कथेचे नाव :- काळी हवेली
(काल्पनिक)
लेखक :- दिपशेखर...
"जाम लोचा झाला रे शैल्या... तुज ऐकलं असत ना तर हा टाइम आपल्यावर आलाच नसता बघ.. पण साला अंगात मस्ती जाम रे.. आता कळतंय तू का एवढा जीव ताणून सांगत होता ते.."
शरीरातील सर्व त्राण संपलेला अमित चेहरा रडवेला करून शैलेशला सांगत होता. शैलेश त्याला पाहून फक्त हलकेच गालात हसला.
"आम्या आता जे झालय ते भोगलं पाहिजे बाबा.. प्रार्थना कर की आपण यातून लवकरच बाहेर पडू. आता जे काही नशीबात असेल तेच घडेल. "
चार दिवस अगोदर...
भांडुपच्या केशवनगर मधल्या वृंदावन सोसायटीतले शैलेश, अमित, रोहन आणि पराग हे चार मित्र. आज सकाळीच यांना समजल होत की आजपासून पुढचे पाच दिवस कंपनी बंद असणार आहे. जगभर वाहणारे मंदीचे वारे आता मुंबईमधे पण जोर धरू लागले होते. परिणामी वर्क लोड कमी झाला होता. साहजिकच मालक लोकांना महिनाभर कामगार कामावर ठेवणे खूपच कठीण झाले होते असं त्यांचं मत होत. त्यामुळे आलटून पालटून कामगारांना सुट्ट्या देण्याचा पराक्रम मालक लोकांनी चालू केला होता. एकाच सोसायटीत राहणारे हे चौघे योगायोगाने एकाच कंपनीत कामाला होते. आणि यांची मैत्री जगात भारी होती. त्यामुळे जिथे तू तिथे मी या म्हणीप्रमाणे हे नेहमीच एकत्र असत. या सुट्ट्या समजताच आपण यावेळी काहीतरी प्लॅन करू आणि बाहेर फिरायला जाऊ असं यांचं ठरलं. त्यामुळे आज जेवण झालं तसे हे चौघे कट्ट्यावर गोळा झाले.
नेहमीच डोक्यात केमिकल लोच्या असणारा अमित बोलला "साला सगळा लोच्या आहे बे. जायचं हे तर ठरवलं पण जाणार कुठं." .
शैलेश त्याला मधेच थांबवत बोलला "ये आम्या तू गप्प बस बे. तुला प्रत्येक वेळी गोवा आठवत असतो. आपल्याला काय इंटरेस्ट नाही तिकडं जाण्यात. "
अमित: "शैल्या तु ना लहान आहे अजून. तुला नाय कळायची गोव्याची मज्जा.. तू साला असाच राहणार. " .
पराग दोघांना शांत करत मधेच बोलला. "ये ये.. अरे तुम्ही दोघे पण जरा शांत होता का. फिरायला जायचं म्हटलं की तुमचं दोघांचं वाकडं का होत लगेच. बर जाऊदे ते सर्व सोडा यावेळी आपला प्लॅन थोडा हटके आहे. काय रोहन बरोबर ना रे.. "
"हो ना यार. यावेळी आपण माझ्या गावी जायचं आहे. तसा प्लॅन मी आणि पराग ने केला आहे. मस्त मुक्काम मारू 3-4 दिवस. काय म्हणता. " रोहनने लगेच आपला प्लॅन सादर केला.
अमित: "आपल्याला काय प्रॉब्लेम नाय बे रोह्या. तुमी न्याल तिकडं आपण येणार. काय शैल्या जाऊया ना. "
शैलेश :"मी कधी नाही म्हटलं. खेडेगावी म्हटलं की मला नाही म्हणता येत नाही."
"ठरलं तर मग उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. इथून डायरेक्ट कोल्हापूरला जायचं आहे. आणि तिथून गावी. ट्रेन सकाळी लवकर आहे. तयारीला लागा."असं बोलत रोहनने सर्वांचा निरोप घेतला. सर्व आपल्या घरी परतले.
शिराळ असं नाव असलेल्या या गावात रोहनचे आजी आजोबा दोघेच राहत. गावी उत्पन्न मार्ग कमी होते त्यामुळे सर्व मुंबईला राहत असत. शिराळ.. चारही बाजूने डोंगर असणारे आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे छोटेसे गाव... गाव कसलं वाड्या-वस्तीच गाव ते. इथे चार घर.. तिथे चार घर.. असे जंगलात वसलेले हे गाव. तस या गावात यायचं म्हटलं की एकच रस्ता होता तो ही ओढ्या नाल्यानी भरलेला. गावाच्या सुरवातीला एक जुन देऊळ होत. तिथेच लागून ओढा वाहत असे. पावसाळा आला की हा ओढा म्हणजे नदीच वाटायचा. तो ओढा पार करून अर्धा एक किलोमीटर चालत गेलं की रोहनच घर होत. टिपिकल कोकण स्टाईलच कौलारु घर होत ते. समोर मस्त अंगण होत. अंगणात तुळशीच झाड अगदी मधोमध होत. घराशेजारीच पाण्याचा एक छोटा ओढा वहायचा. ते गाव म्हणजे निसर्गाने नटलेले एक सुंदर छायाचित्र होत.
