नकोसा................10
वासुदेव पाटील.
हिवाळा लागला तसा गोविंद आईला घेत मुंबई मधील जोगेश्वरीत फायनान्स कंपनी जवळच फ्लॅट भाड्याने घेत राहू लागला. त्यानं अनुराधेला खूप आग्रह केला .पण राधेनं माझी प्रॅक्टीस इथंच छान चालू आहे. तू जा! हवंतर मी मध्यंतरी येत जाईन,सांगत त्याला कटवलं. गोविंद चं कोणत्याही एका ठिकाणी न टिकणं तिला खटकू लागलं. प्रॅक्टिस बंद करणं, एम. डी न करणं, शेतीत लक्ष न देणं, आणि आता नकार देऊनही शेत विकणं तिला जिव्हारी लागलं होतं. हा मुंबईत काही दिवस राहिल व पुन्हा मालखेड्यातच येईन म्हणून तिनं त्यासोबत न जाता मालखेड्यात राहणंच पसंद केलं.
गोविंद व तीन पार्टनर अडीच वर्षात दाम दुप्पट या बोलीवर नवीन ठेवी स्विकारू लागले. आलेल्या ठेवी अरब देशातील आधीच्या मालकाकडं सिमरन मार्फत पाठवू लागले.आधीच्या मालकांनी व सिमरन नं आता ठेवीदारासमोर येणं टाळलं. आधीच्या किरकोळ ठेवीदारांना त्यांनी दामदुप्पट देत चारा टाकत आपला बाडबिस्तरा गुंडवला. पण ठेवीदाराची रीघ वाढली. ते गोविंद व नवीन पार्टनर मार्फत त्यांना मिळू लागले.
माधवचा प्रवेश निश्चीत झाल्याचं कळताच सया व प्रविणला कोण आनंद झाला. पण ही स्पर्धा पाच सहा महिने चालेल व तो पावेतो आपणास मुंबईतच थांबावं लागेल. इकडे ड्रॅगन फ्रुटचं उत्पन्न तर आताशी कुठं सुरुवात झाली होती. पुढचे दोन वर्ष त्याकडं लक्ष दिलं तरच सलग तीन वर्ष उत्पन्नाचा आलेख वाढता राहिल. शिवाय आता हार्वेस्टरचा सिझन ही सुरु होईल. मुंबईत पाच सहा महिने थांबून यश येईल याची शाश्वती नाही व इकडं नुकसान होईल म्हणून माधवनं स्पर्धेत भाग घेण्यास नकार देण्याचं ठरवलं. पण सयानं एन केन प्रकारे त्याला समजावत मी व बाबा शेतीचं पाहू. राधेशाम व वडील हार्वेस्टर सांभाळतील हे पटवून देत माधवला राजी केलं. माधवनं ही मनात विचार केला की जर स्पर्धेत यश आलं तर आपल्या बाबास तीस एकराचा सातबारा यु होईल. तो असा ही आपण करुच पण त्यासाठी आणखी काही वर्ष लागतील. म्हणून तो राजी झाला.
खाजगी वाहिनीचा स्टुडिओ अंधेरीत होता. देशातून तीस स्पर्धक निवडले होते. यातीस स्पर्धकातून दोन स्पर्धक निवडले जाणार होते. त्या साठी पाच फेऱ्यातून स्पर्धक गळत गळत पुढे जाणार होते.
माधवनं पहिल्या फेरीत
'केसरीया बालम' हे लोकगीत ( folk song) एकदम आपल्या अंदाजात असं काही वठवलं की गाणं संपताच चार ही संगीत निर्देशकांच्या भुवया उंचावल्या. पहिल्याच फेरीत कार्यक्रम प्रसारीत होताच माधवनं भारतातील प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. वाहिनीचा टि आर पी पहिल्याच टेलीकास्टनं जबरदस्त वाढला. माधवच्या गाण्यानं लाखो फाॅलोअर्स व व्युव्हर्स मिळवले. नंतर दुसऱ्या फेरीत माधवनं
'यारा सिली सिली...' हे गाणं फिमेल व्हाईस काढत म्हटलं. येथूनच त्याचं नशीब फळफळलं. एका नामांकित बॅनरच्या चित्रपटातील दोन गाण्यासाठी त्याला तब्बल तीस लाख साइनिंग अमाऊंट आधीच देत संधी मिळाली. संगीत क्षेत्रात इतक्या कमी कालावधीत एवढी मोठी संधी मिळवणारा कदाचित माधव पहिलाच गायक असावा. वाहिनंनं या गोष्टीचा फायदा उठवला व शो ला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली.
