोपवलं .
जिंगल्या चवताळला होता ,पाटलाच्या सुनेला नासवायचीच हे ठरवलं होत त्यानी ,तो पुढच्या तयारीला लागला .
" अलख निरंजन " धीर गंभीर आवाज घुमला गुहेत ,सुरेंद्र गुहेमधे आले आणि त्यांनी अलख निरंजनचा आवाज दिला ,गुहेत प्रतिध्वनी उमटले . झोळी कोपऱ्यात ठेऊन सुरेंद्र डोहात उतरले गुहेच्या ,थंडगार पाण्याच्या स्पर्शाने सुरेंद्र सुखावले ,शरीर सोडून दिल त्यांनी डोहामध्ये ,डोह खोल होता ,सहसा ह्या गुहेत कोणी येत जात नव्हतं कारण दाट जंगल आणि कठीण चढाव ह्यामुळे दमछाक व्हायची इकडे येण्यासाठी , सुरेंद्र शांत डोहाच्या थंडगार पाण्यावर पाठीवर तरंगत राहिले अर्धा तास ,मन शांत झालं ,शरीर थंडावल, थकवा पळाला . बाहेर आल्यावर वाऱ्याच्या स्पर्शानी अंगावर काटा आला ,सुरेंद्र स्वतःशीच हसले आणि त्यांच्या तोंडातून आपसूक शब्द आले "अलख निरंजन ". कसल्यातरी ओढीने इकडे आले होते सुरेंद्र ,जमिनीवर पद्मासन घालून सुरेंद्र बसले आणि त्यांच मन वेगानी गावाकडे गेले ,वाटेत स्मशान आणि निर्माण झालेली खळबळ सुरेन्द्रांच्या मनानी टिपली आणि काहीतरी अघटित घडतंय गावात हे जाणले .
" अलख निरंजन "गावात आवाज घुमला,कोणीतरी मोठा बाबा आलाय ह्याची चाहूल गावाला लागली . सुरेंद्र सरळ पाटलाच्या वाड्याकडे निघाले . "अलख निरंजन "असा आवाज दिला वाडयाच्या बाहेर ,पाटलाची सून बधिर होऊन बसलेली तिच्या खोलीमध्ये ,तिच्या खोलीतील वातावरण खळबळलं,त्यांच्यात भीती उत्पन्न झाली ,कुजबुज वाढली ,पाटलाची सून भांबावली . परत एकदा अलख निरंजनचा आवाज दिला सुरेंद्रने . पाटलाची सून घाबरल्यासारखी करायला लागली ,पाटील आणि पाटलीण बाहेर आले ,सुरेंद्रला घरात घेऊन गेले ,पाटलाची सून सुद्धा बाहेर आली ,सुरेंद्र कडे भयंकर नजरेनी बघत होती ,घशातून गुरगुर सुरु झाली . सुरेंद्रच मन आता जिंगल्याच्या झोपड्यात गेलं ,जिंगल्या धुनीसमोर बसून काहीतरी पुटपुटत होता . "अलख निरंजन"चा कानठळ्या बसवणारा आवाज जिंगल्याच्या कानात घुमला ,जिंगल्याला घाम सुटला ,जिंगल्याचा धीर सुटला .परत एकदा 'अलख निरंजन "जिंगल्या जमिनीवर उताणा झाला त्याच्या तोंडातून फेस यायला लागला . इकडे पाटलाची सून बेशुद्ध झाली ,पाटील पाटलीण घाबरले ,गाव गोळा झालं पाटलाच्या घरासमोर . सुरेन्द्रनी बरोबर आणलेल्या बाटलीतलं पाणी पाटलाच्या सुनेच्या तोंडावर शिंपडलं ,सून कावरी बावरी झाली होती . सुरेंद्र तिच्याकडे बघून हसले ,तिला धीर आला .
"अलख निरंजन " सुरेन्द्रनी गावकऱ्यांना जिंगल्याच्या झोपडीच्या दिशेने बोट दाखवले...
आणि सुरेंद्र निघाले परत गुहेत झपझप पावलं टाकत ,पाटलाला काहीच समजलं नाही ,फक्त आपली सून माणसात आली ह्याचा आनंद त्यांना झाला . त्यांनी मनोमन सुरेंद्रला नमस्कार केला आणि म्हणाले "अलख निरंजन बाबा की जय हो ".
अनिरुद्ध