दुसऱ्या दिवशी पहाटेच ठरल्याप्रमाणे ते एकत्र आले आणि ट्रेनने प्रवास सुरु झाला. ट्रेन मधे मस्ती आणि मज्जा करत हे चारही मित्र कोल्हापूरला पोहचले. तिथून पुढे त्यांनी एसटीने रोहनचे गाव गाठले. एव्हाना खूप वेळ झाला होता आणि त्यात प्रवास करून चौघे जाम वैतागले होते. गावातील घरी पोहचताच चौघे जेवण करून लगेच झोपी गेले. गावाकडे अंगणातच झोप लागते मुंबईकराना त्यामुळे हे चौघे बाहेरच झोपले. रात्रीचे बारा वाजले असतील. अचानक एक विचित्र आवाज शैलेशला ऐकू आला तसा तो जागा झाला. पण आसपास कुठंच काही दिसत न्हवतं त्यामुळे काहीतरी भास झाला असावा या विचारानं तो झोपी गेला. काही क्षण असेच गेले असतील आणि परत एकदा एक मोठा आवाज झाला आणि यावेळी चौघे पण जागे झाले. कसला आवाज असेल हा? गावातली पण खूप लोक या आवाजाने जागी झाली. पण सर्व लोक घरातून फक्त बाहेर आली आणि थोडा वेळ थांबून लगेच परत आपल्या आपल्या घरात जाऊन झोपली. रोहनच्या आजोबानी त्या चौघाना पोरांनो झोपा. हे इकडं रोजच आहे. तशी सर्व परत झोपी गेली.
सकाळी सकाळी सूर्याच कोवळ उन्ह अंगावर पडलं आणि चौघे जागे झाले. शैलेशच्या डोक्यात अजून पण रात्रीचा विषय डोक्यात येत होता. आजी आजोबा अंगणात चुली समोर बसले होते. अमित, रोहन आणि पराग शेजारी असणाऱ्या ओढ्यात उतरले. शैलेशही त्यांच्या सोबत गेला पण त्याच डोक मात्र त्या आवाजात गुंतल होत. कसला होता तो आवाज आणि रोजच आवाज येतो म्हणजे काय?
अमित : "काय बे शैल्या कसल्या विचारात पडला बे तू? "
शैलेश : "काय नाय रे तो रात्रीचा आवाज. सर्व गाव जागा झाला होता. त्याचाच विचार करतोय. "
अमित : "अरे हा बे. मला पण हा विचार आला होता. पण आपल्याला काय करायचं त्याच. सोडून दे बे. "
असे बोलत त्यांनी आपली मस्ती सुरु ठेवली.
सर्व आटोपल्यावर ते पुन्हा अंगणात एकत्र आले. आज काय करायचं याचा प्लॅन ते करू लागले. तोच आजोबा तिथे आले. तसा शैलेश ने प्रश्न केला..
शैलेश : "आजोबा.. तो रात्रीचा आवाज कसला होता.. तुम्ही म्हटला हे रोजच होत असं.. काय मॅटर काय आहे हा? "
आजोबा : "आर बाळा त्यो आवाज होय.. त्यो आम्ही रोजच ऐकत असतो र.. त्याची सवय झाली आमाला आता... त्यामुळं तिकडं जास्त लक्ष नाय देत आम्ही... अन तुमीबी नका लक्ष देऊ तिकडं" आजोबा बोलते झाले.
अमित : "तस नाय हो आजोबा. कसा हाय अपल्याला तो आवाज वेगळा वाटला. सांगा की आजोबा हे काय होत नेमक. " अमितने पण आता शैलेशची बाजू ओढली. तसे सर्वच आजोबांना विचारू लागले. तसे आजोबानी एक मोठा उसासा घेतला आणि पुढे असणाऱ्या गर्द झाडीत नजर फिरवत बोलले....
आजोबा : "पोरांनो त्यो आवाज म्हंजी या शिराळ गावाला लागलेला शाप हाय शाप.. त्यो आवाज आम्ही लहान असल्यापासून ऐकत आलो.. आणि आजबी आम्ही त्यो आवाज ऐकतोच आहे... "
पराग : "पण तो आवाज येतो तरी कुठून ओ आजोबा" पराग मधेच बोलला.
तसे आजोबा मागे फिरले आणि त्या चौघाकडे पाहत बोलले.
आजोबा : "पोरांनो मुंबईस्न आलायसा निवांत रहा.. खा प्या.. मजा करा.. कशाला यात पडताय.. "
"ओ आजोबा सांगा की आता.. "
चौघे पण ऐकत नाही हे पाहून आजोबा हतबल झाले..