सिमरननं गोविंदला शारजाला पुन्हा बोलावलं.
" डिअर गोविंद! आता तु मुंबईतला मुक्काम लवकरच हलवशील व शारजात माझ्याजवळ येणार!" डाॅक्टर साहेब ऐवजी 'डिअर गोविंद' ऐकताच गोविंद उन्हाळ्यात आईस्क्रीम वितळावं त्याही जास्त वेगानं वितळला.
" सिमरन ते कसं गं!"
" डिअर तू आता अब्जाधीश होणार! पण या सिमरनला विसरायचं नाही बरं!" उंची फाया दरवळू लागला.
" सिमरन नाही विसरणार पण काय झालं ते तर सांग!" धुंदाळ सुंगधात गोविंद कसंबसं भान ठेवत विचारू लागला.
" आमच्या मालकांनी भारतातून फक्त तुझीच निवड केली. तू येत्या चार महिन्यांत पाच कोटीपर्यंत जमवलेत तर तुला इथेच ते भागीदार बनवणार आहेत. मग काय! तेल विहीरी, क्रिकेट क्लब, हाॅटेल या व्यवसायात तुझी एन्ट्री झालीच समज!" सिमरनं फेकलेल्या चाऱ्याभोवती मासा कसा घिरट्या घालतोय हे पाहण्यासाठी जवळ आली.
' पाच कोटी!' आकडा ऐकताच एवढी रक्कम कशी आणावी म्हणून गोविंदला वातानुकुलीत रुममध्ये शारजातील उकाडा जाणवू लागला.
"डिअर काय झालं?" सिमरनची बोटं गोविंदच्या केसात फिरू लागली.
" सिमरन, एवढी रक्कम कशी शक्य आहे गं?" फिरणाऱ्या बोटाचा करिश्मा गोविंद वर चालला नाही.
" गोविंद, ही रक्कम तुझ्यासाठी मोठी असेल पण ज्या व्यवसायात तू उतरशील त्यात एवढी रक्कम तर बयाणा म्हणून देतात! केवळ मी मालकांना भारतातील एक भरवशाचा पार्टनर व भविष्यात कामाचा माणूस अशी मनधरणी केली म्हणून ते तुझ्याकडून इतकीच रक्कम घेत आहेत. बाकी धंद्यातील नफ्यातून घ्यायला कसंबसं राजी केलंय त्यांना म्हणून संधी सोडू नको!"
" सिमरन तुझं सारं बरोबर आहे. पण चार महिन्यात एवढी रक्कम मी उभारुच शकत नाही!"
" डिअर, का नाही? तुझी उरलेली शेती विक, मुंबईतील फर्ममधील तुझी पार्टनरशीप आपण दुसऱ्याला विकू. तू जर मनात घेतलं तर सारं होईल!"
उरलेल्या जमिनीत गोविंदास आशेचा किरण दिसू लागला. तेलसम्राट अरब शेठ होण्याचा आपला मार्ग त्याला दिसू लागला. तो अरब कंट्रीत मागच्या वेळी फिरला तेव्हा या अरब व्यापाऱ्यांच्या ऐश्वर्याचा त्याला हेवा वाटला होता व आपण ही यांच्यासारखंच शेठ व्हावं असं त्याला वाटलं होतं. ते मनातलं स्वप्न साकार होऊ शकतं या आनंदात तो सिमरनजवळ दोन दिवस राहिला व परतला.
पुढच्या एका महिन्यात सिमरननेच नवीन मासा धुंडला व जोगेश्वरी फर्ममधील त्यांची भागीदारी विकली. जेवढी रक्कम गुंतवली होती तेवढ्यातच! एक कोटी खात्यावर येताच आता गोविंद आईला घेत मालखेड्यात परतला व शेतीसाठी गिऱ्हाईक शोधू लागला.
