मिरा दातार बाबा - एक सत्य कथा
लेखक - प्रा. दयानंद सोरटे.
माझ्या मामाचा मुलगा राम. लहानपणापासूनच खूपच खेळकर असल्यामुळे त्याला अभ्यासात काही रुची नव्हती. कसे - बसे दहावीचे शिक्षण पूर्ण करून मामाने त्याला एका गुजराथी शेठच्या स्टेशनरीच्या दुकानात कामाला लावले. त्यालासुद्धा तेच हवे होते. कारण शाळा आणि शिक्षक म्हटले कि त्याला भीतीच वाटायची. माझ्या पेक्षा तो जेमतेम एक दोन वर्षांनी मोठा होता. कामावर मात्र तो नित्यनियमाने जाऊ लागला. त्याचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे प्रामाणिकपणा. खोटे बोलणे आणि लबाडी करणे हे त्याला कधी जमले नाही. अगदी सरळमार्गी होता तो. मनाने भोळा आणि मितभाषी होता तो. गुजराथी मालकाबरोबर राहून त्याला लवकरच उत्तम प्रकारे गुजराथी बोलता येऊ लागले. त्यामुळे त्याच्या मालकाने त्याला मार्केटिंग ची जबाबदारी सोपविली अर्थातच त्याच्या पगारात देखील वाढ झाली. मामाच्या इथला परिसर थोडा व्यवस्थित नसल्यामुळे मामाने त्याला आमच्याकडे ठेऊन घेण्याची माझ्या बाबांना विनंती केली. बाबांनी होकार दिला. आणि त्यानंतर राम आमच्यासोबत राहू लागला.
स्वभावाने भोळा आणि परोपकारी असल्यामुळे इमारतीत तो सर्वांचा लाडका झाला. सर्वकाही सुरळीत चालू होते. नकळत इमारतीतील एका मुलीच्या तो प्रेमात पडला कारण ते वयच तसे होते. पण मलामात्र त्याने या गोष्टीचा मागमूस लागून दिला नाही. माझ्यापासून त्याने त्याचे हे प्रेम प्रकरण लपविले. जरी तो माझ्या पेक्षा वयाने मोठा होता तरी तो माझा आदर करायचा. त्यामुळे कदाचित त्याने मला हे कळून दिले नाही. त्याचे हे प्रेम प्रकरण बरेच दिवस चालू होते.
पण एके दिवशी तो मला आमच्या इमारतीच्या टेरेसवर एकटाच अंधारामध्ये रडत बसलेला आढळला. मी त्याची विचारपूस केली असता मला पाहून तर तो खूपच मोठ्याने रडू लागला आणि मला हात जोडून माफी मागू लागला. मलाच कळायला काही मार्ग नव्हता. कि, नक्की हा असा का वागतोय ? मग मी त्याला शांत करून त्याला विचारल्यावर त्याने मला सविस्तर माहिती दिली. मागील ३ वर्षांपासून त्याचे त्या मुलीबरोबर प्रेमप्रकरण चालू होते. तिच्या घरामध्ये आई - वडिलांखेरीज तिच्या बहिणीला आणि भावाला या गोष्टीची कल्पना होती. पण त्याने तिला लग्नाविषयी विचारले असता तिने त्याचा अपमान करून त्याला धुडकारले. त्याला हे सहन झाले नाही. आणि मला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. हे सर्व ऐकल्यानंतर मला देखील त्या मुलीचा राग आला. मी थेट त्या मुलीच्या घरी जाऊन त्या मुलीला तिच्या घरातून बाहेर आणून ती त्याच्याशी अशी का वागली अशी विचारपूस केली. तेव्हा ती देखील रडू लागली. तिने मला सांगितले कि, इमारतीमधील कुणीतरी त्यांच्या प्रेमप्रकरणाविषयी घरामध्ये चुगली केली. त्यामुळे तिला घरातल्यांनी अगदी बेदम मारले होते. तिने तिच्या अंगावरती उठलेले माराचे वळ देखील मला दाखविले. त्यामध्ये तिची काहीच चूक नव्हती. त्यामुळे मी तिला काहीही न बोलता उलट तिची माफी मागितली.
मी माझ्या मामाच्या मुलाला तिला विसरून जा असे समजविण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिच्यावर खरे प्रेम केले असल्यामुळे तो तिला विसरणे शक्य नव्हते. पण त्यानंतर तो गप्प - गप्प राहू लागला. पण तिच्या घरातल्यांचे कुणाचेही त्याला विचारण्याचे धाडस झाले नाही. पण काही दिवसानंतर राम सतत आजारी पडू लागला. त्याला जेवण नकोसे वाटू लागले. म्हणून मग आम्ही त्याला थोडं त्या मुलीपासून पासून दूर ठेवावे या हेतूने किंवा तो तिला विसरेल या भावनेने त्याला काही दिवस त्याच्या घरी पाठवून दिले.