आजोबा : "त्यो आवाज आला ती जागा म्हणजे... काळी हवेली.... "
"काळी हवेली... " चौघे एका सुरात बोलले..
आजोबा : होय काळी हवेली. तशी ती लय जुनी हाय. आणि तिथे घडलेला किस्साबी तसाच लय जुना हाय. त्यावेळी मी लय लहान होतो. रोहनच्या बापाला सगळं ठाव हाय याबद्दल.
रोहन : पण आजोबा मला बाबा कधीच नाही बोलला याबद्दल. म्हणजे मी गावी खूप वेळा आलो पण आजवर कधीच ऐकलं नाही याबद्दल.
आजोबा : आर बाळा त्याच काय हाय ह्याबद्दल अमी एकतर कुणाला सांगत नाय. अन सांगितलं तरीबी कोणाला पटत नाय. उगा का आटापिटा करा. अन त्यात शहराकडची मानस असल्या गोष्टीवर विषावस ठेवत नाहीत.
शैलेश : असं काय आहे ओ आजोबा त्या हवेलीत. म्हणजे झाले तरी काय आहे?
अमित : होय आजोबा. काय मॅटर आहे नेमका आम्हाला पण सांगा कि.
आजोबा : पहिली हि हवेली लय प्रसिद्ध होती. ताव तीच नाव पाटील हवेली असं होत. त्यावेळचं इनामदार म्हंजी प्रतापराव पाटील. लय मोठं घरं होत या गावात. समद्या गावाची पाटीलकी त्यांच्याकडं हुती. गावात फक्त त्यांचाच शबूद चालायचं. गावात कायबी झालं कि पाटील सगळं पाहायचा. लोक पण त्याच्या शब्दाबाहेर नसायची.ते म्हणतील त्योच निर्णय असायचा. तसा माणूस एकदम जुजबी होता. हलक्यात न्याय नसायचा. एकदम चोख आणि योग्य न्याय असायचा. ती हवेली लय टोलेगंज होती. हवेलीत आत गेलं कि नुसतं दिमाखदार रुपडं बघूनच डोळ्याचं परं फिरायचा. ह्या मोठाच्या मोठं लाकडी दरवाजा होता हवेलीला. किती तर मानस तिथं कामाला व्हती तवा तिथं. माझा बा पण तिथंच होता. रखवालदार म्हणून. त्याच्यामुळं मला हे समद ठाव झालं. समद कस झ्याक चाललं व्हतं. पण म्हणत्यात न्हवं जवा जवा समद चांगलं चाललं असत नेमकं तवाच नियतीचा फेर मग लागतो. पाटलाचं तसच झालं. पाटलाची एकुलती एक पोरगी व्हती. दिसायला लाखात एक व्हती असं बा सांगायचा. म्या तर उभ्या आयुष्यात तिला कदी बघितली नाही. तिथंच हवेलीत काम करणाऱ्या सदानंद मधी पाटलाच्या पोरीचा जीव अडकला व्हता. हे समद पाटलाला जोवर माहित न्हवत तोवर त्या दोघांचं गुपचूप सगळं चालू होत. पण त्यादिवशी पाटलानं स्वतःच त्या दोघांना एकत्र पाहिलं अन पाटलाची तळपायाची आग मस्तकात गेली. पाटलानं मागचा पुढचा कुटला बी इचार केला नाय. कारण सदानंद शेवटी एका कुणब्याच पोर. अन आपली पोरगी एका कुणब्याच्या पोरासोबत बघून पाटलाला त्याच्या अब्रूचा इचार डोक्यात आला. त्या रागापायी त्यानं त्यादिशी कधी न्हवं ते आपल्या पोरीवर होत उचलला. अन सदानंदला तर पाटलानं त्याच दिवशी हवेलीतच डांबून ठेवलं व्हतं. कुणाला बी कळू न देता पाटलानं सदानंदचा काटा काढला. ह्ये त्या पोरीला समजलं अन तिन आत्महत्या केली. पण जाताना पोरीनं बाला अन त्या हवेलीला शाप दिला "या हवेलीत कुणबी सुखानं नाय राहू शकणार, समदी वाट लागल, माज्या प्रेमाला तुमि संपवलं तुमच बी असंच होईल." अन तिथन पुढं त्या हवेलीला उतरती कळा लागली. पाटलाचं न्यायनिवाड्यावर लक्ष राहील नाय. पोरीच्या मरण्यान पाटलीन बाई पण अंथरुणाला खिळली अन लवकरच तीबी देवाघरी गेली. हळूहळू हवेलीत विचित्र प्रकार घडू लागलं. कामावर असलेल्या लोकांना सदानंद अन पाटलाच्या पोरीचं भूत दिसाय लागलं. त्यात ज्यानं ज्यानं पाटलाला मदत केली त्या समद्यांना त्या भूतान मारायला चालू केलं. रोज एक नव मड हवेलीत पडू लागलं. समदी घाबरली अन हवेली सोडू लागली. माज्या बान बी हवेली वरची चाकरी सोडून दिली. बघता