" गोविंद! तुझं नेमकं काय चाललंय? मला कळू तर दे!" राधानं परतलेल्या गोविंद ला विचारले.
गोविंद नं सिमरनचा प्लॅन तिला समजावला. जोगेश्वरी मधील आपला हिस्सा विकला गेला. आता शेतीतून बाकी रक्कम उभारायचीय!"
अनुराधा संतापली.तिच्या अंगाची लाही लाही झाली. आपण ज्या दिवट्यासाठी पुनवेचा चंद्र सोडून आलो ,तो चंद्र आपलं चांदणं साऱ्या भारतात पसरवतोय! त्याची चित्रपटातील गाणी सिनेमा प्रदर्शीत व्हायच्या आत धूम मचवत आहेत. त्याच्या गाण्यामुळं सिनेमाची उत्सुकता वाढतेय. तोच नवीन गाण्यासाठी म्युझीक डायरेक्टर त्याच्याकडं घिरट्या घालायला लागलेत. त्यानं आधीचा शो देखील सोडला होता पण त्या वाहिनीनंच त्याला विनवत फक्त रेकार्डिंग पुरता का असेना पण वेळ मागून त्याच्या प्रसिद्धीचा फायदा करून घेतला. असा तो दैदिप्यमान चंद्र! आणि हा आपला दिवटा काम नाही नवं कोरं लुगडं फाडून फाडून दांड घालतोय! अनुराधाचं रक्त उकळू लागलं.
" गोविंद, जोगेश्वरीत तू कुठला व्यवसाय करतो तुलाच माहीत. पण तरी केवळ जागेची किंमत म्हणून तू पाच एकर शेत विकलं तरी मी सहन केलं. पण आता तू ती मोक्याची जागा ही विकून बसलास! नी आता आणखी अरब देशात गुंतवणूक करण्याचं हे काय नवीन फॅड?"
" राधा, अगं मोठी भरारी मारण्यासाठी थोडं मागे यावं लागतं, अगदी तसच हे!"
" गोविंद, ही मोठी भरारी नाही तर रसातळाला जाणंच म्हणता येईल याला!"
अनुराधेनं सासऱ्यास व सासूस बसवत गोविंद काय करतोय व ते कसं धोक्याचं आहे हे समजावून सांगितलं. दंगलराव खवळले. सुंदरबाईची ही आता पायाखालची जमीन सरकू लागली.
" गोविंद, पुरे आता! तुला जे उद्योग करायचे ते तुझ्याकडं असलेल्या कोटी रुपयातच कर! पण आम्ही शेती मुळीच विकू देणार नाही!"
" आई, तू ही त्या राधेमागं लागली का! मागच्या वेळी पैसे गुंतवले तेव्हा विरोध केला. पण तरी ते पैसे सुरक्षित आलेच ना! आता ही ती तशीच करतेय.."
" गोविंद, मागच्या वेळची गोष्ट ठिक ! पण परक्या देशात एवढा मोठा धोका का पत्करतोय! तिथले कायदे वेगळे! ते आपणास ठाऊक नाही,उद्या फसवणूक झाली तर रस्त्यावर भीक मागायची पाळी येईल!" राधा संतापून ,कळवळून म्हणाली.
" राधे! सिमरन आहे, जुने मालक आहेत सारंच लिगली करु! तेवढी अक्कल व विवेक आहे मला!"
" गोविंद! जेव्हा माणसाच्या मनात स्वार्थ, लोभ जागृत होतात ना तेव्हा त्याच्या विवेकावर भ्रमाचे पुटे चढतात. किंबहुना स्वार्थाचा उगमच सदसद्विवेकबुद्धी गहाण टाकून होतो!"
" राधा, माझी सदसद्विवेकबुद्धी शाबूत आहे म्हणुन तर तुटीतली शेती विकून मी व्यवसायात पडतोय!"
पालथ्या घड्यावर पाणी पडावं तसंच गोविंदचं झालं. तो शेतीसाठी गिऱ्हाईक शोधू लागला.