एक - पंधरा दिवसानंतर आमची मामी एका रात्री १० वाजता त्याला आमच्याकडे घेऊन आली. आणि मोठमोठ्याने रडू लागली. रामची ती अवस्था पाहून आम्हालादेखील आश्चर्याचा धक्का बसला. तो एखाद्या वेड्याप्रमाणे चाळे करत होता. त्याचे गाल आजारी माणसासारखे खाली बसले होते त्यामुळे गालाची हाडे वर निघाली होती. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे जमा झाली होती. अतिशय कृश आणि आजारी माणसासारखी त्याची अवस्था झाली होती. सतत कुठेतरी तो उठून पळत सुटायचा. कुणीतरी त्याला तलवारी आणि चाकू घेऊन माणसे मारायला आली आहेत असं दृश्य दिसायचं. त्यामुळे तो क्रित्येक दिवस झोपला नव्हता. एकटाच काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटत बसायचा. माणसं ओळखायचा पण त्याला ते भयानक दृश्य दिसलं कि त्याची मनःस्थिती बिघाडायची आणि तो वेड्यासारखा वागू लागायचा. मामा - मामींना तो ऐकतच नसे. म्हणून मामी त्याला आमच्याकडे घेऊन आली होती. त्याला डॉक्टरी इलाज चालू केले होते. पण औषधांचा काहीही गुण येत नव्हता. उलट दिवसेंदिवस त्याची तब्बेत जास्तच खालावत चालली होती. त्याची ती अवस्था पाहून आम्ही त्याला आमच्याकडेच ठेऊन घेतले.
मी आणि माझे मोठे भाऊ दोघेही शिक्षक असल्यामुळे दिवसभर शिकवणीमुळे डोके जड झालेले असायचे, त्यात हा रात्रीचा किंचाळत उठायचा त्यामुळे आठवडाभर आम्हालाही झोप नव्हती. हा रात्रीचा मधेच उठून कुठेही पळत सुटायचा. त्यात आम्ही शेवटच्या मजल्यावर राहायला . टेरेस जवळच होती. म्हणून मी तर अक्षरशः त्याच्या हाताला आणि माझ्या हाताला घट्ट दोरी बांधून झोपायचो. आठवडाभर त्याने आम्हाला खूप त्रास दिला. त्याच्यामुळे झोप पूर्ण होत नसे.
शेवट नाईलाजाने मी एका मित्राचा सल्ला घेतला. आणि मामा - मामी आणि त्याला सोबत घेऊन गुरुवारच्या दिवशी रे रोडला मीरा दातार दर्ग्यामध्ये घेऊन गेलो. मी केवळ ऐकून होतो. कि तिथे भूत वगैरे उतरविले जाते. तिथे भुते उतरविण्यासाठी नगारा वाजविला जातो. तिथे गेल्यानंतर सुरुवातीला तर तो आतमध्ये यायला तयारच नव्हता. मी त्याला अक्षरशः उचलून आत नेले. आत नेल्यानंतर तो पहिल्यांदा डोक्याला हात लावून जोरजोराने ओरडू लागला. त्यानंतर तो बाबांच्या मजारकडे जोराने धावत गेला आणि त्याने जोराने आपले डोके त्या मजारसमोर आपटले. त्याने त्याचे डोके इतक्या जोराने आपटले कि मला तर वाटले कि, त्याचे डोके फुटले असेल आणि आता याला थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागेल. म्हणून मी थोडा पुढे गेलो. तर तिथे उभे असलेल्या काजी बाबांनी मला थांबण्याचा इशारा केला. सुमारे १० मिनिटे तो तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडून होता, १० मिनिटांनंतर तो शुद्धीवर आला. तेव्हा तो मला नॉर्मल वाटला. त्याच्या डोक्यालाही कुठल्याही प्रकारची जखम देखील नव्हती. मलाही या गोष्टीचे नवल वाटले. त्या काजी बाबांनी त्याला मंतरलेले पाणी प्यायला दिले. त्याच्या हातात तांब्याचे कडे घातले आणि त्याला गळ्यामध्ये घालण्याकरिता एक तावीज बनवून दिला. आणि थोडा वेळ तिथेच दर्ग्यामध्ये बसून राहण्यास सांगितले.
मधल्या वेळेमध्ये मी त्या काजी बाबांना त्याला काय झाले होते म्हणून चौकशी केली. तर त्यांनी मला सांगितले. कि जिस लडकीके के साथ यह इष्क जता रहा था. उसकी माँ ने इसके उपर काला जादू किया था. मला हे ऐकून खूपच वाईट वाटले. त्यानंतर आम्ही त्याला घेऊन घरी आलो. काही महिन्यानंतर तो हळूहळू बरा झाला. त्या मुलिचेदेखील तिच्या घरच्यांनी दुसरीकडे लग्न ठरविल्यामुळे तो देखील तिला विसरून गेला. सध्या तो त्याच्या वैवाहिक जीवनात त्याच्या मुला - बाळांसोबत सुखी आहे.
पण मित्रांनो !.. ज्या मुलीच्या आईने त्याच्यावर काळी जादू केली होती त्या बाईचा ३ वर्षांपूर्वी खूपच दुर्दैवी अंत झाला. तिला एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. कितीतरी वर्ष ती बाई अंथरुणावरच पडून होती. खूपच त्रासदायक असा तिचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. म्हणून जर एखाद्याचा राग आला असेल तर त्याला दोन थोबाडीत मारून आपला राग व्यक्त करा. पण अशा अघोरी कृत्यांचा आधार घेऊ नका. कारण त्याचे दुष्परिणाम शेवटी करणाऱ्यालादेखील भोगावेच लागतात. आणि हो एक सांगायचे विसरलो. माझ्या मामाचा मुलगा राम हा साई बाबांचा निस्सीम भक्त होता. त्याची शिर्डीची वारी कधीही चुकली नाही. बहुदा आमच्या राम ला वाचविण्याकरिता साईराम हे रहीम च्या रूपाने धावून आले असावे. श्री साई समर्थ.