बघता एक एक करून समदी चाकर लोक घाबरून चाकरी सोडून गेली अन पाटील एकटाच हवेलीत बाकी राहिला. या समद्या प्रकरण पाटील जाम वैतागला अन त्यानं एका मांत्रिकाला हवेलीवर बोलावलं. त्या दिवशी हवेलीत खूप मोठी पूजा मांडली त्या मांत्रिकान पण बदल्याच्या भावनेनं भटकणाऱ्या त्या भूतानी त्या मांत्रिकालाच सळो पळो करून सोडलं. अन शेवटी त्या पाटलाला खूळ लागलं अन त्या खुळातच पाटलानं स्वतःला फास लावून घेतला. त्यानंतर त्या हवेलीत एक नावाचं खेळ सुरु झाला. रोज त्या हवेलीतून भयंकर आवाज येऊ लागलं. कधी पाटलाच्या पोरीचा आवाज तर कधी सदानंदचा आवाज अन कधी पाटलाचा आवाज. चुकून हवेलीत जाणारी लोक गायब होऊ लागली अन काही दिवसांनी त्यांची मढी हवेलीबाहेरील तळ्यात सापडाय लागली. त्यामुळं समदी लोक घाबरून गेली अन हळू हळू त्या हवेलीकडं जायची बंद झाली. अन पाटलाची ती हवेली हळू हळू काळी हवेली म्हणून ओळखली जाऊ लागली. कारण तिथं जाणारा परत आलाच पण तो मेलेलाच. कारण त्या दोघा बाप लेकीच्या भांडणात ते दिसलं त्याला मारतात. फक्त एकमेकांवर विजय मिळवण्यासाठीच.
शैलेश : म्हणजे आजोबा अजूनही तिथे असे प्रकार होत आहेत का?
आजोबा : व्हय पोरा.. आजबी तिथं असलं प्रकार व्हत्यात.
अमित : काय पण आजोबा? भूत असत का? आपण एकविसाव्या शतकात आहोत. हे भूत वगैरे काही नसत. सगळे भास आहेत. काहीही सांगू नका.
आजोबा : पोरांनो तुमाला पटत असलं तर बघ नसल तर सोडून द्या. उगा तरास नका करून घेऊ. चला न्याहारी करूया. किती येळ झाला बगा.
रोहन : होय रे चला. खूप वेळ झाला. मला तर खूप भूक लागली आहे.
शैलेश : होय चला.
सर्वजण न्याहारीला गेली
दुपारची जेवण झाली तशी चौघे गावात फिरायला बाहेर पडली. चालत असताना त्यांचा विषय सुरु झाला.
अमित : काय बे रोहन. तुझे आजोबा सांगत होते ते खरे असेल का रे?
रोहन : आम्या मला काय माहित. मी तर पहिल्यांदाच ऐकतो आहे हे मी.
पराग : मी काय म्हणतो. आपण जाऊया का पाहायला ती काळी हवेली?
शैलेश : अजिबात नाही जायचं. आपल्याला माहिती तरी आहे का तिथे काय आहे नई काय न्हाई. उगाच काही रिस्क नको.
अमित : शैल्या तू दळभद्रीच आहेस बग. जरा काही करायचं म्हटलं कि तुज रडगाणं चालू होत बघ.
शैलेश : हे बघ अमित. आपण इथे नवीन आहोत. भुताखेतावर माझाही विश्वास नाही पण आजोबा जे काही सांगत होते त्यावरून ती हवेली धोकादायक असणार हे नक्की. उगाच नवीन काही उंचावतात नको.
पराग : शैल्या तुला यायचं असेल तर चल नसले तर नको येऊ. मी तर जाणार आहे. आम्या आणि रोहन्या तुम्ही येणार आहे का रे? येणार असाल तर चला.
अमित : आपण तर साला कधीच तयार आहे. या शैल्याची नाटकी बघत होतो. चलो.
रोहन : हो मी पण येणार आहे.
शैलेश : अरे माझं ऐका रे. नको जायला तिकडे.
शैलेश कडे जराही लक्ष न देता रोहन, पराग आणि अमित हवेलीच्या वाटेला लागले. त्यांच्या नजरेत आता फक्त ती काळी हवेलीचे दिसत होती. त्यांची पाऊले अचानक वेग घेऊ लागली. त्यांच्या चालण्यावरून असं वाटत होत कि जणू काही ती हवेलीच त्यांना बोलावत होती. गाव संपला आणि दोन्ही बाजूनी दाट झाडी असलेली एक वाट सुरु झाली. समोर एक बंद केलेलं भलं मोठं लोखंडी गेट त्यांना दिसलं. ते तिघे धावतच त्या गेटपाशी पोहचले. गेटवरून अमित ने आत असणाऱ्या हवेलीकडे पाहिले.
अमित : अरे हीच आहे ती काळी हवेली.
पराग : तुला कास कळलं रे?
अमित : अरे बिनडोक.. ते बघ तिथे एक बोर्ड आहे. पाटील हवेली.