वाहिनीनं फायनल आधी एक महिना माधवच्या पूर्ण कुटुबास मुंबईस बोलवलं. माधवनं बाबा, बनुमाय, रमण काका, कला काकी व सयास मुंबईत बोलवलं. त्यानं साऱ्यांना मुंबई फिरवलं.
" मधा, एक वाईट बातमी आहे!" बाबा सांगू लागले.
" बाबा, वाईट असली तरी त्यातून चांगलं ही घडू शकतं!" रमणराव बोलले.
" रमण, बापजाद्याचं वतन आपल्या हयातीत विकलं जाणं हे पातकच रे!"
" बाबा, ते पातक विकणाऱ्यांना लागेल! पण माधव काही झालं तरी आता शेत दुसऱ्याकडं जायला नको!".... रमणराव .
माधवला आता शेत घेणं सहज शक्य होतं. हार्वेस्टरची कमाई, ड्रॅगनफ्रुटचं उत्पन्न, मागची शिल्लक व आतापर्यंत त्याची पंधराच्या आसपास गाणी रेकाॅर्डिंग झाली होती. व फायनल जिंकली तर एक कोटी..अशी सारी बेगमी करुन शेत सहज घेता येणार होतं. पण खरा प्रश्न गोविंद आपणास देणार का हा होता.
" आबा, ते आपणास नाही विकणार जमीन! त्यापेक्षा आपण गावात दुसरी घेऊ!" मधा बोलला पण ती जमीन दुसऱ्याकडं गेली तर बाबास ते सहन होणार नाही ही जाणीव होतीच. त्यानं काकास गोविंदला विचारायला लावलंच.
फायनल झाली. अपेक्षेप्रमाणे गोविंदनं जिंकली. कारण फायनल आधीच त्याची चित्रपटातील गाणी भारतात धुमाकूळ घालत होती.
हवेलीत शेत विकण्यावरुन दररोज कलह सुरू होता. शहादा, दोंडाईचा येथून व्यापारी येत व शेत पाहून जात. पण एवढी पंचवीस एकर घेण्यास नकार मिळे.दंगलराव व सुंदरबाईस गोविंद शेत विकणारच हे कळून चुकलं. सुंदरबाईनं कडाडून विरोध केला.
" आई, दंगा करून काहीच उपयोग नाही. सारी जमीन माझ्या नावावर असल्यावर तुमचा आटापिटा काहीच कामाचा नाही!" गोविंद नं थंडपणानं म्हणताच हातातून सारं नजरेसमोरुन निसटतंय व आपणास काहीच करता येत नाही हे पाहताच सुंदरबाईला कमरेपासून आपल्या शरीरातले त्राण नाहिसे होतेय असंच वाटू लागलं. तोच फायनल माधवनं जिंकल्याचा कार्यक्रम पाहून त्राण अधिकच कमी होऊ लागलं. सुंदरबाईंना आपली बोबडी वळतेय असं जाणवू लागलं.
आबांचा हवेलीत फोन आला.
"दंगल, गोविंद शेत विकतोय ना! मग माधवलाच द्यायला सांग! तो इतरापेक्षा जास्त किंमत देणार आहेच! पण त्या शेतात बाबांनी रक्त आटवलंय हे विसरू नकोस "
दंगलरावांनी सुंदर व गोविंदकडं विषय काढला.
" त्या भिक्कार गायकाची ऐपत तरी आहे का माझी जमीन घ्यायची!"
गोविंद रागानं व चेष्टेने म्हणाला.
" गोविंद, कोण केव्हा आपल्याला ओव्हरटेक करत पुढे निघून जातोय हे कळायला आपलं मन थाऱ्यावर तर हवं ना!" राधा विषण्णतेने म्हणाली.
" गोविंद, पाया पडतो! निदान विकायची तर माधवलाच विक!हवेलीत तरी राहिल शेती!" दंगलराव एकदम हताशपणे विनवू लागले.
" बिलकुल नाही!"
सुंदरबाईचं त्राण पुरतं दगा देऊ लागलं.