पराग : अरे हा. हीच ती हवेली.
रोहन : मग जायचं का आत?
अमित : काय विचारतो बे. चल कि आत.
तिघांनी पूर्ण ताकदीनिशी ते लोखंडी गेट जोरात ढकलले तसे कर्रर्रर्रर्र आवाज करत ते गेट ओपन झाले. तसे एकदम एक जोरदार वाऱ्याची झुळूक आली. त्या वाऱ्याने हवेलीच्या अंगणात असलेला पाला पाचोळा सळसळला. हवेत धुरळा उडाला. हवेलीच्या मुख्य दरवाज्यावर असणारी घंटा त्या झुळकीने ठण ठण वाजू लागली. वारा बंद झाला पण त्या घंटेचा नाद मात्र तसाच चालू होता. जणू काही तो सांगत होता कि परत फिरा. पण ओढ़ लागलेल्या त्या तिघांना त्या घंटेचा नाद लक्षात आला नाही. ते तेअसेच पुढे झाले आणि मुख्य दरवाजापाशी आले. तो मुख्य दरवाजा कसा उघडावा हे त्या तिघांनाही समजेना. कारण त्याला उघडण्यासाठी असणार लॉक काही विचित्र होत. त्यांनी दरवाजा ताकद लावून ढकलून पाहिला, ओढून पहिला, खूप प्रयत्न केले पण काहीच उपायोग होत न्हवता. अमित थोडा निराश झाला आणि त्याने एक जोरदार लाथ त्या दरवाज्यावर मारली. त्याचबरोबर एक कर्रर्रर्रर्रर्र किर्र्रर्र्र आवाज झाला आणि तो दरवाजा उघडला. त्या तिघांना काही समजले नाही पण दरवाजा उघडला हे पाहून ते खुश झाले. त्या तिघांनी आत प्रवेश केला. तोच मागून एक आवाज आला. अरे थांबा मी पण येतोय.
अमित : मला माहित होत शैल्या तू येणार ते. साला तू आमचा जिगरी आहेस.
शैलेश : आम्या गप तू. तुमी काही ऐकणार नाही माहित होत मला. पण तुमाला असं सोडून जाण योग्य वाटलं नाही. म्हणून आलो.
पराग : चल यार. चला पाहूया काय आहे या हवेलीत.
ती चौघेहि आत गेली तशी हवेलीची मुख्य दार एकदम जोरात आदळली आणि मुख्य दरवाजा बंद झाला. खूप दिवस बंद असल्यामुळे हवेलीत सर्वत्र जळमट आणि घाणीने भरली होती. हवेलीत उंदीर आणि घुशींचे वास्तव्य जास्त होत. पण हवेलीत असणारे जुने साहित्य अगदी जसेच्या तसे होते. ते जरी धुळीने माखले होतेतरी पाहण्यासारखे होते. मुख्य दरवाज्यातून आत आल्यावर समोर आलिशान असा हॉल होता. हॉल मध्ये मधोमध बसण्यासाठी लाकडी खुर्च्या आणि मोठे लाकडी सोफा सेट ठेवले होते. मधेच एक भली मोठी लाकडी खुर्ची अगदी राजाच सिहासन असावं अशी ठेवली होती. आणि त्या खुर्चीसमोर मेलेल्या वाघाचं कातडं टाकलं होत. हॉल च्या मधोमध भलं मोठं झुंबर लटकावलं होत. जे खूपचसुंदर दिसत होत. भिंतीवर चारही बाजूला वेगवेगळ्या प्रांण्यांची मुंडकी अडकवली होती. सोबत तलवारी, ढाली, भाले, बंदूक इ. प्रकारचे साहित्य अडकवले होते. ते सव पाहण्यात ते चौघेही गुंग होते तोच वरच्या खोलीतून त्यांना आवाज आला. तसे ते चौघे एकदम चरकले.
शैलेश : अरे कसलं आवाज आला. वरती कोणीतरी आहे बहुतेक.
अमित : शैल्या भूत आले बघ. हाहाहाहाहा...
पराग : आम्या चेष्ठा नको करू. वरती कोणीतरी आहे. आवाज मी पण ऐकलं.
रोहन : होय मी पण ऐकला आवाज. चला वरती जाऊन पाहू.
तसे चौघे माडीवरून वरती जाऊ लागले. ते वरती जाऊ लागले तसे त्यांना आता आवाज एकदम स्पष्ट ऐकू येऊ लागला. वरच्या खोलीत कोणीतरी काही बोलत होते. ते चौघे त्या खोलीपाशी आले आणि पाहू लागले. खोलीला असणाऱ्या खिडकीतून ते आत पाहू लागले. त्यांनी पाहिले कि एक सुंदर मुलगी तिथे उभा आहे आणि समोर एक साधा मुलगा उभा आहे त्याच्याशी ती बोलत होती.
मुलगी : पाहिलास तू आज आपल्याकडे नवीन पाहुणे आले आहेत. खूप दिवसांनी हवेलीत कोणीतरी येत आहेत. मला खूप आनंद झाला आहे.
मुलगा : हो. आज खूप दिवसांनी हवेलीत पाहुणे आले आहेत. त्यांची चांगली खबदरदारी घेऊ.
मुलगी : त्यांच्यावर लक्ष ठेव. आपल्याला खूप दिवसांनी मेजवानी मिळत आहे. आणि हो तात्या हि इथेच आहेत हे विसरू नको.
त्यांच्यात एवढाच संवाद झाला आणि आवाज बंद झाला. तसे त्या चौघांनी त्या खोलीचा दरवाजा उघडला. आत जाताच ते चौघे एकमेकांकडे पाहतच राहिले.
शैलेश : अरे इथे तर कोणीच नाहीये. मग... मग.. तो आवाज कोणाचा होता?
रोहन : हो.. इथे कोणीच नाहीये. काय भानगड आहे हि?
त्यांनी आजूबाजूला सर्वत्र पाहीले पण तिथे कोणीच न्हवते. ते चौघे एकमेकांकडे पाहत खात्री करत होते कि तो आवाज आला कोठून?
शैलेश : मी म्हटलं होत.. इकडे नको यायला. नक्कीच ती भूत होती. तुम्ही अजिबात ऐकत नाही माझ. आता बघा काय होत आहे. आम्या.. आम्या कुठे गेला.
पराग : हा काय इथेच होता? अरे हा कुठे गेला. आम्या...
रोहन : आम्या... ये आम्या.. मस्करी नको करू रे..
त्या तिघांना आता घाम फुटला. ते तिघेही बाहेर पळत आले. समोर पाहतात तर.. समोरच दृश्य पाहून यांची बोबडीच वळली. अमित तिथेच उभा होता आणि तो थरथर कपात होता. त्याने फक्त हातानेच तिघांना इशारा केला तसे तिघे तिकडे पाहू लागले. हॉल मध्ये मगाशी दिसलेली ती मुलगी हवेत तरंगत होती आणि अमितला पाहून हसत होती. ती दिसायला खूप सुंदर होती पण तिचे डोळे लालभडक आणि केस विस्कटलेले होते. तिच्या डोळ्यातून रक्त वाहत असल्यासारखे दिसत होते. ती त्या चौघांना पाहून अजून जोरात हसू लागली. तिच्या त्या हसण्याचा आवाज इतकं क्रूर होता कि त्या चौघांनि आपले कां दोन्ही हातानी गच्च दाबून घेतले. त्यांना तो आवाज असह्य झाला त्यांनी आपले डोळे गच्चं मिटले. अचानक तो आवाज यायचा बंद झाला. डोळे उघडले तर समोर काहीच न्हवते.तोच शैलेशने बाकी तिघांना आणखी एक इशारा केला. त्यांच्या समोरच्या भिंतीवर एक चित्र अडकवलं होत. त्या चित्रात एक मुलगी होती. जी हुबेहूब मगाशी पाहिलेल्या मुलगी प्रमाणे दिसत होती. त्यांच्या लक्षात आलं कि ती मुलगाही दुसरी कोणी नसून पाटलांची मुलगी होती आणि नक्कीच तो सदानंद होता असा समज त्यांचा झाला. पण तो सदानंद न्हवता.
रोहन : म्हणजे आजोबानी जे सांगितलं ते खरं होत तर. या हवेलीत भूत आहे.
शैलेश : आता पटल माझं. मी सांगत होतो इकडे नको यायला.
अमित : अबे शैल्या तू लगेच नको सुरु होऊ. चला पटकन इथून बाहेर पडूयात.
ते चौघे धावतच खाली हॉल मध्ये आले. मुख्य दरवाजाकडे ते जाऊ लागले पण समोर कुठेच दरवाजा दिसत नव्हता.
पराग : अरे आपण इथूनच तर आत आलो ना. मग.. मग आता दरवाजा का दिसत नाहीये.
अमित : अरे पराग नीट बघ ना साल्या. तिथेच असेल रे दरवाज्या.
पराग : आम्या नाय रे इथे. इथे काही कळतच नाहीये.
सर्वच कावरे बावरे झाले होते. तोच एक आवाज आला
"तुम्ही आलात तर तुमच्या मर्जीने पण... तो दरवाजा मी उघडला होता... तुम्हाला आत मी घेतलं होत.. आता माझी मर्जी असेल तरच तुम्ही बाहेर जाऊ शकता... " हाहाहाहाहा.. तो कर्णकर्कश आवाज कानी पडताच चौघेही घाबरले.