त्यांना तरी अस्पष्टसं आठवू लागलं.
' माझा बाबा भुमीहीन मरणार नाही! तीस एकराचा सातबारा देईन म्हणजे देईनच!'
" अहो, नकोसा दत्तक बापासाठी शेती घेतोय तर आपलं हवंहवं वाटणारं दिवटं विकतोय! कसं...अ..स..तं..ना.!"
बस्स सुंदरबाई शेवटची आकांताने थरारली व साऱ्या संवेदना गारठल्या. त्यांचं तोंड फिरलं व कमरेखालच्या भागास लकवा झुलला! हवेलीत राधा व दंगलरावांनी हंबरडा फोडला.
दुसऱ्या दिवशी गोविंदनं राधेच्या सांगण्यानुसार गाडीनं आईस मुंबईला नेलं. दवाखान्यात अॅडमीट करत वडिलांना देखरेखीसाठी ठेवलं. फ्लॅटवर राधेला ठेवत तो कधी मुंबई ला तर कधी गिऱ्हाईक शोधायला मालखेड्याकडं राहू लागला.
गोविंद आपणास विकणार नाही म्हणून माधवनं नाद सोडला. खरं तर माधवला आता शेतीत गुंतवणूक करण्याची काहीच गरज नव्हती. पण पोपटाचा जीव कुठं असतो हे ज्याला माहीत त्याच्यासाठी व्यवहार मोठा नसतो. असली माणसं घाट्याचे व्यवहार सोसतील पण भावनेचा व्यवहार सांभाळतातच!
दवाखान्यात सया व माधव बनुमाय व बाबाला घेऊन गेले. रमणकाका व कला काकू मालखेड्यात परतले होते.
दवाखान्यात निपचीत पडलेल्या सुंदरला पाहताच बनुमाय व बाबास गलबलून आलं. परक्या ठिकाणी माणसाला आपणास छळणाऱ्या माणसाविषयी देखील दया येतेच.
दंगलराव तर गुडघ्यात मान घालून हमसून हमसून रडू लागले.
" सुंदर! बघ कोण आलं! जो आयुष्यभर आपणास नकोसा होता त्यालाच आपण हवेसे वाटतोय ! पण आपला हवासा गोविंद कुठेय!"
दंगलरावांच्या हंबरड्यानं सुंदरबाईच्या डोळ्यात धारा लागल्या पण त्या पुसण्यासाठी त्याचा हात हलण्याचा प्रश्नच नव्हता. सावत्र असली तरी आई म्हणून माधव व सया जवळ बसले. बनुमाय ही बसली. बाबांचाही अंतरातला कोलाहल मावळला. अनुराधा डबा घेऊन आली. सया माधवला पाहताच राधा थरथरत जागच्या जागी उभी राहिली.
माधवनं ओळखीच्या एका डायरेक्टरच्या स्वीय सहायकास फोन लावला. थोड्याच वेळात स्वत: डाॅक्टर येत 'एम.डी. जगताप' ला भेटला. नवीन गायक म्हणून नावारुपाला आलेल्या माधवशी डाॅक्टरानं पेशंटची सारी केस हिस्ट्री कथन केली. माधवनं विचारतात
" सर किती खर्च कराल पण आता उपयोग नाही" डाॅक्टरनं सविस्तर सांगितलं. माधवचा ही नाईलाज झाला. सायंकाळपर्यंत सारे थांबले. सायंकाळी माधव परत घ्यायला आला.
निघते वेळी जाणाऱ्या माधवला अनुराधेनं सयास सांगत थांबायला लावलं.
" अहो! राधाताई काही तरी बोलणार आहे, थोडं थांबता?"
माधवची तळपायाची आग मस्तकात गेली. एक तीव्र वेदना खालून वर चढत साऱ्या अंगात संचारत मेंदूकडं सरकू लागली.
" सया, माझं लगेच रेकार्डिंग आहे.मला उशीर होतोय!" माधव वेदना दाबत कोरड्या स्वरात म्हणाला.
" माधव, प्लिज फक्त पाच मिनीट! हात जोडते!" माधवच्या पाठीकडं पाहत राधा विनवू लागली.