ते चौघेही सैरभैर झाले आणि त्या हॉल मध्ये इकडे तिकडे पळू लागले. दरवाजा शोधू लागले पण काहीच उपयोग झाला नाही. आखेल ते ठाकले आणि हॉल मधेच येऊन बसले. एव्हाना किती वेळ गेला असेल हेही त्यांना समाजात न्हवते. मोबाइल जवळ होते पण ते चालत न्हवते. तोच माडीवरून कोणीतरी चालत येत असल्याचा आवाज झाला. बुटांचा आवाज येत होता. टप टप.... ती व्यक्ती त्या चौघांना पाहतच माडी उतरत खाली अली आणि मधोमध असणाऱ्या त्या खुर्चीवर बसली. त्याने त्या चौघांना खुणेनेच समोर येण्यास सांगितले. ते चौघे समोर आले तशी ती व्यक्ती त्या चौघांना निरखून पाहू लागली. अमितवर नजर पडताच त्या व्यक्तीची नजर तिथेच स्थिर झाली. काही क्षण असेच गेले आणि ती व्यक्ती बोलली.
"सदानंद तू पुन्हा आलास... मी तुला असा जाऊ नाही द्यायचो. तू माझ्या मुलीला फसवलास.. पण मला नाही फसवू शकत... मला माहिती होत तू माझ्या मुलीला का तुज्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंस ते.." त्याच्या त्या वाक्यावरून शैलेशच्या लक्षात आले कि हे पाटील आहेत.
शैलेश : माफ करा पाटील साहेब पण तुम्ही आम्हाला जे समजत आहोत ते आम्ही नाही आहोत. धाडस करूनच शैलेश बोलला.
पाटील : (शैलेशकडे नजरेचा रोख ठेवत) काहीपण नको बोलू मूर्ख. मी सदानंदला चांगलाच ओळखतो.
पराग : तो खार बोलतोय पाटील. आम्ही तर मुंबईहुन आलो आहे. इथे फक्त फिरायला आलो होतो.
रोहन : ह्ह्हहोय.. आम्ही फक्त फिरायला आलो आहे. काय रे आम्या बोल ना आता.
अमित : म्म्म्म्ममी काय बोलू. हह्ह्हह्हा आम्ही इथे फिफिफिरायलाच आलो आहे. आम्हाल जाऊदे.
मुलगी : (तिचा आवाज आला. ती हवेतूनच तरंगत खाली आली) सदानंद तू कुठेच जायचं नाहीस. तात्याचं काय करायचं ते मी पाहते.
अमित : अरे कोण सदानंद... मी अमित आहे.. सदानंद नाही.
मुलगी : (हसत) तू माझा सदानंद आहेस.. घाबरू नकोस तुला कोणी काही करणार नाही. आणि इथून जायचं नाही. गेलास तर याद राख.
पाटील : तू इथून जाऊ शकत नाहीस.. तुला फक्त मारायचं आहे इथ.. हाहाहाहा..
मुलगी : तात्या.. माझं प्रेम आहे त्याच्यावर.. त्याला काही झालं तर मी पण मारून जाईन..
पाटील : मुली तू त्या मुर्खांच्या नदी नको लागू.. या अगोदर हि तू असच केलस आणि हा विनाश घडवून आणलास. माझं एक जरा.
हे सर्व पाहत ते चौघे तिथेच उभे होते. त्यांना कळून चुकले कि आपण अडकलो आहे ते. मार्ग काहीच न्हवता. त्यांनी एकमेकाला खुणेनेच पाळायचं हा प्लॅन केला आणि वाट दिसेल तिकडे पळू लागले. एका बाजूला शैलेश व अमित आणि दुसऱ्या बाजूने पराग व रोहन धावत सुटले.
पाटील : अरेरेरे.. कुठेह पळताय.. सोडणार नाही मी तुम्हाला.
मुलगी : सदानंद घाबरू नको रे. मी आहे. तुला काही होऊ देणार नाही.
पाटील रोहन व पराग च्या मागे मागे धावले आणि मुलगी अमित व शैलेश च्या मागे. शैलेश व अमित एका अडगळीच्या खोलीत कसेबसे शिरले. मागून आलेली ती मुलगी त्यांना शोधात तशीच पुढे गेली. पण इकडे पराग व रोहन मात्र चांगलेच अडकले. पाटलाचं भूत आवेशाने त्यांच्या पाठीमागे लागलं होते. ते दोघे धडपडत पळत होते. त्यांना काहीच समजत न्हवते कि काय करायचे. हवेलीत मार्ग दिसेल तिकडे ते दिघे पळू लागले. अचानक त्यांचं समोर त्या मुलगीच भूत आलं. "कुठे आहे माझा सदानंद?' अशी ती जोरात किंचाळली. पराग व रोहन दोघेही आता अडकले होते. पुढे मुलगी होती आणि मागे पाटील.