माधव थांबला.
" वो लम्हे, वो किस्से, हम बरसो याद करेंगे! ये मोसम चले गये तो हम फरीयाद करेंगे!"
उरातल्या काही जखमा वेदना देत असल्या तरी माणूस त्या न विसरता कुरतडतोच. त्यातून होणाऱ्या वेदनेत ही एक वेगळं सुख असतं.
माधवला थांबलेलं पाहताच सया पुढे निघाली. पण माधवनं तिचा हात धरत तिला थांबवलं
" माधव! काही ही कर पण जमीन तूच घे! हात जोडते!" अनुराधा डोळ्यात आसवं आणत म्हणाली.
" सया, ज्या जमिनीपायी आम्ही असह्य यातना भोगल्या; त्या जमिनीत आता मला काही ही स्वारस्य नाही!" माधव दुसरीकडं पाहत बोलला.
" भोगलेल्या यातना आठवत रहाव्यात यासाठी हवंतर पण सया याला तीच जमीन घ्यायला सांग! ती जमीन यानं नाही घेतली तर त्याचं सर्वात जास्त दु:खं मलाच होईल" अनुराधा थरथरत्या सर्वांगानं हलत म्हणाली.
" सया, आम्हास दु:खं देणाऱ्यांना दु:खं नको म्हणून मी प्रयत्न नक्कीच करेन!" म्हणत माधव निघाला. राधेस आनंद झाला.
पाच सहा दिवसात रमणरावांनी एका व्यापाऱ्यास गोविंदकडं आणलं.
" गोविंद यांना शेत दाखव.त्यांना आदिवासी मुलांसाठी शेतकी काॅलेज उघडायचंय.म्हणून शेत घेणार आहेत" रमणरावांनी सांगितलं.
त्या व्यापाऱ्यानं शेत पाहिलं व लगेच सौदा केला.
चौदा लाख एकरानं सारं शेत घेतलं. गोविंद चं पाच कोटीचं बजेट पूर्ण होत असल्यानं त्यानं खरेदी करतांना त्या शेत घेणाऱ्या व्यापाऱ्याचं नाव पाहिलंच नाही. तो खुशीनं मुंबईकडं रवाना झाला.
व्यापाऱ्याकरवी माधवनं शेत नावावर होताच बाबास शेतात आणलं.
" बाबा, आता फक्त एक एकराचा सातबारा बाकी राहिला!" माधव हसतच म्हणाला.
" मधा जो एकोणतीस एकर घेऊ शकतो तो एक एकर घेणार नाही का!" खरा आनंद हवेलीचं शेत दुसरीकडं गेलं नाही याचा आहे पोरा.
माधव व सया मुंबईस परतली. सुंदर बाईला घेत दंगलराव मालखेडयात परतले. पण अनुराधा मुद्दाम गोविंदसोबत मुंबईत थांबली. सिमरन आली व गोविंदला घेत पाच कोटी रक्कम घेऊन शारजाला गेली.
" डिअर गोविंद एका महिन्यात सारं पेपरवर्क झालं की बस मग तू व मी आपण दोघं झालो अरबपती असंच समज!"
तिनं गोविंदला पाच सहा दिवस मस्त फिरवलं. कामानिमित्त ते दोघं पुन्हा मुंबईत परतले. मात्र दोन दिवसात सिमरन अचानक शारजाला परतली.
सिमरन गेली ती गेलीच.आठ दिवस, महिना झाला. गोविंद तिच्याशी संपर्क करू लागला. मालकांशी संपर्क ठरू लागला. पण व्यर्थ! ना सिमरनशी संपर्क होई, ना सिमरन भेटे!
गोविंदची हिम्मत सुटू लागली. त्यानं अनुराधास घेऊन पुन्हा शारजा गाठलं. पण आता त्याला शारजा खायला गिळायला उठू लागलं. कंपनीचं हाॅटेल, क्लब, फर्म सारं सारं बदललं. त्यात पूर्वीचे मालक व सिमरन यांचा मागमूस ही नव्हता. तो जंग जंग पछाडू लागला.पण हाती काहीच लागेना.
अनुराधाला हे असलं काही तरी केव्हा ना केव्हा घडणार याची भिती होतीच! पण ते इतक्या लवकर व इतकं जहाल असेल इतपत तिनंही विचार केला नव्हता.
" सतरा वेळा बजावत होते! नको नको! वाटलं तर काम नको करू! रिकामं बस! पण उचापती करु नको! पण नाही ऐकलंस! भरारी घ्यायची होती ना! घेतली भरारी! राघो भरारी अटकेपार होती हे इतिहासात वाचलं होतं! पण आपली गोविंद भरारी पार शारजापार!" अनुराधा एकदम लालेलाल होत त्रागा करु लागली.
" राधा, या घडीला मुंबईला कसं परतायचं ते विचार कर! मला आता तर ते ही शक्य वाटत नाही! " गोविंद रडतच लहान पोरासारखा सांगू लागला.
" तू मुंबईत परतून काय फरक पडणार! गेलेलं शेत परत येईल? गुंतवलेले पैसे परत येतील?" राधा तळतळली.
कसंबसं सयामार्फत माधवला कळवत राधानं परतीची तजवीज केली. सिमरन गायब झाली ही बातमी मुंबईत ल्या फर्मला समजलीच. ठेवीदारांना आपण ठेवलेल्या ठेवी जी बाई घेऊन जात असे तीच गायब म्हटल्यावर ठेवीदारांनी मुदती आधीच तगादा सुरू केला.
" राधाताई, त्याला घेऊन त्वरीत मालखेडा गाठ!" सयानं राधास कळवलं. सया सांगतेय म्हणजे माधवनेच तिला कळवलं असावं म्हणून राधानं गोविंदला आग्रह करत मालखेड्यात परतायला विनवलं.
" तिथं जाऊन काय करू! इथं तरी ती सिमरन येईलच! म्हणजे तिच्याकडून वसुल करता येतील!"
" मूर्ख शिरोमणी आहेस तू! वकिलाचा सल्ला घे! कायदेशीर कर! सांगितलं तेव्हा ऐकलं नाहीस! नी आता तिची वाट पाहतोय! ती आली तरी तुला काहीच मिळणार नाही! उलट ठेवीदारापासुन जीव वाचव,पाया पडते!"
पण गोविंद तिचं ऐकेचना!
झालं तसंच! एकाकडून दुसऱ्यास,दुसऱ्याकडून तिसऱ्यास कळताच ठेवीदार गोळा झाले.
"दामदुप्पट गेली खड्ड्यात! आमचं मुद्दल द्या!"
तगादा, राडा, तोडफोड सुरू झाली. आधीच्या चार ही भागीदारांना घेरलं. गोविंदनं विकून अंग काढलं असलं तरी ठेवी स्विकारायच्या वेळी होता म्हणून गोविंदच्या फ्लॅटभोवती गराडा पडला. गोविंदवर मार बरसू लागला. पण मार खात खात गोविंद पळाला व अनुराधा मात्र कचाट्यात सापडली. तत्पूर्वी अंधेरीत फोन गेला होता म्हणून सया माधवला घेत आली.
स्त्री ठेवीदारांनी अनुराधास घेरत धुवायला सुरुवात केलेली. माधव येताच गराड्यात शिरला. त्याला काही ओळखत असल्यानं बाजूला झाले.
" माधवनं हात जोडत कायदेशीर जे योग्य त्यानुसार करा त्यास मी पण सपोर्ट करेन पण हिचा काही ही संबंध नाही. हिला त्रास झाला तर मग मी ही कायदेशीर...!" माधवनं हात जोडता जोडताच सज्जड दम भरला. परिणाम झाला.
सया व माधवनं गाडीत अनुराधास व नंतर गोविंदला शोधून त्याला ही घेतलं व मालखेडा गाठलं.
.
.
.
सुंदरबाईनं इशाऱ्यानं दत्ता, वनास बोलवायला लावलं. दत्ता व वना आले. त्यांना गोविंदला वाचवण्याची विनंती केली. पण दत्ता वना हात झटकत वरुन दोष देत निघून गेले. सुंदर बाईच्या वाकड्या तोंडातून लाळ गळू लागली.