त्या दोघांना काहीच बोलता येत न्हवते. सदानंद दिसत नाही म्हटल्यावर नाराज झालेल्या त्या मुलीने पराग ला हवेत जोरात फेकून दिले. समोरच्या भिंतीवर आदळून पराग खाली पडला. त्याच्या हाताला इतक्या जोरात मार बसला कि त्याचा हातच कोपरापासून निखळला गेला. रोहन ते पाहून घाबरला. तो पळून जाऊ लागला तोच त्या मुलीने त्याची मान पकडली आणि समोरच्या भिंतीवर त्याच डोकं आपटलं. तो प्रहार इतक्या जोरात होता कि रोहनच्या डोक्याचे दोन तुकडे झाले आणि रोहन जागीच मरण पावला. ते भयानक दृश्य पाहून पराग जागीच बेशुद्ध झाला. इकडे पाटलाच्या भूतानेही परागचेही तेच हाल केले. त्यांनी त्या दोघांचे शरीर छिन्न विछिन्न करून टाकले. ती दोन्ही भुते एकमेकांवर विजय मिळवलेल्या भावनेत तिथून निघून गेली. हे सर्व अमित व शैलेशन त्या अडगळीच्या खोलीतून पहिले.
"जाम लोचा झाला रे शैल्या... तुज ऐकलं असत ना तर हा टाइम आपल्यावर आलाच नसता बघ.. पण साला अंगात मस्ती जाम रे.. आता कळतंय तू का एवढा जीव ताणून सांगत होता ते.."
शरीरातील सर्व त्राण संपलेला अमित चेहरा रडवेला करून शैलेशला सांगत होता. शैलेश त्याला पाहून फक्त हलकेच गालात हसला.
"आम्या आता जे झालय ते भोगलं पाहिजे बाबा.. प्रार्थना कर की आपण यातून लवकरच बाहेर पडू. आता जे काही नशीबात असेल तेच घडेल. "
इतक्यात त्या अडगळीच्या खोलीत काहीतरी हालचाल जाणवली. तसे अमित आणि शैलेश दोघे सावध झाले. "सदानंद... सदानंद.." अशी हाक ऐकू येऊ लागली. त्या दोघांनाही समजलं कि त्या भूताना आता यांची चाहूल लागली आहे ते. ते दोघेही घाबरले. आपला मृत्यू निश्चित आहे त्या दोघांना समजले होते. आपल्या मित्रांचे झालेले हाल आणि मृत्यू त्यांच्या नजरेसमोर होता. त्या भीतीनेच ते अर्धवट मेले होते. तोच शैलेश ज्या भिंतीला टेकून बसलं होता त्या भिंतीतुन त्याच्या गळ्याभोवती हातांचा पंजाने पकड घेतली. अमित शैलेशची मदत करण्यास पुढे झाला. त्याने ते हात हटवायला सुरवात केली तोच एकदम कोणीतरी त्याचा पाय पकडला आणि त्याला हवेत भिरकावल. अमित आता हॉल मध्ये जाऊन पडला होता. इकडे शैलेश सुटका करून घेण्यासाठी तडफडत होता. त्या हातांची पकड आता खूपच घट्ट झाली होती. तो तसाच बेशुद्ध पडला. हॉल मध्ये असलेल्या अमितला पाटलाच्या भूतान उचलून फेकण्यास चालू केले. या सर्व प्रकारात माहित खूप ठिकाणी जखमी झाला होता. त्याला खूप ठिकाणी लागलं होत. तो जिवाच्या आकांताने ओरडत होता. त्या भूताची क्षमा मागत होता पण सर्व काही व्यर्थ होत. एव्हाना बेशुद्ध असलेल्या शैलेशचा गळा आपल्या टोकदार नखांनी चिरून त्याच रक्त पिण्यात गुंग असणारी मुलगी अमितच्या आवाजाने सैरभैर झाली. ती बाहेर हॉल मध्ये आली. समोर अमितचे हाल पाहून ती किंचाळू लागली. तिच्या आवाजाने तो हॉल दुमदुमून गेला. अमित अर्धमेला झाला होता. ती मुलगी पाटलांना अडवायला पुढे झाली पण अमित पर्यंत ती पोहचण्याआधीच पाटलांनी अमित च्या मानेवर तलवार चालवली आणि अमितचे मुंडके धडापासून वेगळे झाले. त्याच कर्णकर्कश वाजत किंचाळत ती मुलगी अमित पाशी अली आणि सदानंद... सदानंद. अशी जोरजोरात ओरडू लागली. सर्व गाव आज पुन्हा जागा झाला. त्या आवाजाने ते घाबरले देखील कारण नेहमीपेक्षा यावेळी हा आवाज खूपच भयानक होता...
दुसऱ्या दिवशी सकाळी हवेली जवळ असणाऱ्या तलावात चार मृतदेह मिळाले. सर्व गावकरी जमा झाले. त्याचवेळी रोहनचे आजी-आजोबा जे बाहेरगावी गेले होते ते देखील हजार झाले. त्यांनी ते मृतदेह पाहताच आपल्या रोहनला ओळखले. कोणाला काहीच समजत न्हवते कि नेमकं काय झालं असेल. पुन्हा एकदा काळी हवेली आपला खेळ करून शांत चित्ताने उभी होती. हवेलीने आपले सावज आधीच हेरून ठेवले होते... म्हणूनच तर ती प्रसिद्ध होती... काळी हवेली....!
समाप्त....!