पण ...पण परततांना निवाली घाटात दत्ताची गाडी कंटेनरमध्ये घुसली व दत्ता वना जागीच ठार झाले.
दंगलराव व अनुराधा खाली मान घालत बाबाकडं आले.
" बाबा, माझ्या वागणुकीची मला शिक्षा मिळेलच! जशी सुंदर वना व दत्ताला मिळाली! पण तरी ....." दंगलरावांना पुढचं बोलणं झालंच नाही.
बाबांनी सयास सांगितलं.
" अहो, त्यांनी ज्या संपत्तीसाठी एवढं केलं तरी ती संपत्ती झाली नाही त्यांना! मग आपणास ही त्या संपत्तीचा सोस नकोच ना!"
" सया तसं असेल तर मग आहे ती गोरगरीबांसाठी खर्ची घालू!"
" अहो, ऐका ना! बाबाकडे दादा व राधाताई रडत विनवत होते!"
'दादा' ऐकताच माधवला मनात
" नकोसा!" खिळा रुतला पण तरी बाबांसाठी व दु:खं देणाऱ्यांना सुखी करण्यासाठी त्यानं सयाला आश्वासन दिलं.
सया आनंदानं माधवच्या कुशीत शिरली.
माधवनं आपल्या ओळखीनं ठेवीदाराच्या किती ठेवी आहेत ती माहिती काढली. चार ही भागीदार व नंतरचाही भागीदार असे भाग करत गोविंदच्या हिश्श्याची रक्कम भरणा केली व सारं प्रकरण गोविंद पुरतं मिटवलं. सिमरणचा छडा ही लावला. पण ती मुंबई परतण्या आधीच पूर्वीच्या मालकांनीच शारजात तिचा गेम केला.
माधवनं बाबांची परवानगी घेत गोविंदला पंधरा एकर परत करत त्याच्या नावावर केलं. ज्या बापानं, आईनं व भावानं नकोसा म्हणून पंधरा एकर दिली नव्हती त्याच नकोशानं एवढा त्याग केला यानं अनुराधा मानसिक खचली. पंधरा एकर साठी आपण याचं आयुष्य बरबाद केलं होतं तोच आपणास गराड्यातून बाहेर काढतो! आपल्या शब्दाखातर जमीन विकत घेतो, गोविंदचं तीन चार कोटीच्या ठेवीचं कर्ज परत करतो! ती खजील झाली.
हवेलीच्या वरच्या मजल्यावर तिनं औषध घेतलं. एकच गलका, उडाला. सया दंगलराव आबा,बाबा पळाले.राधा आचके देऊ लागली.
" सया, वेळ कमी आहे! मला एकदा ...फक्त शेवटचं एकदा त्याच्या सावळबाधी मिठीत विसावू दे! त्या सावळबाधी मांडीवरच मला मरण हवंय! त्याशिवाय मुक्ती नाही."
" मधाsssss! ऐक ना! अरे ती मरतेय ऐक ना!"
माधव थिजून भिंतीला टेकला होता!
बाबानं आशाळभूत नजरेनं पाहिलं.
माधव सरकला. सयानच त्याला बसवत त्याच्या मांडीवर राधाचं डोकं ठेवलं!
" माधव.....माणसानं भावनाचं दमन करू नये! बोलले होते ना मी! ती पावसाळी रात आठवते का! पुढच्या जन्माची मी वाट पाहीनच"
माधवला ती रात्र आठवली व त्याच्या डोळ्यात आसवाचा सागर ओथंबला.
" माधव मला भिजायचंय रे! .....
माधवाच्या आसवात ती भिजू लागली. आचके वाढले. माधवनं तिचे डोळे बोटानं मिटवले! अतृप्त जिवाच्या मनातल्या इच्छा थोड्या का असेनात पण तृप्त झाल्या असाव्यात की काय!
मान लवंडली व माधवनं सया, गोविंद जवळ असतांनाही आक्रोश केला.
" वो लम्हे, वो किस्से, हम बरसो याद करेंगे,
ये मोसम चले गये तो हम फरीयाद करेंगे!"
समाप्